Parag Agrawal vs Elon Musk: पराग अग्रवालशी पंगा मस्कना महागात पडणार; साडेतीन अब्ज रुपये मोजावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 11:40 AM2022-10-28T11:40:19+5:302022-10-28T11:42:57+5:30

मस्क यांनी ट्विटर खरेदी केले की लगेचच अग्रवाल यांना काढून टाकणार असल्याचे आधीपासूनच स्पष्ट झाले होते.

नाही नाही म्हणत अब्जाधीश एलन मस्क यांनी ट्विटरची खरेदी केली आहे. याचबरोबर भारतीय वंशाचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह आणखी दोन अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता देखील दाखविला आहे. अग्रवाल यांच्या ट्विटर बायोडेटावर अद्याप CEO Twitter लिहिलेले असले तरी त्यांच्याबरोबर घेतलेला पंगा मस्क यांना चांगलाच महागात पडणार आहे.

मस्क यांनी ट्विटर खरेदी केले की लगेचच अग्रवाल यांना काढून टाकणार असल्याचे आधीपासूनच स्पष्ट झाले होते. ट्विटर डील आणि ट्विटरमधील बदलांवरून मस्क आणि अग्रवाल यांच्यात नेहमी सार्वजनिकरित्या खटके उडत आलेले होते. ट्विटरवरील फेक अकाऊंट, बोट आणि ट्विटरवरील शब्दांची संख्या हे कळीचे मुद्दे ठरले होते. पराग अग्रवाल हे गेल्या वर्षीच नोव्हेंबरमध्ये ट्विटरचे सीईओ झाले होते. अद्याप त्यांना एक वर्ष पूर्ण व्हायचे होते.

पराग यांच्यासोबत ट्विटरने करार केला होता. जर पराग यांना ट्विटर डीलच्या एक वर्षाच्या आत सीईओ पदावरून काढले तर कंपनी त्यांना भरभक्कम रक्कम देऊ करणार होती. ही रक्कम थोडी थोडकी नव्हती, 4.2 करोड़ डॉलर (जवळपास 345.72 करोड़ रुपये) एवढी होती. रिसर्च फर्म Equilar च्या रिपोर्टनुसार पराग अग्रवाल यांच्या मूळ पगाराच्या आधारे आणि ऍक्सिलरेटेड वेस्टिंग ऑफ इक्विटी अवॉर्ड्सच्या आधारे ही रक्कम मोजण्यात आली आहे.

मस्क यांनी या वर्षी एप्रिलमध्ये ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिली होती. प्रथम, ट्विटरमध्ये 9.2 टक्के भागभांडवल विकत घेतले, त्यानंतर मस्कना बोर्ड सदस्यांमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित केले गेले होते. बोर्डात सामील होण्यास नकार दिला आणि नंतर $44 बिलियनमध्ये ट्विटर विकत घेण्याची ऑफर दिली.

सुरुवातीला ट्विटरच्या शेअरधारकांनी या ऑफरला विरोध केला, पण नंतर त्यांनी या डीलला सहमती दर्शवली होती. ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल आणि मस्क बोट खात्यांवरून एकमेकांशी भिडले. त्यानंतर मस्क यांनी ही डील रद्द केली होती. जेव्हा हे प्रकरण कोर्टात पोहोचले तेव्हा मस्कनी जुन्या ऑफरवर डील करण्यास सहमती दर्शवली होती.