बापरे! WhatsApp ने महिन्याभरात लाखो अकाऊंट्स केले बंद; तुमचा फोन नंबर नाही ना त्यात?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 01:00 PM2022-10-02T13:00:06+5:302022-10-02T13:23:04+5:30

WhatsApp News : एका महिन्यात तब्बल 2,328,000 अकाऊंटवर बंदी घालण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

मेटाचं इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म असलेल्या WhatsApp ने लाखो खात्यांवर पुन्हा एकदा बंदी घातली आहे. कंपनीने याबाबतचा एक रिपोर्ट जारी केला आहे. यामध्ये एका महिन्यात तब्बल 2,328,000 अकाऊंटवर बंदी घालण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

WhatsApp अकाऊंट्स 1 ऑगस्ट 2022 ते 31 ऑगस्ट 2022 दरम्यान बंद करण्यात आली आहेत. यापैकी 1,008,000 भारतीय WhatsApp अकाऊंट्स प्रोएक्टिव्हली बॅन करण्यात आली होती. +91 ने सुरू होणार्‍या मोबाईल क्रमांकांना भारतीय अकाऊंट्स म्हणतात.

रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, मेसेजिंग एपवर ऑगस्ट महिन्यात 597 तक्रारी आल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यापैकी 27 खात्यांवर कारवाई करण्यात आली. रिपोर्टच्या आधारे कंपनी कारवाई करते.

ही अकाऊंट्स एकतर बॅन करण्यात आली होती किंवा बंदी घातलेली खाती रिस्टोर करण्यात आली होती. कंपनीने जुलै महिन्यातही जवळपास तेवढ्याच अकाऊंट्सवर बंदी घातली होती. आयटी नियम 2021 अंतर्गत या अकाऊंटवर बंदी घालण्यात आली आहे.

या नियमांनुसार, डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ज्यांचे 50 लाखांहून अधिक युजर्स आहेच त्यांना दर महिन्याला कंप्लायन्स रिपोर्ट पब्लिश करायचा असतो. युजर्सची सुरक्षितता लक्षात घेऊन हे अकाऊंट बॅन केले जातात.

WhatsApp वर स्पॅम मेसेज पाठवणे टाळा. कोणालाही त्रासदायक मेसेज पाठवू नका. अश्लील किंवा बेकायदेशीर कंटेन्ट शेअर करू नका. वार्निंग मिळाल्यावरही चूक पुन्हा करू नका. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

लोकप्रिय चॅटिंग प्लॅटफॉर्म WhatsApp आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. WhatsApp आताही अशाच एका भन्नाट फीचरवर काम करत आहे जिथे युजर्सना त्यांनी पाठवलेले मेसेज एडिट करता येणार आहेत. सध्या हे फीचर जारी करण्यात आलेले नसून त्यावर काम सुरू करण्यात आले आहे.

WABetaInfo च्या लेटेस्ट रिपोर्टनुसार, WhatsApp वर लवकरच एक नवीन फीचर येत आहे, जे युजर्सना त्यांचे पाठवलेले WhatsApp मेसेज एडिट करण्याची परवानगी देईल. या फीचरची माहिती WABetaInfo ने स्क्रीनशॉटद्वारे शेअर केली आहे. पण याबाबत अद्याप अधिक माहिती समोर आलेली नाही. परंतु हे फीचर Twitter च्या Edit Button प्रमाणे काम करते.

समोर आलेल्या माहितीनुसार, WhatsApp चे एडिट फीचर ट्विटरच्या एडिट बटणाप्रमाणे काम करेल. WhatsApp युजरने एकदा मेसेज एडिट केल्यावर समोरच्या व्यक्तीला पहिल्या मेसेजमध्ये काय लिहिले आहे ते दिसणार नाही, पण मेसेज एडिट झाला आहे हे त्यांना नक्की कळेल. मेसेजमध्ये एक संकेत देण्यात येईल ज्यामुळे तो मेसेज एडिट केला आहे हे समजेल.

WhatsApp वरच्या या फीचरची सध्या चाचणी केली जात आहे आणि हे WhatsApp अँड्रॉइड बीटा अपडेट व्हर्जन 2.22.20.12 वर दिसले आहे. लवकरच iOS च्या बीटा व्हर्जनवरही हे फीचर पाहता येणार आहे. WhatsApp एडिट फीचर सर्व युजर्ससाठी कधी रिलीझ होईल हे अद्याप माहीत नाही.