By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 19:42 IST
1 / 7आजच्या काळात स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, नवीन फोनच्या वाढत्या किमतींमुळे अनेकजण आपला जुनाच फोन वर्षानुवर्षे वापरणे पसंत करतात. काही लोकांसाठी दरवर्षी नवीन मॉडेल घेणे ही सवय असते, तर काही लोक फोन पूर्णपणे निकामी होईपर्यंत तो बदलत नाहीत. 2 / 7पण, खरंच फोन किती जुना झाल्यावर बदलला पाहिजे? तज्ज्ञांच्या मते, केवळ स्क्रीन फुटणे किंवा बटण खराब होणे म्हणजेच फोन खराब होणे नव्हे, तर इतर काही तांत्रिक संकेत आहेत जे तुम्हाला नवीन फोन घेण्याची वेळ आल्याचे सांगतात.3 / 7तुमचा फोन बदलण्यासाठी हार्डवेअरपेक्षा 'सॉफ्टवेअर अपडेट' हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. जर तुमच्या फोनला कंपनीकडून नवीन अपडेट्स मिळणे बंद झाले असेल, तर तुमचा डेटा लीक होण्याचा धोका वाढतो. सायबर हल्लेखोर अशा जुन्या सॉफ्टवेअरचा फायदा घेऊन तुमची बँक खाती किंवा वैयक्तिक माहिती चोरू शकतात.4 / 7Apple आपल्या आयफोनला ५ वर्षांपर्यंत अपडेट्स देते, तर आता Google आणि सॅमसंगसारख्या कंपन्या ७ वर्षांपर्यंत अपडेट्स देण्याचे आश्वासन देत आहेत. जर तुमचा फोन ३-४ वर्षे जुना असेल आणि अपडेट्स मिळत असतील, तर तुम्ही तो वापरू शकता. पण अपडेट्स बंद झाले असतील, तर नवीन फोन घेणेच हिताचे आहे.5 / 7फोनची बॅटरी ही त्याच्या आयुर्मानाचा आरसा असते. प्रत्येक बॅटरीचे 'फुल चार्ज सायकल' ठरलेले असतात. सामान्यतः ३ ते ४ वर्षांनंतर फोनची बॅटरी वेगाने डिस्चार्ज होऊ लागते. पूर्ण चार्ज करूनही काही तासांतच फोन बंद पडत असेल, तर समजून जा की बॅटरीची कार्यक्षमता संपली आहे. जेव्हा बॅटरी कमकुवत होते, तेव्हा त्याचा थेट परिणाम फोनच्या गतीवर होतो. फोन हँग होणे किंवा ॲप्स उघडण्यास वेळ लागणे अशा समस्या सुरू होतात.6 / 7अनेकदा जुन्या फोनवर नवीन ॲप्स किंवा सध्याच्या ॲप्सचे नवीन व्हर्जन चालत नाहीत. उदा. व्हॉट्सॲप किंवा बँकिंग ॲप्स जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणे बंद करतात. अशा वेळी नवीन फोन घेणे ही चैन नसून गरज बनून जाते.7 / 7जर तुमचा फोन सुरक्षिततेच्या दृष्टीने अपडेटेड असेल आणि बॅटरी दिवसभर साथ देत असेल, तर घाई करण्याची गरज नाही. मात्र, जर अपडेट्स मिळणे बंद झाले असेल आणि बॅटरी वारंवार दगा देत असेल, तर 'डेटा चोरी' किंवा 'अचानक फोन बंद पडणे' यांसारख्या संकटाची वाट न पाहता नवीन फोन घेण्याचा निर्णय घ्यावा.