तुमच्या राशीचे दुर्गुण कोणते ते वाचा आणि त्यावर मात करा.

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: January 14, 2021 07:49 PM2021-01-14T19:49:58+5:302021-01-14T22:50:01+5:30

परिपूर्ण कोणीही नसते. प्रत्येकात काही ना काही उणिवा आहेत. त्याचवेळेस जमेची बाजूही आहे. आपल्या गुणांनी अवगुणांवर आपल्याला मात करता येते. परंतु, अनेकदा आपण प्रयत्न करूनही आपले काही दोष आपल्याला सुधारता येत नाहीत. तो आपल्या स्वभावाचा दोष असतो, की राशीचा? हे जाणून घेणे उचित ठरेल. त्यानुसार ज्योतिषशास्त्रात उपाय सुचवले आहेत, त्यांचाही अवलंब करता येईल.

या राशीच्या लोकांना दिखाव्याची आणि पुढे पुढे करण्याची सवय असते. या सवयीमुळे ते प्रकाशझोतात राहतात, ही जमेची बाजू असली, तरीदेखील या स्वभावामुळे ते कळत नकळतपणे अनेकांना दुखवत असतात. दुसऱ्यांना दुखावून पुढे जाण्यात आनंद नाही. तुमच्यात असलेली ऊर्जा योग्य पद्धतीने संक्रमित केलीत, तर लोक आपणहून तुमचे नेतृत्व स्वीकारतील आणि तुम्हाला आपोआप पुढे जाण्याची संधी मिळेल.

या राशीचे लोक संशयी स्वभावामुळे सतत सावध असतात. परंतु, सावध राहण्याच्या विचारामुळे ते अति विचार करू लागतात. अकारण डोकेदुखी ओढावून घेतात. अशा लोकांनी विचारांची विभागणी केली पाहिजे. कोणत्या गोष्टीचा किती प्रमाणात विचार करायचा, याचे स्वत:वर बंधन आखून घेतले पाहिजे.

अतिशय वाईट श्रोता अशी मिथुन राशीच्या लोकांची कुख्याती आह़े. हे लोक समोरच्याचे बोलणे संपायच्या आत आपल्या विचारांचे प्रगटीकरण सुरू करतात. अशा लोकांनी जास्तीत जास्त शांत बसण्याचा आणि समोरच्याचे म्हणणे पूर्ण ऐकून घेण्याचा सराव करायला हवा.

कर्क राशीचे लोक बहुतकरून गोडखाऊ असतात. हा गोडवा बोलण्यात असो, नसो, परंतु आहारात पुरेपूर असतो. जीभेला चांगल्या वाटणाऱ्या गोष्टी शरीराला चांगल्या नसतात, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आपल्या जीभेचे चोचले पुरवणे थांबवा आणि गोडवा आणायचाच असेल, तर थोडा आपल्या दैनंदिन व्यवहारात आणण्याचा प्रयत्न करा.

या राशीचे लोक हुकूमत गाजवण्यासाठी जन्माला आल्याप्रमाणे वागतात. जंगलाचा राजा सिंह असतो, हे कबुल आहे, परंतु आपण मानवी वस्तीत राहतो. इथे सिंहासारखे वर्तन करून कसे चालेल? म्हणून या राशीच्या लोकांनी थोडा स्वत:च्या रागावर आवर घालायला हवा. या राशीच्या लोकांना जितके स्वत:चे आणि स्वत:च्या कामाचे कौतुक वाटते, तसे तसूभर कौतुक दुसऱ्याचेही करायला शिकले पाहिजे.

कन्या राशीच्या लोकांचा चांगल्या राहणीमानाकडे जास्त कल असतो. एवढेच नाही, तर प्रत्येक गोष्ट चांगली असावी याऐवजी चांगली दिसावी, यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. परंतु, या स्वभावामुळे ते स्वत:ला आभासी जगात रमवतात आणि वास्तवाचे भान विसरतात. अशा लोकांनी वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी लोकाभिमुख झाले पाहिजे.

तुळ राशीचे लोक संतुलित व्यवहारासाठी ओळखले जातात. परंतु, त्यांना शानशौकीची अधिक आवड असते. परंतु, दरवेळी उत्तमोत्तम गोष्टींचा शोध घेण्याच्या नादात आपण जवळच्या साध्या पण चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता. मग ती कोणी वस्तू असो नाहीतर व्यक्ती! तुमच्या व्यवहारातला संतुलितपणा स्वभावात आणण्याचाही प्रयत्न करा, त्याचा तुमच्या व्यक्तीमत्व विकासावर चांगला परिणाम होईल.

या राशीचे लोक मनात दीर्घकाळ शत्रूत्व ठेवतात. त्याचा त्रास समोरच्याला नाही, तर याच राशीच्या जातकांना होतो. या लोकांनी प्रेमळ माणसांच्या सहवासात जास्त राहिले पाहिजे. त्यामुळे त्यांच्यात सकारात्मक बदल होतील आणि त्यांच्याही मनातून इतरांबद्दलचा राग कमी होण्यास मदत होईल. रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना स्वत:ला मेहनत घ्यावी लागेल. यासाठी चिंतनाचा तसेच लिखाणाचा त्यांना फायदा होईल.

धनु राशीचे लोक अति स्पष्टवक्ते असतात. त्यांच्या या स्वभावामुळे समोरचे लोक दुखावले जात आहेत, याची त्यांना कल्पनाही नसते. अशा लोकांनी सत्याचा आग्रह जरूर धरावा, जोडीला शब्दांची धार थोडी बोथट केली, की सगळे ठीक होईल.

या राशीचे लोक अति कष्टाळू असतात. मात्र, हे कष्ट केवळ काही मिळवण्यासाठी नसून, सतत काहीतरी गमावण्याची भीती त्यांच्याठायी असते. त्या भीतीने ते आजचा क्षण गमावून बसतात आणि भविष्याची तजवीत करत राहतात. या लोकांनी वर्तमानावर भर देऊन प्रत्येक क्षणाचा आस्वाद घेतला पाहिजे.

कुंभ राशीचे लोक स्वातंत्र्य गमावण्याच्या भीतीने नवीन नाती जोडायला घाबरतात. मी आणि माझे एवढेच त्यांचे विश्व असते. अशामुळे त्यांचे विश्व संकुचित होत जाते. अशा लोकांनी आयुष्याचा आस्वाद घेण्यासाठी नवीन नाती जोडली पाहिजेत. स्वत:वर करतो, तसे इतरांवर प्रेम करायला शिकले पाहिजे. प्रेम दिल्याने वाढत जाते, कमी होत नाही.

फिशटँकमध्ये ठेवलेला मासा ज्याप्रमाणे तिथल्या तिथे घुटमळत राहतो, त्याप्रमाणे मीन राशीतले लोक आपण आखलेल्या चौकटीत स्वत:ला बंदिस्त करून ठेवतात. परंतु या लोकांनी चौकटीपलीकडचे जग बघायला, अनुभवायला शिकले पाहिजे. फिशटँक हे आपले विश्व न मानता अथांग सागर हे आपले ध्येय आहे, अशी विचारधारा तयार केली पाहिजे.