...जेव्हा शरद पवारांनी चतुराईनं वाचवली होती आबांची आमदारकी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 05:31 PM2019-12-12T17:31:40+5:302019-12-12T17:35:37+5:30

दिवंगत आर. आर. पाटील यांनी एका कार्यक्रमात मनोहर जोशींवरील आरोपांचा किस्सा सांगितला होता. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजकीय चार्तुयाचा यातून अनेकांना अनुभव आला.

विधिमंडळात एकदा आर. आर. पाटील यांनी मनोहर जोशी यांच्यावर सहारा प्रकरणात आरोप केले. त्यावेळी त्यांनी १०० कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आकड्याचा उल्लेख केला.

यानंतर शरद पवारांनी आबांना बोलावून घेतलं आणि याबद्दल विचारणा केली. त्यावर विधिमंडळात केलेल्या आरोपांवरुन मानहानीचा दावा दाखल होत नाही. त्यामुळे आरोप केल्याचं आबांनी पवारांना सांगितलं. त्यानंतर पवारांनी पुरावे आहेत का, अशी विचारणा केली. त्यावर आबांनी नकारार्थी उत्तर दिलं.

विधिमंडळात केलेल्या आरोपांवरुन मानहानीचा दावा दाखल केला जात नाही, हे ठीक आहे. पण यावरुन प्रिव्हिलेजचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो. तुमची आमदारकी जाऊ शकते, असं पवार यांनी आबांना सांगितलं. त्यावर मग माझं चुकलंय. आता काय करायचं, असा प्रश्न आबांनी पवारांना विचारलं.

अडचणीत आलेल्या आबांना पवारांनी मोलाचा सल्ला दिला. विधिमंडळात तुम्ही केलेलं भाषण कन्फर्म करण्यासाठी त्या भाषणाची प्रत तुमच्याकडे येईल. त्यावेळी १०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याच्या चर्चा बाहेर आहेत, असं एक वाक्य त्यात घाला, असं पवारांनी आबांना सांगितलं.

पवारांचा सल्ला आबांनी लगेच अंमलात आणला. त्याचा परिणामही लगेच दिसला. मनोहर जोशींनी आबांविरोधात प्रिव्हिलेज आणण्याचा प्रयत्न केला. मात्र विधानसभेच्या सचिवांनी त्यांचं लक्ष शेवटच्या ओळीकडे वेधलं. अशा चर्चा बाहेर सुरू आहेत, या वाक्याची भर घातल्यानं आबांची आमदारकी वाचली.