शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तेव्हा खुद्द नेहरूंनी दिली होती मनमोहन सिंग यांना राजकारणात येण्याची ऑफर...

By बाळकृष्ण परब | Published: September 26, 2020 10:32 AM

1 / 10
भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा आज जन्मदिन. एक अर्थशास्त्रज्ञ, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, देशाचे वित्तमंत्री आणि पंतप्रधान म्हणून डॉ. सिंग यांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे. वाढदिवसानिमित्त त्यांचे जीवन आणि कारकिर्दीवर टाकलेली एक नजर.
2 / 10
१९३२ मध्ये आजच्याच दिवशी सध्या पाकिस्तानमध्ये असलेल्या पंजाब प्रांतातील एका गावात डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म झाला होता. मात्र त्यांची जन्मतारीखी निश्चितपणे कुणालाच माहिती नाही. त्यांच्या आजीने त्यांना शाळेत दाखल करताना २६ सप्टेंबर ही तारीख जन्मतारीख म्हणून सांगितली. तेव्हापासून तीच त्यांची जन्मतारीख बनली.
3 / 10
डॉ. मनमोहन सिंग यांचे बालपण अनेक आव्हानांचा सामना करत गेले. ते लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या आजीने त्यांचा सांभाळ केला. मात्र त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही. दरम्यान, फाळणीच्या धामधुमीत त्यांना आपली जन्मभूमी सोडून भारतात यावे लागले.
4 / 10
मात्र परिस्थितीसमोर डॉ. सिंग यांनी हार मानली नाही. लहानपणी शिक्षणासाठी त्यांनी मैलोनमैल पायपीट केली. पुढे डॉ. सिंग यांनी केंब्रिज विद्यापीठामधून उच्चशिक्षण घेतले. जीवनात आपल्याला मिळालेल्या यशाचे श्रेय ते शिक्षणाला देतात.
5 / 10
उच्चशिक्षित असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थशास्त्रासह अनेक विषयांमधील मानद पदव्या मिळवल्या आहेत. यामध्ये डॉक्टर ऑफ लॉ, डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ, डॉक्टर ऑफ सोशल सायन्सेस यासह अनेक विद्यापीठांनी त्यांना डॉक्टर ऑफ लेटर्सची पदवी दिली आहे. तसेच परदेशी विद्यापीठांनीसुद्धा त्यांना मानद पदव्या दिल्या आहेत. जगातील सर्वात उच्चशिक्षित पंतप्रधानांमध्ये डॉ. सिंग यांची गणना होते.
6 / 10
अर्थशास्त्रत्र म्हणून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या डॉ. मनमोहन सिंग यांनी नंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर १९९१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहा राव यांनी त्यांना राजकारणात आणत वित्तमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर त्यांनी मांडलेल्या ऐतिहासिक अर्थसंकल्पामुळे देशाला आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत झाली होती.
7 / 10
डॉ. सिंग यांना नरसिंह राव यांनी राजकारणात आणले असले तरी त्यांना राजकारणात येण्याची ऑफर फार आधीच मिळाली होती. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डॉ. मनमोहन सिंग यांना १९६२ मध्ये मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिले होते. मात्र त्यावेळी मनमोहन सिंग यांनी हे निमंत्रण स्वीकारले नव्हते. त्यावेळी ते अमृतसरमधील महाविद्यालयात शिकवत होते. मात्र शिक्षकी पेशा सोडण्यास ते तयार झाले नाहीत.
8 / 10
२००४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचा अनपेक्षितरीत्या पराभव झाला होता. त्यानंतर सत्तेवर आलेल्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएच्या नेत्या सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे अनपेक्षितरीत्या पंतप्रधानपदाची माळ डॉ. मनमोहन सिंग यांच्या गळ्यात पडली.
9 / 10
उच्चशिक्षित असलेल्या मनमोहन सिंग यांच्याबाबत आश्चर्यकारक बाब म्हणजे त्यांना हिंदी वाचता येत नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा हिंदीतून भाषण करण्याची गरज भासल्यावर ते उर्दूमधून लिहून घेत असत. तसेच भाषण देण्यापूर्वी त्याचा सराव करत असत.
10 / 10
मनमोहन सिंग हे कमकुवत पंतप्रधान असल्याचा आरोप त्यांच्या विरोधकांकडून नेहमीच करण्यात आला. मात्र त्यांनी घेतलेले अनेक निर्णय हे त्यांच्या कणखरतेची साक्ष देणारे ठरले. २००८ मध्ये झालेल्या भारत-अमेरिका अणुकरारासाठी त्यांनी आपले सरकार पणाला लावले होते. तसेच त्यांच्या दुरदृष्टीमुळेच भारत विकसनशील देशांमधून विकसित देशांच्या दिशेने वाटचाल करू लागला.
टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूPoliticsराजकारणcongressकाँग्रेसIndiaभारत