सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 16:23 IST2025-09-18T16:14:05+5:302025-09-18T16:23:13+5:30

तुम्ही जर नवीन आयफोन १७ सीरिजची आतुरतेने वाट पाहत असाल आणि त्याचे प्री-बुकिंग करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

तुम्ही जर नवीन आयफोन १७ सीरिजची आतुरतेने वाट पाहत असाल आणि त्याचे प्री-बुकिंग करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आयफोन १७च्या लॉन्चमुळे सायबर गुन्हेगार पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, ते ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरत आहेत. सायबर सुरक्षा फर्म कॅस्परस्कीने यासंदर्भात गंभीर इशारा दिला आहे.

सायबर गुन्हेगार आयफोन १७च्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन, ग्राहकांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. ते बनावट वेबसाइट्स तयार करत आहेत, ज्या हुबेहूब Appleच्या अधिकृत वेबसाइटसारख्या दिसतात. या वेबसाइट्सवर 'लॉटरी जिंकण्याची संधी' किंवा 'मोफत आयफोन' अशा आकर्षक ऑफर दिल्या जातात. या आमिषाला बळी पडून अनेकजण आपली वैयक्तिक आणि आर्थिक माहिती देत आहेत.

या बनावट वेबसाइट्सवर 'मोफत आयफोन' किंवा 'बक्षीस जिंकण्याची संधी' अशा जाहिराती दिसतात. बक्षीस जिंकण्यासाठी तुम्हाला एक सर्वेक्षण पूर्ण करण्यास सांगितले जाते आणि तुमची वैयक्तिक माहिती, जसे की ईमेल आयडी आणि फोन नंबर मागितला जातो.

त्यानंतर, कथित बक्षीस तुमच्या घरी पोहोचवण्यासाठी 'डिलिव्हरी शुल्क' म्हणून पैसे भरण्यास सांगितले जाते. या फसवणुकीच्या जाळ्यात फसल्यास तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते.

कोणताही फोन खरेदी करताना Appleच्या अधिकृत वेबसाइटवरूनच खरेदी करा. वेबसाइटचा URL काळजीपूर्वक तपासा आणि स्पेलिंगमधील चुकांकडे दुर्लक्ष करू नका.

नेहमी अधिकृत डीलर्स किंवा विश्वसनीय रिटेलर्सकडूनच फोन खरेदी करा. जर तुम्हाला ईमेल, टेक्स्ट मेसेज किंवा सोशल मीडियावर आकर्षक ऑफर्स दिसल्या, तर कोणताही विचार न करता अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. अशा लिंकवर क्लिक केल्याने तुमचे बँक खाते धोक्यात येऊ शकते.

आपल्या मौल्यवान माहितीचे संरक्षण करण्यासाठी जागरूक राहा आणि अशा फसवणुकीच्या योजनांपासून स्वतःला सुरक्षित ठेवा.