शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

आमच्या कोकणचो रुबाब भारी! पाहा कोकणातील 'हे' पारंपरिक पदार्थ, सकस-साधेसोपे आणि स्वादिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2025 18:34 IST

1 / 11
कोकणातील पारंपारिक खाद्यपदार्थ म्हणजे मेजवानीच. स्वयंपाक करणाऱ्या हातांनाही कमी कष्ट आणि खाणाऱ्याच्या पोटाला समाधान, या हेतूनेच हे पदार्थ शोधले गेले असावेत. अगदी कमी सामग्री वापरुनही रुचकर पदार्थ करता येतात, हे विधान कोकणी पदार्थ सिद्ध करतात.
2 / 11
कोकणातील काही पारंपारिक पदार्थ आहेत, जे घरोघरी केले जातात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे अगदी आवडीने खातात. अर्थात असे बरेच पदार्थ आहेत, त्यातील काही पदार्थांविषयी जाणून घ्या.
3 / 11
'घावणे' हा शब्द कोकणी माणसांच्या ओठावर कायम असतो. मस्त मऊ घावणे करायला अगदी सोपी असतात. कोकणात घावणांचेही प्रकार आहेत. गोड असतात, तिखट असतात. त्यातीलच एक लोकप्रिय प्रकार म्हणजे सात कप्यांचे घावण. तांदळाच्या पीठात गोडसर सारण भरुन त्याला सात पदर पाडून हा पदार्थ केला जातो. सणासुदीला घरोघरी हे घावण केले जाते.
4 / 11
आजकाल केक हा पदार्थ फार लोकप्रिय आहे. मात्र कोकणात वर्षानुवर्षे काकडीचा केक केला जात आहे. काकडी, गूळ, रवा असे पदार्थ वापरुन 'धोंडस' केले जाते. कोकणातील हा एक फार लोकप्रिय पदार्थ आहे. खोबरं, तूप, काकडी घालून केलेला हा पदार्थ फार रुचकर असतो.
5 / 11
कोकणातील खाद्यसंस्कृतीचा विषय निघाल्यावर शिरवळ्यांचा उल्लेख व्हायलाच हवा. शिरवळ्या तयार करायची पद्धत फार वेगळी आहे. आजकाल शिरवळ्या करायचे मशीन फार दिसत नाही. तांदळाच्या पीठाच्या शेवया तयार करुन त्या नारळाच्या दूधत घालून खाल्या जातात. या शिरवळ्या खाण्याची मज्जा जेवढी आहे तेवढीच त्या तयार करण्यातही आहे.
6 / 11
कोकणातील पदार्थांना श्रीमंतांचे अन्न असे संबोधले जाते. त्याचे कारणही तसेच आहे. फणस, महागडी फळे, आंबा, काजू, नारळ अशा अनेक पदार्थांची कोकणात लागवड होते. त्या पदार्थांच्या रेसिपी कोकणात वरचेवर केल्या जातात. काजूची उसळ हा पदार्थ कोकणात घरोघरी केला जातो. ताज्या काजूची भाजी मसालेदार आणि झणझणीत लागते.
7 / 11
काहीतरी युनिक आणि हटके खायचे असेल तर कोकण स्पेशल पातोळी खा. तांदळाची उकड काढून सारण भरायचे आणि हळदीच्या पानावर हा पदार्थ करायचा. गोव्यात पातोळी भरपूर प्रसिद्ध आहे. तसेच कोकणात सणासुदीला पातोळी केली जाते. नारळ गूळाचे सारण वापरले जाते.
8 / 11
नाश्त्याला काय करायचे? विचारल्यावर लहान मुले पटकन उत्तर देतात, आंबोळी. कोकणात घरी पाहुणे आले की नाश्त्याला आंबोळी ठरलेली असते. तांदूळ आणि विविध डाळी आंबवून त्या वाटून घ्यायच्या. त्याच्या आंबोळ्या लावायच्या आणि चटणीशी खायच्या. मात्र काळ्या वाट्याची उसळ असेल तर मग वाहह!! अत्यंत चविष्ट असा हा पदार्थ घरोघरी केला जातो.
9 / 11
थंडगार गुलाबी सोलकढी संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. कोकणात नारळाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. जिथे जे पिकते तिथे ते खाल्ले जाते, त्यामुळे कोकणात नारळाचे पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. नारळाच्या दुधाची आमसूल घातलेली आंबट तिखट अशी सोलकढी म्हणजे पोटाला थंडावा.
10 / 11
पावसाळ्यात सगळीकडे जेव्हा बटाटा वडा तळला जातो, तेव्हा कोकणातल्या एखाद्या घरात भाजणीचा वडा तळीत सोडतात. खमंग, खुसखुशीत भाजणीचे वडे म्हणजे निव्वळ सुख. तांदूळ, विविध डाळी यांचे पीठ दळून त्या भाजणीचे भोकाचे वडे तळले जातात. हे वडे झणझणीत चटणीशी किंवा काळ्या वाटाण्याच्या उसळीसोबत खातात.
11 / 11
पिठलं भाकरी म्हणजे महाराष्ट्राची शान. बेसन पिठलं सगळ्यांना माहिती आहे, मात्र हे पौष्टिक आणि लाजबाब कुळीथाचे पिठलं फार लोकांना माहिती नसते. कोकणात गरमागरम भातावर तुपाची धार सोडून त्यावर कुळीथाचे घट्ट पिठलं घ्यायचे. पावसाळ्यासाठी अगदी मस्त पदार्थ आहे.
टॅग्स :konkanकोकणfoodअन्नRecipeपाककृतीCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.Maharashtraमहाराष्ट्र