Harsha Richhariya : "आता बस्स झालं, तुमचा धर्म तुमच्याकडेच ठेवा, मी सीता नाही..."; हर्षा रिछारियाचा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 15:36 IST
1 / 10प्रयागराज महाकुंभ २०२५ मुळे चर्चेत आलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षा रिछारिया हिचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हर्षाने धर्माचा मार्ग सोडत असल्याचा दावा केला आहे. 2 / 10मॉडेल आणि अँकर राहिलेली हर्षा रिछारिया महाकुंभमध्ये 'निरंजनी आखाड्याच्या' पेशवाईत सहभागी झाली होती, त्यानंतर ती प्रचंड चर्चेत आली होती. आतापर्यंत धर्म-आधारित कंटेंट बनवणारी हर्षा आता धर्माचा मार्ग सोडण्याची घोषणा केल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली. 3 / 10व्हायरल व्हिडिओमध्ये हर्षा म्हणतेय की, 'मी काही माता सीता नाही जी अग्निपरीक्षा देईल.' याचसोबत तिने धर्माचा मार्ग सोडून आपल्या जुन्या कामाकडे परतणार असल्याचंही जाहीर केलं आहे.4 / 10सोमवारी रात्री शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये हर्षा सांगतेय की, 'प्रयागराज महाकुंभ २०२५ पासून सुरू झालेली ही गोष्ट आता संपत आहे. या काळात मला खूप विरोधाचा सामना करावा लागला, मी अनेक परीक्षा दिल्या आणि बरंच काही केलं. मात्र आता मी माझ्या जुन्या कामाकडे परतत आहे.'5 / 10'मी काय करत होते? मी कोणतंही चुकीचं काम करत नव्हते. मी चोरी किंवा लूटमार करत नव्हते. पण धर्माच्या मार्गावर चालताना मी जे काही करत होते, त्यात मला वारंवार रोखण्यात आलं. माझं मनोबल वारंवार तोडण्याचा प्रयत्न झाला.'6 / 10यावेळी तिने स्वतःवर कर्ज असल्याचंही मान्य केलं. लोकांना वाटतं की मी कोट्यवधी रुपये कमावले आहेत, पण प्रत्यक्षात असं नाही. हर्षा म्हणाली, 'मी अँकरिंग करत होते आणि माझं प्रोफेशन खूप चांगलं होतं. मी परदेशात काम करून चांगले पैसे कमावत होते आणि त्यात मी खूप आनंदी होते.'7 / 10हर्षाने संताप व्यक्त करत पुढे म्हटलं की, 'एका मुलीचा विरोध करणं ही आपल्या देशात कदाचित सर्वात सोपी गोष्ट आहे. जर तुम्ही तिचं मनोबल तोडू शकत नसाल, तर तिचं चारित्र्यहनन करा, म्हणजे ती नक्कीच तुटेल. त्यामुळे भावांनो, तुमचा धर्म तुमच्याकडेच ठेवा.'8 / 10'मी काही माता सीता नाही जी अग्निपरीक्षा देईल. गेल्या वर्षभरात मला जितक्या परीक्षा द्यायच्या होत्या आणि जे काही करायचे होते ते मी केलं. आता बस्स झालं!'9 / 10'या मौनी अमावस्येला माघ मेळ्यात मी माझे स्नान करेन आणि त्या स्नानासोबतच, धर्माच्या मार्गावर चालण्याचा जो संकल्प मी केला होता, तो तिथेच थांबवेन आणि पुन्हा माझ्या जुन्या कामाकडे वळेन.'10 / 10हर्षा रिछारियाचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यावर लोक संमिश्र प्रतिक्रिया देत असून, काही जण तिच्या कामाचं कौतुक करत आहेत, तर काही जण तिला विरोध करताना दिसत आहेत.