अर्जुन तेंडुलकरच्या लग्नसोहळ्यासाठी साक्षी धोनीनं घातलेल्या ड्रेसची पहाडी गोष्ट, पारंपरिक कलेचा केला सन्मान...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2026 18:22 IST2026-03-17T18:14:02+5:302026-03-17T18:22:17+5:30

chamba rumal inspired outfit sakshi dhoni : himachal pradesh chamba rumal embroidery dress : 'चंबा रुमाल' या कलेत कापडावर रंगीबेरंगी धाग्यांनी अतिशय सूक्ष्म आणि आकर्षक डिझाइन्स तयार केले जातात.

भारतीय क्रिकेटचा दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनी आणि त्याची पत्नी साक्षी धोनी नेहमीच त्यांच्या साध्या पण स्टायलिश लूकमुळे चर्चेत असतात. नुकतेच सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकरच्या लग्नात साक्षीचा (sakshi dhoni chamba rumal kurta set) पारंपरिक आणि एलिगंट लूक सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा ठरला. या खास प्रसंगी साक्षीने हिमाचल प्रदेशातील प्रसिद्ध ‘चंबा रुमाल’ कलाकुसरीने सजवलेला सुंदर ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसवरील नाजूक भरतकाम, रंगीबेरंगी डिझाइन्स आणि पारंपरिक टच यामुळे तिचा लूक अत्यंत रॉयल आणि आकर्षक दिसत होता.

साक्षी धोनीसाठी हा खास सूट प्रसिद्ध डिझाइनर हिना कोचर यांनी श्यामली अरोडा यांच्या सहकार्याने तयार केला आहे. चंबा रुमालाची वैशिष्ट्ये या सूटमध्ये हुबेहूब उतरवण्यात आली आहेत. ज्याप्रमाणे पारंपारिक चंबा रुमालावर रंगीबेरंगी धाग्यांनी हातानेच विणकाम केले जाते, तसेच या सूटवरही बारीक नक्षीकाम करण्यात आले आहे. यामध्ये विशेषतः नैसर्गिक गोष्टींचे विविध 'मोटिफ्स' हाताने विणले आहेत.

चंबा रुमाल (Chamba Rumal) ही हिमाचल प्रदेशातील चंबा भागातील एक पारंपरिक भरतकामाची कला आहे. या कलेत कापडावर रंगीबेरंगी धाग्यांनी अतिशय सूक्ष्म आणि आकर्षक डिझाइन्स तयार केले जातात. एकेकाळी ही कला केवळ चंबाच्या शाही घराण्यातील महिलांपुरतीच मर्यादित होती. राजघराण्यातील स्त्रिया फावल्या वेळात अशा प्रकारचे रुमाल विणत असत. मात्र, हळूहळू या कलेची ओळख सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली आणि आज ती हिमाचलच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनली आहे. विशेष प्रसंगी, लग्नसमारंभात किंवा धार्मिक विधींमध्ये भेट म्हणून हे रुमाल दिले जात. त्यामुळे याला केवळ सजावटीचं नव्हे तर भावनिक आणि सांस्कृतिक महत्त्वही आहे.

सुरुवातीला निष्णात चित्रकार 'मलमल'च्या कापडावर कोळशाने अतिशय सूक्ष्म आराखडा तयार करतात. त्यानंतर घरातील स्त्रिया त्या चित्रात सुईच्या साह्याने रंग भरतात. म्हणूनच याला "कापडावरची चित्रकला" म्हटले जाते. यामध्ये वापरलेला 'मलमल'चा तुकडा इतका तलम असतो की पूर्वी तो एका अंगठीतून आरपार निघू शकत असे.

या रुमालात वापरल्या जाणाऱ्या टाक्याला 'दांडी' टाका किंवा 'सॅटिन स्टिच' (Satin Stitch) असेही म्हणतात. याचे वैशिष्ट्य असे की, सुई कापडाच्या एका बाजूने घातली की ती दुसऱ्या बाजूने अशा पद्धतीने काढली जाते की दोन्ही बाजूंना धाग्याची लांबी आणि मांडणी समान राहते. यामध्ये उलट बाजूला (Reverse side) कुठेही धागा ओढलेला किंवा गाठ (Knot) मारलेली नसते.

पूर्वी या रुमालात केवळ नैसर्गिक रंगांचा वापर केला जात असे. प्रामुख्याने लाल, निळा, पिवळा असे रंग वापरले जात असे. पूर्वी हे रुमाल भेटवस्तू म्हणून दिले जात, विशेषतः लग्नात वधूला दिला जाणारा ‘शगुन’ म्हणून त्याला खूप महत्त्व होतं. तसेच देवपूजेतही याचा वापर केला जात असे.

चंबा रुमालाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यावर साकारले जाणारे विषय. यावर केवळ पाने - फुलेच नाही, तर यात आपल्या पौराणिक कथा अत्यंत सुंदररीत्या मांडल्या जातात. प्रामुख्याने कृष्णलीला, महाभारत आणि रामायणातील विविध प्रसंग सुई - धाग्याने कापडावर जिवंत केले जातात. साक्षी धोनीच्या ड्रेस देखील याच कलेचे उत्तम आणि सुंदर उदाहरणं असून, मॉडर्न फॅशनमध्ये भारतीय परंपरेचा हा मेळ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे.

चंबा रुमालाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे “दो-रुखा टाका” (Double Satin Stitch). यामुळे रुमालाच्या दोन्ही बाजूंनी डिझाइन अगदी सारखंच दिसतं. ही कला पूर्णपणे हाताने केली जाते, त्यामुळे प्रत्येक डिझाइन युनिक असतं. यासाठी खूप संयम, कौशल्य आणि वेळ लागतो. म्हणूनच प्रत्येक चंबा रुमाल हा एक युनिक आर्टपीस मानला जातो.

आजकाल Chamba Rumal ही कलाकुसर फक्त रुमालापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. साड्या, सूट, दुपट्टे आणि जॅकेट्समध्येही याचा वापर केला जातो. साक्षी धोनीच्या सूटमुळे या कलेला ग्लोबल प्लॅटफॉर्मवर नवीन ओळख मिळाली आहे. आज जागतिक फॅशन डिझायनर्स या कलेचा वापर साड्या, ड्रेस आणि घराच्या डेकोरमध्ये करत आहेत.