अंबानी इंटरनॅशनलमधून शिक्षण, ७ यूट्यूब चॅनेल अन्... रणवीर अलाहाबादियाची कमाई ऐकून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 17:23 IST2025-02-10T17:11:06+5:302025-02-10T17:23:14+5:30
Ranveer Allahbadia Net Worth: रणवीर अलाहाबादिया हा देशातील प्रसिद्ध यूट्यूबर आहे. त्याने पॉडकास्टच्या रूपात अनेक बड्या स्टार्स आणि नेत्यांच्या मुलाखती प्रसिद्ध मुलाखती घेतल्या आहेत.

लोकप्रिय यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया, अपूर्व मखिजा, समय रैना आणि 'इंडिया गॉट लेटेंट'च्या आयोजकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 'इंडिया गॉट लेटेंट'मध्ये अश्लील आणि वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या शोमधील व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर रणवीरवर टीकेची झोड उठली आहे. अनेकांनी याबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे. वाढता विरोध पाहता रणवीरने एक व्हिडीओ पोस्ट करत माफी मागितली आहे.
राजकारणी, अभिनेते, हॉलीवूड स्टार, व्यापारी, ज्योतिषी यासह विविध क्षेत्रातील नामवंत लोकांच्या मुलाखती घेताना दिसणारा रणवीर अलाहाबादिया त्याच्या पॉडकास्ट, स्टायलिश लूक आणि फिटनेसमुळे चर्चेत असतो. मात्र आता या सगळ्या प्रकारामुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.
कोट्यवधींची कमाई करणारा आणि लक्झरी लाइफ जगणारा रणवीर अलाहाबादिया वयाच्या २२ व्या वर्षापासून यूट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ बनवत आहे. त्यामुळे कमी वयातच त्याने मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळवली आहे.
रणवीर अलाहाबादियाचा जन्म २ जून १९९३ रोजी मुंबईत झाला. त्याचे शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून झालं. २०१५ मध्ये त्याने द्वारकादास जीवनलाल संघवी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये बी.टेक पूर्ण केले.
वयाच्या २२ व्या वर्षी त्याने त्याचे यूट्यूब चॅनल सुरू केले. रणवीर सात यूट्यूब चॅनेल चालवतो आणि त्यातील एक सर्वात प्रसिद्ध Beerbiceps हे आहे. त्याच्या चॅनेलवर १ कोटीहून अधिक सब्सक्राइबर आहेत.
माध्यमांच्या वृत्तानुसार, रणवीर अलाहाबादिया यूट्यूब आणि पॉडकास्टमधून महिन्याला सुमारे ३५ लाख रुपये कमावतो. त्याच्याकडे उत्पन्नाचे अनेक स्त्रोत आहेत ज्यात यूट्यूब जाहिराती, रॉयल्टी, ब्रँड स्पॉन्सरशिप यांचा समावेश आहे. याशिवाय रणवीर ब्रँड प्रमोशन आणि जाहिरातींमधूनही भरपूर कमाई करतो.
२०२४ मध्ये रणवीर अलाहाबादियाची एकूण संपत्ती ६० कोटी रुपये इतकी होती. तो Monk Entertainment चा सह-संस्थापक देखील आहेत.
कोट्यवधींची कमाई करणारा रणवीर अलाहाबादिया आलिशान जीवनशैली जगतो. त्यांचे मुंबईत स्वतःचे घर आहे. याशिवाय त्याच्याकडे स्कोडा कोडियाक कार आहे. ज्याची किंमत जवळपास ३९.९९ लाख रुपये आहे.