Shocking! 'मित्रों' भारतीय नाही, 'शत्रू'कडून अवघ्या २६०० रुपयांना विकत घेतलेले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 08:15 PM2020-05-29T20:15:41+5:302020-05-29T20:30:41+5:30

मेक इन इंडियाच्या मोहिमेद्वारे नवनवीन उत्पादने आणणे हे खरेतर चांगले आहे. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत आणि व्होकल फॉर लोकल सारखी मोहिम सुरु करतात तेव्हा अशा प्रकारची अ‍ॅपची प्रसिद्धी करण्यासाठी काळजी घ्यावी लागेल.

कोरोना व्हायरस आणि वादग्रस्त व्हिडिओंमुळे चीनच्या TikTok अ‍ॅपविरोधात भारतीयांनी मोहिम उघडली होती. TikTok फोनमधून डिलीट करून नवे भारतीय Mitron app इन्स्टॉल करण्यास सुरुवात केली होती. तसेच गुगलवर TikTok बाबत नकारात्मक प्रतिक्रिया नोंदविण्यात येत होत्या.

आज गुगलने या प्रतिक्रिया काढून टाकल्या. हा धक्का पचत नाही तोच आता मित्रों अ‍ॅपबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मित्रों हे अ‍ॅप कोणा भारतीय आयआयटीच्या विद्यार्थ्याने विकसित केलेले नाहीय. तर या अ‍ॅपचा सोर्स कोड म्हणजेच डेव्हलपरच्या कोडसह, त्या अॅपमधील फिचर, युजर इंटरफेस हा जसाचे तसा एका पाकिस्तानी कंपनीकडून विकत घेण्यात आला आहे. पाकिस्तानी सॉफ्टवेअर निर्माता कंपनी Qboxusचे संस्थापक आणि मुख्य संचालक इरफान शेख यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

शेख यांच्या म्हणण्यानुसार या अ‍ॅपचा सोर्स कोड त्यांनी मित्रोंच्या प्रमोटरला अवघ्या ३४ डॉलरमध्ये विकला होता. म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये ते २६०० रुपये होतात. याबाबतचे वृत्त न्यूज१८ने दिले आहे.

शेख यांनी सांगितले की, हा सोर्स कोड देण्यामागे एकच उद्देश होता. हा कोड वापरून त्या ग्राहकाने त्याचे काहीतरी वेगळे अ‍ॅप तयार करावे. परंतू मित्रोंच्या डेव्हलपरने असे केले नाही. त्याने थेट आमचाच कोड जसाचे तसा वापरला. एवढेच नाही तर त्याने फिचर, रचनाही तशीच ठेवली. फक्त लोगो बदलत इंटरनेटवर अपलोड केले.

आमचा सोर्स कोड वापरून जशेच्या तसे अ‍ॅप लाँच केल्याने आम्हाला त्यावर आक्षेप नाहीय. त्याने त्या कोडसाठी पैसे मोजले आणि वापरले. आमचा आक्षेप हे अ‍ॅप भारतीय असल्याचा जो दावा केला जात आहे त्यावर आहे. कारण त्यामध्ये काहीच बदल केलेले नाहीत, असे शेख म्हणाले.

Qboxus ने Mitron कंपनीला हा सोर्स कोड $34 ला कोडकॅनीऑनवर विकला होता. ज्याचे आम्हाला २६०० रुपये मिळाले. Qboxus अशाप्रकारे बनविलेल्या अ‍ॅपची माहिती कंपनीच्या सर्व्हरवर ठेवण्याची सुविधा देते.

मात्र, Mitron ने तो पर्याय घेतलेला नाही. याऐवजी त्यांनी Mitron युजरचा डेटा त्यांच्याच सर्व्हरवर ठेवला आहे. यामुळे आम्हाला या डेटाचे काय केले जाते याबाबत कल्पना नाहीय, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावर मित्रो अ‍ॅपची मालकी सांगणारी कंपनी ShopKiller e-Commerce शी संपर्क साधला असता त्यांनी यावर उत्तर दिले आहे. आम्हाला अज्ञात राहून काम करायचे आहे. आमच्या नावाने लोकांनी आम्हाला ओळखलं पाहिजे अशी आमची इच्छा नव्हती. एक लेख नाउमेद करणारा आहे. यापेक्षा या अ‍ॅपवर आम्ही घेत असलेली मेहनत तुम्ही पहायला हवी. हे अ‍ॅप विकसित करण्यामागे लोकांना मेक इन इंडियाद्वारे नवा पर्याय देण्याचा उद्देश होता, असे कंपनीच्या संचालकाने सांगितले.

एखाद्या अ‍ॅपचा सोर्सकोड विकत घेऊन त्याचे वेगळ्या नावाने अ‍ॅप बनविणे हे बेकायदेशिर नाही. Qboxus ने देखील याआधी अशी प्रसिद्ध अ‍ॅपची क्लोन कॉपी तयार केली आहे. Instagram पासून हॅशग्राम, Zomato सारखे फुडीज सिंगल, TikTok सारखे TicTic ही अ‍ॅप यामध्ये आहेत.

मेक इन इंडियाच्या मोहिमेद्वारे नवनवीन उत्पादने आणणे हे खरेतर चांगले आहे. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वावलंबी भारत आणि व्होकल फॉर लोकल सारखी मोहिम सुरु करतात तेव्हा अशा प्रकारची अॅपची प्रसिद्धी करण्यासाठी काळजी घ्यावी लागेल. ShopKiller ही कंपनी या अ‍ॅपची गोपनीयता आणि अ‍ॅपबद्दल तपशीलांच्या कमतरतेबद्दल आश्वस्त करण्यास अपयशी ठरली आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे मित्रोंसारखीच काही अ‍ॅप उपलब्ध आहेत. कारण Qboxus कंपनीने त्यांच्या TicTic अॅपचा सोर्सकोड अन्य कंपन्यांनाही विकलेला आहे. यामध्ये सप्टेंबर २०१९ मध्ये रिलिझ झालेले Follow अ‍ॅप, KidsTok आणि HotToks (दोन्ही डिसेंबर २०१९) मध्ये रिलिझ झालेली आहेत.