#Best Of 2018 : सरत्या वर्षातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम क्षण!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 03:46 PM2018-12-24T15:46:41+5:302018-12-24T15:52:29+5:30

2018 वर्ष मावळतीकडे झुकलं आहे. आजपासून बरोबर सातव्या दिवशी आपण 2019चे स्वागत करणार आहोत. 2019चे स्वागत करण्यासाठी सज्ज होत असताना सरत्या वर्षातील काही अविस्मरणीय आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहत आहेत. 2018 हे वर्ष भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी उल्लेखनीय ठरले आहे. हिमा दासचे ऐतिहासिक सुवर्ण, पी. व्ही. सिंधूची विक्रमी भरारी, मनिका बत्रा, एमसी मेरी कोम, विनेश फोगट यांची सुवर्णकागिरी याशिवाय क्रिकेटमधील आपले यश हे सरत्या वर्षाचा आढावा घेताना चटकन डोळ्यासमोर उभे राहत आहे.

न्यूझीलंड येथे झालेल्या 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद, भारतीय क्रीडा क्षेत्राची दणक्यात सुरुवात या जेतेपदाने करून दिली. कर्णधार पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट राखून पराभव केला होता.

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने 26 सुवर्णपदकांसह एकूण 66 पदकांची कमाई केली होती. सुवर्णपदकाच्या बाबतीत भारताची ही तिसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. टेबल टेनिसपटू मनिका बत्राने सर्वाधिक चार पदकं जिंकली, भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि कुस्तीपटू बजरंग पुनिया यांचे सुवर्ण ऐतिहासिक ठरले.

शेतकऱ्याची पोर धावपटू हिमा दासने 20 वर्षांखालील जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला खेळाडू ठरली. आशियाई स्पर्धेतही हिमाने आपले नाणे खणखणीत वाजवले. तिने 400 मीटर स्पर्धेत रौप्यपदक जिंकले, तर 4 बाय 400 मीटर मिश्र रिलेतही तिने रौप्यक्रांती घडवली. महिलांच्या 4 बाय 400 मीटर स्पर्धेत मात्र तिने सुवर्णपदक नावावर केले.

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बंदी घालण्यात आलेल्या चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांनी 2018च्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये कमबॅक केले. महेंद्रसिंग धोनीच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या चेन्नईने अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला नमवून तिसऱ्यांदा आयपीएल जेतेपद पटकावले.

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने जगातील दोन दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्या तोडीसतोड खेळ केला. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये छेत्री अर्जेंटिनाच्या मेस्सीसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे, तर पोर्तुगालचा रोनाल्डो आघाडीवर आहे.

मनिका बत्राने राष्ट्रकुल स्पर्धेत चार पदकांची कमाई करून सर्वांचे लक्ष वेधले. राष्ट्रकुल स्पर्धेत दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशनतर्फे देण्यात येणारा 'Breakthrough Table Tennis Star' हा पुरस्कार जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली.

2018च्या आशियाई स्पर्धेत भारताने सर्वोत्तम कामगिरी करताना 69 पदकं पटकावली. नीरज चोप्राचे सुवर्णपदक ( 88.06 मीटर) हे या स्पर्धेतील लक्षवेधी पदक ठरले. त्याशिवाय मनजीत सिंग आणि जिन्सन जॉन्सन यांनी 800 मीटर शर्यतीत अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले. तजिंदरपाल सिंग तूरने नवा स्पर्धाविक्रम करताना गोळाफेकीत इतिहास घडवला.

कुस्तीपटू विनेश फोगटने आशियाई स्पर्धेत भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली. तिने 50 किलो फ्रिस्टाईल प्रकारात सुवर्णपदक जिंकले आणि अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली. विनेशने 2014च्या आशियाई स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.

रिक्षाचालकाची मुलगी असलेल्या स्वप्ना बर्मनने हेप्टॅथलॉन प्रकारात सुवर्ण जिंकण्याचा मान पटकावला. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय महिला आहे. तिने 6026 गुणांसह हे पदक जिंकले.

भारताची दिग्गज बॉक्सर एमसी मेरी कोमसाठी हे वर्ष विशेष राहिले. तिने जागतिक स्पर्धेत सहावे सुवर्णपदक जिंकले. यासह तिने युक्रेनच्या हॅना ओखोटाच्या सहा सुवर्णपदकाच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्याशिवाय तिने राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले.

2018 हे वर्ष युवा फलंदाज पृथ्वी शॉचे आंतरराष्ट्रीय पदार्पणाचे वर्ष ठरले. 19 वर्षांखालील विश्वचषक विजयानंतर त्याने वरिष्ठ संघात स्थान पटकावले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात पदार्पण करताना त्याने शतक झळकावले आणि कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा युवा भारतीय फलंदाजांचा मान त्याने पटकावला.

कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने आशिया चषक उंचावला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने ही किमया केली. विशेष म्हणजे या स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीने कर्णधार म्हणून 200 वा सामनाही खेळला.

2007 आणि 2011 च्या विश्वचषक विजेत्या संघातील नायक आणि भारताचा यशस्वी सलामीवीर गौतम गंभीरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याचा उल्लेख केल्याशिवाय हे वर्ष पुढे सरणारच नाही. सर्वात जलद 10000 वन डे धावांचा विक्रम, सर्वात जलद 60 आंतरराष्ट्रीय शतकं, त्याशिवाय दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया येथे कॅलेंडर वर्षांत कसोटी सामना जिंकणारा पहिला आशियाई कर्णधार, अशी अनेक विक्रम त्याने केली आहेत.

सात स्पर्धेतील सुवर्णपदकाने दिलेल्या हुलकावणीची वसूली पी.व्ही. सिंधूने वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेच्या जेतेपदाने केली. वर्ल्ड टूर स्पर्धा जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली.