Tokyo Olympic, Aditi Ashok : 'वंडर गर्ल' अदिती अशोकनं जागवल्या रौप्यपदकाच्या आशा; भारताला मिळू शकते अनपेक्षित पदक!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 07:26 PM2021-08-06T19:26:32+5:302021-08-06T19:59:23+5:30

भारतीय महिला हॉकी संघाचा कांस्यपदकाच्या लढतीत पराभव, कुस्तीपटू बजरंग पुनिया सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाद... शुक्रवारी टोकियोतून अशा बातम्या येत असताना एक आश्चर्याची अन् सर्वांना सुखद धक्का देणारी कामगिरी भारताची गोल्फपटू अदिती अशोकनं केली.

अदिती अशोकनं (India Golfer Aditi Ashok) टोकियो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) इतिहास रचण्याच्या दिशेनं वाटचाल केली आहे. अदितीनं शुक्रवारी तिसऱ्या राऊंडनंतर दुसरा क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेतील चौथा आणि शेवटचा राऊंड शनिवारी होणार आहे. पण खराब हवामानामुळे हा राऊंड झाला नाही तर तिसऱ्या राऊंडपर्यंतच्या स्कोअरच्या आधारावर अदितीला रौप्यपदक दिले जाईल.

अदित्याच्या पुढे सध्या अमेरिकेची गोल्फर नेली कार्डी आहे. तिनं 5 अंडर 198 पॉईंट्सची कमाई केली आहे. कोर्डा अदितीपेक्षा फक्त तीन स्ट्रोकनं आघाडीवर आहे.

अदिती अशोक दुसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेत आहे. २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिला ४१व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

१९९८मध्ये जन्मलेल्या अदिती अशोकनं वयाच्या पाचव्या वर्षापासून गोल्फ खेळण्यास सुरूवात केली. वडील अशोक गुड्लामनू व आई महेश्वरी यांनी अदितीला प्रोत्साहन दिले अन् तिनंही सातत्यपूर्ण कामगिरी केली.

वयाच्या ९व्या वर्षी अदितीनं गोल्फमधील पहिले राष्ट्रीय जेतेपद जिंकले. २०१६मध्ये तिनं व्यावसायिक स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यास सुरूवात केली अन् काही स्पर्धा जिंकल्याही.

२०१६च्या ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेणारी ती सर्वात युवा ( १८ वर्षे) गोल्फपटू होती. टोकियो ऑलिम्पिकपूर्वी मे महिन्यात अदितीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि तिला काही स्पर्धांवर पाणी सोडावे लागले. तिनं कोरोनावर मात केली, परंतु तिच्या प्रकृतीवर त्याचा परिणाम झाला.

तिनं इंडियन ओपन आणि कतार ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावले. जागतिक क्रमवारीत ती सध्या २००व्या स्थानावर आहे.