नेटफ्लिक्सच्या सर्वात स्वस्त सबस्क्रिप्शन प्लॅनचा खुलासा; पाहा किती आहे किंमत?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 05:04 PM2022-10-14T17:04:54+5:302022-10-14T17:12:01+5:30

Netflix Cheapest Plan: ज्यांना कमी खर्चात नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन आणला आहे.

नवी दिल्ली : नेटफ्लिक्सने ( Netflix) अखेर आपला अॅड सपोर्ट सब्सक्रिप्शन प्लॅन आणला आहे. सध्या हा प्लॅन युजर्ससाठी उपलब्ध नाही. नेटफ्लिक्सचा नवीन प्लॅन नोव्हेंबरमध्ये उपलब्ध होणार आहे. मात्र, कंपनीने या प्लॅनची किंमत आणि फीचर्स जाहीर केले आहेत. ज्यांना कमी खर्चात नेटफ्लिक्सचे सब्सक्रिप्शन घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी हा प्लॅन आणला आहे.

नवीन प्लॅनची ​​किंमत 6.99 डॉलर (जवळपास 575 रुपये) आहे. दरम्यान, भारतात या किमतीत तुम्हाला नेटफ्लिक्स प्रीमियम प्लॅन (Netflix Premium Plan) मिळेल. येथे प्रीमियम प्लॅनची ​​किंमत 649 रुपये आहे. कंपनीने अॅड सपोर्ट असलेल्या प्लॅनला बेसिक विथ अॅड्स असे नाव दिले आहे.

हा सब्सक्रिप्शन प्लॅन 3 नोव्हेंबरपासून अमेरिकेतील युजर्ससाठी उपलब्ध असणार आहे. या प्लॅनचा फायदा अमेरिकेशिवाय ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, कोरिया, मेक्सिको, स्पेन आणि यूकेच्या युजर्सना मिळणार आहे.

मात्र, या देशांमध्ये हा प्लॅन अमेरिकेत लाँच झाल्यानंतर येणार आहे. नेटफ्लिक्सच्या या प्लॅनची ​​2022 च्या सुरुवातीपासूनच चर्चा होत होती. कंपनीच्या ग्राहकांमध्ये सातत्याने होणारी घट, हे त्याचे कारण होते.

कंपनीने मायक्रोसॉफ्टच्या (Microsoft) सहकार्याने हा प्लॅन तयार केला आहे. या प्लॅनच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, ग्राहकांना कमी किमतीत नेटफ्लिक्स प्लॅन मिळेल. मात्र, यासाठी त्यांना जाहिरातीही पाहाव्या लागणार आहेत. नेटफ्लिक्सने सांगितले आहे की, नवीन प्लॅन अॅड फ्री बेसिक प्लॅन सारखा असणार आहे.

1) यामध्ये यूजर्स एचडी रिझोल्युशनमध्ये कंटेंट पाहू शकतील. 2) स्ट्रीमिंग सेवा फक्त एकाच डिव्हाइसवर मिळेल. 3) प्रत्येक तासाला युजर्सला जवळपास 4 ते 5 मिनिटांची जाहिरात पाहावी लागेल. 4) डाउनलोड सुविधा असणार नाही. 5)युजर्सना मर्यादित कॅटलॉग मिळेल, परंतु Netflix Originals उपलब्ध असेल.

दरम्यान, भारतात नेटफ्लिक्स प्लॅन्स (Netflix Plans) 149 रुपयांपासून सुरू होतात, ज्यामध्ये युजर्सना अॅड फ्री अनुभव एक्सपीरियन्स मिळतो. तर अमेरिकेत नेटफ्लिक्सच्या प्लॅन्सची किंमत 9.99 डॉलर (सुमारे 800 रुपये) पासून सुरू होते. ही किंमत एका महिन्याच्या सबस्क्रिप्शनसाठी आहे. कंपनीने भारतात डिसेंबर 2021 मध्ये प्लॅनला बदलांसह लाँच केला होता.