कॅल्शियमचा सुपर डोस असणारे ७ पदार्थ, दूध-पनीर-चीज न खाताही मिळेल भरपूर कॅल्शियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2023 01:40 PM2023-10-25T13:40:04+5:302023-10-25T13:48:02+5:30

काही जणांना विशेषत: लहान मुलांना दूध प्यायला अजिबात आवडत नाही. काही जणांना दुग्धजन्य पदार्थ आवडत नाहीत. अशा लोकांनी कॅल्शियम मिळण्यासाठी पुढे सांगितलेले काही पदार्थ खावेत.

हे पदार्थ नियमितपणे खाल्ल्यास भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते, अशी माहिती आहारतज्ज्ञांनी इन्स्टाग्रामच्या dietitian_manpreet या पेजवर शेअर केली आहे.

यापैकी सगळ्यात पहिला पदार्थ आहे रागी किंवा नाचणी. नाचणी सत्त्व लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठीच पौष्टिक आहे. नाचणीच्या पिठाचे थालिपीठ, पराठे, डोसे तुम्ही आहारात घेऊ शकता.

दुसरा पदार्थ आहे राजगिरा. त्यामुळे राजगिरा लाह्या, चिक्की, लाडू असे पदार्थ घरात कायम ठेवावेत.

खसखशीतूनही भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं. त्यामुळे वेगवेगळ्या चटण्या, भाज्यांचे मसाले यामध्ये खसखशीचा वापर वाढवावा.

तीळ आपण संक्रांतीच्या काळातच जास्त खातो. पण तिळातूनही भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळते. त्यामुळे तिळाचा कूट नेहमी करून ठेवावा आणि तो भाज्यांमध्ये वापरावा. तसेच तिळाची चटणीही तुम्ही नियमितपणे खाऊ शकता.

सब्जा देखील कॅल्शियमचा खूप चांगला स्त्रोत आहे. ज्यूस, फ्रुट शेक यामाध्यमातून तुम्ही सब्जा खाऊ शकता.

भरपूर कॅल्शियम देणारा आणखी एक पदार्थ आहे कुळीथ. कुळीथाचे थालिपीट, पराठे आहारात नेहमीच असावेत.

कॅल्शियम मिळण्यासाठी मेथ्या देखील खायला पाहिजेत. रोजच्या वरणासाठी डाळ शिजवताना त्यात थोड्या मेथ्या टाकाव्या. जेणेकरून त्या रोज खाल्ल्या जातील. शिवाय वेगवेगळ्या पदार्थांतून मेथीची भाजीही आहारात नियमितपणे असावी.