Fact Check: केंद्र सरकारची वैभव लक्ष्मी योजना, व्यवसायासाठी महिलांना देणार ४ लाखांचे कर्ज?
By प्रविण मरगळे | Updated: September 23, 2020 18:14 IST2020-09-23T18:11:04+5:302020-09-23T18:14:35+5:30

सोशल मीडियात गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नावाने वैभव लक्ष्मी योजने अंतर्गत महिलांना ४ लाख रुपयापर्यंत उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे अशी पोस्ट व्हायरल होत आहे.

वैभव लक्ष्मी योजनेंतर्गत केंद्र सरकार महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ४ लाख रुपयांपर्यंतची कर्ज देत असल्याचे सांगण्यात आलं आहे. असाही दावा केला जात आहे की, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) केंद्र सरकारच्या मदतीने हे कर्ज देत आहे.

तसेच कर्जाची रक्कम थेट अर्ज करणाऱ्या महिलेच्या बँक खात्यात (DBT) पाठवण्यात येत आहे. मात्र हा मेसेज पूर्णपणे चुकीचा आहे

अशाप्रकारे कोणतीही योजना चालविली जात नाही, असं केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. महिलांनी अशा कोणत्याही मेसेजवर अजिबात विश्वास ठेवू नये. या मेसेजद्वारे तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे.

व्हिडीओ मेसेजमध्ये असे म्हटलं जात आहे की, कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर महिलांना डोळ्यासमोर ठेवून वैभव लक्ष्मी योजना आणली आहे. या अंतर्गत आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार सुलभ अटींवर ४ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देत आहे.

हे कर्ज थेट आपल्या बँक खात्यात पोहोचेल. ज्या स्त्रियांना स्वत: चा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि स्वावलंबी होण्याची इच्छा आहे त्यांना हे कर्ज मिळेल. पीआयबी फॅक्ट चेकमध्ये हा मेसेज खोटा असल्याचं निष्पन्न झालं आहे.

कोरोना संकटातच नव्हे तर जेव्हा परिस्थिती वाईट असते तेव्हा सोशल मीडियावर अशा बनावट बातम्या प्रसारित केल्या जातात. अशा परिस्थितीत सोशल मीडियाकडून प्राप्त झालेल्या माहितीची खातरजमा केली पाहिजे आणि त्यानंतरच विश्वास ठेवला पाहिजे.

अशीच एक बनावट बातमी जून २०२० मध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यात म्हटलं होतं की पंतप्रधान धन लक्ष्मी योजना अंतर्गत महिलांना शून्य टक्के व्याजावर ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळत आहे. हा मेसेजही चुकीचा ठरला आहे.

पीआयबीनं म्हटलं आहे की, केंद्र सरकारची अशी कोणतीही योजना नाही. पीआयबी ही भारत सरकारची धोरणे, कार्यक्रम उपक्रम आणि कृत्ये याबद्दल वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांना माहिती देणारी मुख्य संस्था आहे.

या व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये म्हटलं होतं की, पंतप्रधान धन लक्ष्मी योजना स्वत: चा व्यवसाय, स्वयंरोजगार सुरू करून स्वावलंबी बनू इच्छिणाऱ्या देशातील महिलांना ध्यानात घेऊन सुरू केली गेली आहे. अशा महिलांना ५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल.

















