“...आता मला संसदेत गेलंच पाहिजे”; रॉबर्ट वाड्रांच्या राजकीय एन्ट्रीला कोण लावतंय ब्रेक? जाणून घ्या

By प्रविण मरगळे | Published: January 8, 2021 02:44 PM2021-01-08T14:44:21+5:302021-01-08T14:47:41+5:30

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या ५२ वर्षीय जावई रॉबर्ट वाड्रा यांनी राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणातील तपास यंत्रणांच्या चौकशीत अडकलेले वाड्रा यांनी सांगितले की, माझा छळ होतोय, त्यामुळे मला संसदेत पोहचलं पाहिजे, असं वाटतं, "मी अशा कुटुंबाशी संबंधित आहे ज्यांच्या अनेक पिढ्यांनी या देशातील लोकांची सेवा केली आहे आणि देशासाठी शहीदही झाले आहे. मी पाहिलंय, शिकलोय, प्रचार केलाय देशाच्या वेगवेगळ्या भागात फिरलोय, त्यामुळे या शक्तीसोबत लढण्यासाठी मला संसदेत असणं आवश्यक आहे असं मला वाटतं.

वाड्रा यांनी प्रथमच राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली असं नाही तर यापूर्वी बर्‍याचदा त्यांनी हे बोलून दाखवलं आहे. तर प्रश्न असा उद्भवतो की त्यांना कोण रोखत आहे आणि का? स्वत: प्रियंका गांधींना वाटतंय त्यांच्या नवऱ्याने राजकारणापासून दूर राहावं? चला जाणून घेऊया काही रंजक गोष्टी ...

रॉबर्ट वाड्रा म्हणाले की, आता स्पष्टपणे वाटते की मी बराच काळ लढाई लढली आहे. मी स्वत: ला समजून घेतलंय, ते सतत मला त्रास देतात कारण मी राजकारणात नाही. मी नेहमीच राजकारणापासून दूर राहिलो आहे, योग्य वेळी निर्णय घेऊ असं वाड्रा यांनी सांगितले. "जेव्हा मला एखादा मतदारसंघ दिसेल जेथे लोक माझे प्रतिनिधित्व करण्यासाठी मतदान करतील आणि मी त्या परिसरातील लोकांच्या जीवनात बदल घडवून आणू आणि जर माझे कुटुंब ते स्वीकारेल."

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे राहुल गांधींनी कॉंग्रेसचे अध्यक्षपद सोडल्यानंतर सोनिया गांधींनी अंतरिम अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली, तेव्हा कॉंग्रेसच्या मुख्यालयाबाहेर होर्डिंग्ज लावण्यात आली होती. या होर्डिंगमध्ये रॉबर्ट वाड्रासोबत राहुल आणि प्रियांकाचेही फोटो होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्येही पोस्टर झळकवण्यात आले होते ज्यात वाड्रा यांना निवडणूक लढविण्यासाठी आवाहन करण्यात आलं होतं, त्याआधी २०१६ मध्ये कॉंग्रेसने आयोजित केलेल्या ‘प्रजातांत्र बचाओ मार्च’ नावाच्या पोस्टरमध्ये वाड्रा राहुल गांधींसोबत दिसले होते.

रॉबर्ट वाड्रा म्हणाले की, संपूर्ण कुटुंब विशेषत: प्रियंका त्याच्या निर्णयांचे समर्थन करते. "प्रियंका नेहमीच साथ देते, मी संपूर्ण कुटूंबाबद्दल बोलत आहे आणि जेव्हा ते परवानगी देतील तेव्हा मी राजकारणात येऊ शकतो आणि राजकीय क्षेत्रात माझ्या मुद्द्यांसाठी संघर्ष करू शकतो." वाड्रा यांनी रायबरेली आणि अमेठी येथे प्रचार केला आहे आणि मुरादाबाद येथे त्यांचे बालपण गेल्याने लोकांना मी तेथे राहावं असं वाटतं, म्हणून त्यांनी होर्डिंग्ज लावले होते.

फेब्रुवारी २०१९ मध्ये वाड्रा यांनी टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. त्यात विचारलं की, तुम्ही एक चांगले राजकारणी बनू शकता असं तुमच्यात काय आहे? असं विचारले असता ते म्हणाले, “माझं लग्न भारतातील राजकारणामधील पहिल्या कुटुंबात झालं आहे. मी शिकण्याच्या गोष्टीत माहीर आहे, कदाचित माझ्याकडे कौशल्य आहे, परंतु लोकांची इच्छा असेल तेव्हाच मी राजकारणात प्रवेश करेल. तसेच, माझ्या कुटुंबाची संमतीदेखील तेथे असणे आवश्यक आहे. माझा राजकारणातील प्रवेश पूर्णपणे नियोजित असेल असंही त्यांनी सांगितले होते.

६ फेब्रुवारी २०१२ रोजी उत्तर प्रदेशच्या अमेठी येथे वाड्रा म्हणाले, "लोकांना हवे असेल तर मी राजकारणात येण्याच्या विरोधात नाही." पण त्यावेळी प्रियंका गांधींनी माध्यमांवर वक्तव्याचा विपर्यास करण्याचा आरोप करताना पतीच्या राजकारणात प्रवेश होण्याची शक्यता नाकारली होती, वाड्रा यांच्या विधानाला उत्तर देताना त्या म्हणाले, "पाहा, तुम्ही (माध्यमातील लोकांनी) आजूबाजूला विचारलं असेल आणि आता तुम्ही याचा चुकीचा अर्थ लावत आहात. रॉबर्ट जी आपल्या व्यवसायात खूप आनंदित आहेत आणि मला असे वाटते की ते असे म्हणाले असतील ते त्यांच्या व्यवसायात आनंदी आहेत. "

तथापि, प्रियंकाच्या या टीकेनंतर जेव्हा मीडियाने पुन्हा वाड्रा यांना प्रश्न केला तेव्हा ते म्हणाले, "मी गेल्या १५ दिवसांपासून अमेठी आणि रायबरेलीमध्ये आहे, मला माहित आहे की माझ्यामध्ये बदल घडवून आणण्याची क्षमता आहे. कोणत्याही गोष्टीसाठी योग्य वेळ आणि जागा असले असा माझा विचार आहे. त्यामुळे हे स्पष्ट आहे की प्रियांकाची नाराजी असूनही वाड्रा यांचे राजकारणाबद्दल आकर्षण कमी झाले नाही.

मग वाड्राच्या राजकीय आकांक्षेमध्ये कोणते अडथळे आहेत? प्रियंका स्वत: आपल्या पतीला राजकारणात येण्यापासून रोखत आहे? जर हो तर? या प्रश्नांची उत्तरे इतकी सोपी नाहीत, पण सर्वसामान्यांच्या म्हणण्यानुसार जमीन व्यवहारात अडकलेल्या वाड्राचा राजकारणात प्रवेश होताच घराणेशाही आणि भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून कॉंग्रेसवर हल्ला करणाऱ्या भाजपाला आयती संधीच मिळेल, गांधी घराण्याला घराणेशाही आणि भ्रष्टाचारी राजकारणाचे पोषक म्हणून सिद्ध करण्यासाठी भाजपाला आणखी काही मदत मिळेल.

दुसरीकडे, प्रियांका गांधींच्या राजकारणावर परिणाम होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर व्यवहार अशा प्रकरणांमध्ये प्रियंका त्यांचे पती वाड्राच्या वतीने स्पष्टीकरण देत राहिल्यास स्वत:च्या राजकीय महत्त्वाकांक्षेला धक्का पोहचणं साहजिक आहे.