सावधान, 'डीपसिक'चा डेटा जातोय थेट चीनला? समजून घ्या, भीती काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 11:33 IST2025-02-08T11:28:27+5:302025-02-08T11:33:08+5:30

Is deepseek safe for indians: चिनी एआय चॅटबॉट डीपसिक वापरणे सुरक्षित आहे की नाही? याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याबद्दल जाणून घ्या...

चिनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चॅटबॉट 'डीपसिक' मध्ये संशयास्पद कोड सापडला असून, हा कोड थेट एका चिनी दूरसंचार कंपनीशी जोडलेला असल्याचे आढळून आले आहे. याद्वारे हा चॅटबॉट त्याला उपलब्ध झालेली माहिती थेट चीनला पाठवू शकतो, असा संशय आहे.

एका वृत्तानुसार, हा संशयास्पद कोड डीपसिकच्या वेब क्लायंटवर नोंद केलेला डेटा चिनी मोबाइलपर्यंत पाठविण्यास सक्षम असू शकतो. हा कोड डीपसिक प्लॅटफॉर्मवर खाते तयार करताना, तसेच लॉगिन करतानाच्या प्रक्रियेशी संबंधित आहे.

डीपसिक चीनमध्ये काही डेटा पाठवीत आहे का, याबाबत मात्र कोणतीही विश्वासार्ह माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. संशोधक मात्र ही शक्यता नाकारायला तयार नाहीत. त्यामुळे सायबर सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणात चिनी कंपनीवर अमेरिकेने २०१९ मध्येच बंदी घातली होती.

'डीपसिक'वर ऑस्ट्रेलिया, इटली आणि तैवान या तीन देशांनी सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलियाने डीपसिकला सरकारी यंत्रणा वापरण्यास बंदी घातली आहे.

इटलीने डीपसिकच्या सेवा ब्लॉक केल्या आहेत. आयर्लंडच्या डाटा सुरक्षा आयोगाने डीपसिककडे डाटा सुरक्षा धोरणाचा अहवाल मागविला आहे. युरोपीय देशही नजर ठेवून आहेत.

कुणी शोधला कोड? : डीपसिकमधील हा कोड कॅनडामधील सायबर सुरक्षा संस्था 'फेरुट सेक्युरिटी'ने शोधून काढला आहे.

अनेक स्वतंत्र तज्ज्ञांनी फेरुटच्या दाव्यास पुष्टी दिली आहे. डीपसिक चॅटबॉट टिकटॉकपेक्षाही अधिक घातक असू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.