Uddhav Thackeray: आधी राणे बरसले, मग मुख्यमंत्री ठाकरेंनी दिलं जशास तसं प्रत्युत्तर; वाचा १० 'प्रहार'...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 09:42 PM2021-10-09T21:42:44+5:302021-10-09T22:00:52+5:30

Uddhav Thackeray Slams Narayan Rane, Chipi Airport Inauguration: चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे हे तब्बल १६ वर्षांनी एकाच व्यासपीठावर एकत्र आले. राणे आणि शिवसेना यांच्यातील वैर काही नवं नाही. याचिच प्रचिती राणेंच्या भाषणात मिळाली. पण उद्धव ठाकरेंनीही राणेंवर जोरदार 'प्रहार' केले.

चिपी विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमाकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. कारण या व्यासपीठावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकत्र आले होते. राणेंनी तर कार्यक्रमाआधीच सेनेवर हल्लाबोल करणार असल्याचं जाहीर करुन टाकलं होतं. त्यामुळे राणे आणि उद्धव ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सर्वांना होती.

नारायण राणेंनी आपल्या भाषणात शिवसेनेवर नाव न घेता जोरदार टीका केली. राणेंनी आपली खदखद देखील व्यक्त करुन दाखवली. आता राणेंच्या टीकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात करताच पहिल्याच वाक्यात राणेंना सणसणीत टोले हाणण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्र्यांनी राणेंवर अप्रत्यक्षरित्या केलेले प्रहार...

"आजच्या हा क्षण आदळाआपट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचं आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचं अभिनंदन करतो. कारण इतक्या लांब राहूनही तुम्ही मराठी मातीचा संस्कार विसरला नाहीत. मातीचा एक संस्कार असतो. मातीच्या विना काही वेळेला मातीला जाणे. मातीत आंब्यासोबत काही बाभळीची झाडंही उगवतात. बाभळीचे झाडे उगवले तर माती म्हणणार मी काय करु? पोसावच लागणार", असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

कोकणातील विकास कामांची पुन्हा पुन्हा मी माहिती आता देणार नाही. पण जेव्हा मी गड किल्ल्यांची एरिअल फोटोग्राफी करत होतो. आता किल्ले म्हणजे माझातरी समज असा की निदान सिंधुदुर्ग किल्ला तरी शिवाजी महाराजांनी बांधला आहे. नायतर कोणतरी म्हणेल मीच बांधला.

कोकणचं कॅलिफोर्निओ करु, असे काहीजण म्हणाले होते. तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते की, कॅलिफोर्निओला अभिनमान वाटेल असं कोकण उभं करु. पाठांतर करुन बोलणं वेगळं, आत्मसात करुन तळमळीने बोलणं वेगळं, मळमळीने बोलणं आणखी वेगळं असतं.

"नारायण राणे आपण म्हणालात ते खरं आहे. आपण काही चांगल्या गोष्टी केल्या त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. पण कोकणची जनता डोळे मिटून कधीच राहत नाही. ती शांत, संयमी आहे म्हणून सदासर्वदा भयभीत होऊन काहितरी करेल असं नाही. ती मर्द आहे. म्हणूनच गेले अनेक वर्ष तिने हक्काचा लोकप्रतिनिधी आहे. म्हणून विनायक राऊत हे इथल्या जनतेनं निवडून दिलेले खासदार उभे आहेत. मला त्यांचा अभिमान आहे", असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला.

"बाळासाहेबांना खोटं बोलणं अजिबात आवडायचं नाही. त्यांना खोटं बोललेलं एक क्षणही आवडायचं नाही. हेही खरं आहे. अशी खोटं बोलणारी जी लोकं होती त्यांना बाळासाहेबांनी शिवेसेनेतून काढून टाकलं होतं, हा सुद्धा इतिहास आहे. कटू असलं तरी चालेल पण खरं बोल. खोटं बोललेलं मला चालणार नाही. खोटं बोलशील तर गेट आऊट. हे त्यांनी दाखवलंय. मला त्या इतिहासात जायचं नाही"

"नारायणराव आपण केंद्रात मंत्री आहात. लघू का असेना सुक्ष्म का असेना पण मोठं खातं आहे त्याचा उपयोग महाराष्ट्राला नक्की करुन द्याल ही अपेक्षा आहे. मी कुठेही पक्षभेद आणत नाही. तुमच्या कॉलेजच्या बाबतीत जेव्हा तुम्ही फोन केला तेव्हा दुसऱ्याच क्षणी मी सही केली होती. विकासाच्या कामात मी कोतेपणा आणू इच्छित नाही. पण पेढ्यातला गोडवा अंगी बाळगाव लागतो. म्हणून तिळगूळ घ्या गोड बोला असं म्हणतात"

"कोकणात आजवर जे खड्डे मग ते कारभाराचे असो किंवा मग रस्त्यावर पडलेले असो, बुजवण्याचं काम एकत्र मिळून करणार नसू तर आपल्याला निवडून दिलेल्या जनतेचं ते दुर्भाग्य असेल. खड्ड्यात गेली लोकशाही असं बोलायची वेळ निदान त्यांच्या येऊ देऊ नका"

"कोकणच्या विकासाने आजपासून भरारी घेतली आहे. हेही खरंय की या व्यासपीठावर महाराष्ट्राचे सर्व पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. त्यामुळे सगळ्यांचं विकासासाठी अलायन्स आहे. एखादी चांगली गोष्टी असेल तर नजर लागू नये एक काळा तिठ लावा लागतो. तो देखील व्यासपीठावर उपस्थित आहे"

तलवार चालवायची वेळ आलीच तर ती तलवार आपल्या देशाच्या-राज्याच्या शत्रूवर चालवली पाहिजे. आपापसात जर चालली तर तसं दुर्भाग्य या मातीचं दुसरं कोणतं नसेल.

मी आपल्याला विधानभवनात बोललो होतो. संधी मिळणं हे मोठं काम असते. संधी मिळायला कष्ट तर लागतातच पण नशिबही लागतं. या संधीची माती न करता सोनं करण्याचा प्रयत्न केला तरच सगळ्या गोष्टींचा उपयोग होईल.

Read in English