"ते माझ्यासाठी सर्वात..."; युसूफ डिकेकने सांगितले शूटिंग गियरशिवाय खेळण्याचे कारण By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 06:09 PM 2024-08-05T18:09:09+5:30 2024-08-05T18:22:50+5:30
५१ वर्षीय तुर्की एअर पिस्तूल नेमबाज युसूफ डिकेक पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर सोशल मीडिया स्टार बनले आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये युसूफ डिकेक यांनी त्याची साथीदार सेव्हल इलायदा तरहानसह १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत दुसरं स्थान पटकावत रौप्य पदक जिंकलं. याच स्पर्धेत भारताच्या मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी कांस्यपदकावर निशाणा साधला होता.
या स्पर्धेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तुर्कीचे नेमबाज युसूफ डिकेक चर्चेत आले आहेत. युसूफ यांनी शूटिंग गिअरशिवाय ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
युसूफ हे इस्तंबुल येथील एका गॅरेजमध्ये मेकॅनिकलचे काम करतात. तसेच ते तुर्की मिल्ट्री अँड नॅशनल संघामध्येही खेळतात. पत्नीशी भांडण झाल्यानंतर या खेळात त्यांनी अधिक रस घ्यायला सुरुवात केली.
शूटिंग इव्हेंटमध्ये युसूफ डिकेक हे एक हात खिशात घालून दुसऱ्या हाताने निशाणा साधताना दिसले. यावेळी त्यांनी साधा चष्मा घातला होता आणि त्याच्या अंगावर कोणत्याही प्रकारचे शूटिंग गियर नव्हते. पिस्तुल शूटिंग किटमध्ये गॉगल, ब्लाइंडर आणि एअर प्रोटेक्टर असतात.
पदक जिंकल्यानंतर युसूफ डिकेक यांना शुटींग गिअर का वापरले नाही असा सवाल करण्यात आला होता. त्यावर बोलताना युसूफ डिकेक म्हणाले की, "खरं तर मी ज्या पद्धतीने उभा होतो ती माझ्यासाठी सर्वात सोयीस्कर पोझिशन होती. त्या पोझिशनमध्ये माझं शरीर सर्वात स्थिर होतं."
"जरी मी बाहेरुन फार शांत वाटत होतो तरी माझ्या मनात वादळ सुरु होतं. माझ्या या लूकची एवढी चर्चा होईल असा विचार स्वप्नातही केला नव्हता," असं युसूफ डिकेक यांनी सांगितले.
५१ वर्षीय युसूफ डिकेक यांचे हे पहिले ऑलिम्पिक नाही. २००८ पासून ते ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहेत. त्यांचे ही पाचवी ऑलिम्पिक स्पर्ध आहे. आता त्यांना २०२८ मध्ये सुवर्ण पदक जिंकण्याची आशा आहे.