केरळमधील ५ सुंदर ठिकाणं जी तुमचं मन मोहून टाकतील; एकदा हे फोटो पाहाच By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 10:42 AM 2021-03-21T10:42:45+5:30 2021-03-21T10:47:19+5:30
केरळ प्राकृतिक सौंदर्यासाठी जगभरात ओळखलं जातं. निसर्गाचं मनमोहक रुप अनेकांचं मन मोहून टाकतं. केरळमधली हिरवळ पर्यटकांना आकर्षित करते. केरळला गेल्यावर आवर्जुन भेट द्यावीत अशी ठिकाणं कोणती? जाणून घेऊयात... केरळमधील अलेप्पीला पूर्वेकडील व्हेनिस म्हणून ओळखलं जातं. म्हणजेच व्हेनिसच्या सौंदर्या प्रमाणेच अलेप्पी देखील अतिशय सुंदर आणि पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र आहे. अलेप्पीचा समुद्र किनारा, तलाव आणि हाऊसबोट खूप प्रसिद्ध आहे.
मुन्नार येथील उंचच उंच हिरवळीनं नटलेले डोंगर ढगांना स्पर्श करतानाचं दृश्य मनमोहून टाकणारं आहे. नवविवाहित जोडप्यांसाठी हे अतिशय आकर्षणाचं ठिकाण मानलं जातं. चहा उत्पादनासाठी देखील मुन्नार प्रसिद्ध आहे. चहाच्या मळ्याचा सुगंध आणि निसर्गाचं देखणं रुप पाहण्यासाठी पर्यटक इथं येतात.
केरळची राजधानी तिरुअनंतपुरमपासून केवळ १६ किमी अंतरावर असलेला कोवलम देखील समुद्र किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. कोवलम येथील उंचच उंच नारळाची झाडं आणि मनमोहून टाकणारा समुद्र किनारा आकर्षणाचं केंद्र ठरतो. कोवलमला दक्षिण भारतातील स्वर्ग म्हणून ओळखलं जातं.
ट्रॅकर्स, निसर्ग सौंदर्याचे चाहते, पशू प्रेमी आणि सहलीची आवड असणाऱ्यांसाठी केरळमधील थेककडी देखील स्वर्गापेक्षा कमी नाही. फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी थेककडी अतिशय प्रसिद्ध ठिकाण आहे.
वायनाड हे केरळमधील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक ठिकाण आहे. प्रदुषणमुक्त वायनाड हे पर्यटकांसाठी आकर्षणाचं ठिकाण ठरतं.