केसांतला गुंता काढताना डोळ्यात पाणीच येतं? ८ टिप्स- गुंता सहज निघेल -केसही तुटणार नाहीत..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2023 14:10 IST2023-02-28T13:57:31+5:302023-02-28T14:10:02+5:30
8 Ways To Detangle Your Hair Without Causing Damage : केसात फार गुंता झाला की गुंता काढताना जीव मेटाकुटीला येतो, त्यासाठी हे ८ उपाय- त्रास होईल कमी

आपल्यापैकी अनेक जणांना केसांच्या भरपूर समस्या असतात. केसांचा वारंवार गुंता होणे ही त्यापैकी सर्वात कॉमन असणारी एक समस्या आहे. केस लहान असो किंवा लांब त्यात कमी अधिक प्रमाणात गुंता होतोच. वेगवेगळ्या हेअर स्टाइल्स, सतत आयनिंग किंवा ड्रायरचा करण्यात येणारा वापर, याशिवाय इतर हेअर स्टायलर टूल्सचा वापर यामुळे केसांचा गुंता होतो. हा गुंता सोडवताना केस तुटतात एवढंच नव्हे तर केसांचा लूकही खराब होतो. केसांचा गुंता सोडवत असताना खूप त्रास होतो त्याचबरोबर खूप केसही गळतात. अशावेळी केसांचा गुंता सोडवणे खूप कठीण होऊन बसते. अशा परिस्थितीत केसातील गुंता सोडवण्यासाठी काही टिप्स फॉलो करा(8 Ways To Detangle Your Hair Without Causing Damage).
१. मोठ्या दातांचा कंगवा वापरा :-
केसांमध्ये होणारा गुंता सोडविण्यासाठी मोठ्या दातांचा कंगवा वापरावा. मोठ्या दातांच्या कंगव्याने केसांत झालेला गुंता सहज निघेल. या प्रकारचा कंगवा वापरल्याने केसांना इजा न होता पटापट गुंता सोडण्यास मदत होईल.
२. डिटॅगल्स प्रॉडक्सचा वापर करावा :-
जर आपल्या केसांत भरपूर गुंता झाला आहे, आणि केवळ फणीच्या मदतीने तो सोडविणे कठीण आहे. असे वाटल्यास लिव्ह इन कंडिशनर किंवा डिटॅगल्स स्प्रे चा वापर करावा. यामुळे आपले केस कमी तुटले जाऊन पटकन केसांतील गुंता सुटेल.
३. बोटांच्या मदतीने गुंता सोडवा :-
केसांतील गुंता सोडविण्यासाठी कंगवा किंवा ब्रशचा वापर करण्यापूर्वी आपल्या बोटांच्या मदतीने गुंता सोडवावा. कंगवा किंवा ब्रशने केसांचा गुंता सोडविताना भरपूर केस तुटण्याची शक्यता असते. यामुळे केसांचा गुंता सोडविण्यासाठी कंगवा किंवा ब्रशचा वापर करण्यापूर्वी आपल्या हातांच्या बोटांच्या मदतीने गुंता सोडवावा.
४. केसांचे लहान भागात विभाजन करा :-
गुंता सोडवताना जिथे गुंता झाला आहे त्या भागातील सगळेच केस एकत्र घेऊ नका. त्या भागातील केसांचे लहान भागात विभाजन करून मगच गुंता सोडवा. केसांचा गुंता सोडवताना केस खेचून, ओढून, ताणून गुंता सोडविण्याचा प्रयत्न करु नका. त्यामुळे केसांच्या मुळांना इजा होऊन ते तुटण्याचे प्रमाण वाढू शकते. यामुळेच थोड्या थोड्या केसांचे मिळून वेगवेगळे भाग तयार करुन मग गुंता सोडवायला घ्यावा .
५. हळुवारपणे गुंता सोडवा :-
केसांचा गुंता सोडवताना, हळुवारपणे केस न ओढता गुंता सोडवा. जर आपल्या केसांत भरपूर गुंता होऊन केसांची मोठी गाठ पडली असेल. अशावेळी, कंगव्याने गुंता खेचण्याऐवजी हळुवारपणे गुंता सोडविण्याचा प्रयत्न करावा.
६. केसांच्या मुळांपासून गुंता सोडवण्याची चूक करु नका :-
केसांच्या गुंता सोडवताना सर्वप्रथम केसांच्या खालच्या बाजूने गुंता सोडवायला सुरुवात करावी. केसांच्या खालच्या बाजूने केसांची गुंता सोडवत हळुहळु वर मुळांजवळ येऊन हलक्या हाताने गुंता सोडवावी. केसांच्या वरच्या बाजूने म्हणजेच मुळांपासून गुंता सोडवण्याची चूक करु नका. सगळ्यात आधी खालच्या बाजूने गुंता सोडवत हळुहळु वर जावे.
७. केस ओले असताना गुंता सोडवू नका :-
केस ओले असताना ते खूप कमजोर असतात. त्यामुळे केस ओले असताना केसांचा गुंता सोडविण्याचा प्रयत्न करु नये. यामुळे केस ओले असताना गुंता सोडविल्यास भरपूर केस तुटण्याची शक्यता असते. केस सुकेपर्यंत वाट पहावी व केस संपूर्ण सुकल्यावरच केसांचा गुंता सोडवा.
८. तेल लावणे आवश्यक :-
केस धुतल्यानंतर बहुतेक लोकांच्या केसांत गुंता होतात. अशावेळी केस धुण्यापूर्वी केसांना तेलाने चांगले मसाज करा. आपण नारळाच्या खोबरेल किंवा बदामाच्या तेलाचा वापर करु शकता. केस धुण्यापूर्वी केसांना तेल लावण्याने केसांत फारसा गुंता होत नाही.