"त्याच रात्री मी फडणवीसांना म्हणालो, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर पडतो", गणेश नाईकांनी सांगितलं प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 19:30 IST
1 / 7नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोन कट्टर राजकीय विरोध आमने-सामने आले आहेत. नवी मुंबईत एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक यांच्यातील संघर्ष सर्वश्रूत आहे. या निवडणुकीत नाईकांनी शिंदेंविरोधात दंड थोपटले आहेत. तर शिंदेंनी निवडणुकीत ताकद पणाला लावली आहे.2 / 7या निवडणुकीच्या निमित्ताने गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. मागची पाच वर्षे तुम्हीच बॉस असताना तुम्ही नवी मुंबईला नाव कसे ठेवू शकता. बापाने मुलाला चोर म्हणू नये, अशी टीका गणेश नाईकांनी केली.3 / 7'गेली पाच वर्षे प्रशासकाचा कारभार आहे. त्याकरिता कोणी आम्हाला दोष देऊ शकत नाही. या पाच वर्षांमध्ये जे काही वाटोळं झाले आहे, ते प्रशासकीय कालखंडात झालं आहे. त्याचं नेतृत्व कोण करत होतं, हे मी सांगण्याची गरज नाही', असे म्हणत नगरविकास मंत्री असलेल्या शिंदेंवर नाईकांनी निशाणा साधला.4 / 7'काही लोक बोलतात की नवी मुंबई वरून दिसायला सुंदर आहे, पण आतून घाणेरडी आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. मग पाच वर्षे नेतृत्व कोण करत होतं, त्या खात्याचे? तुम्हीच करता. मग कमीत कमी तुम्ही बोलू नका. माझा मुलगा चोर आहे, असे बापाने बोलू नये', असा घणाघात नाईकांनी शिंदेंवर केला.5 / 7यावेळी नाईकांनी एसआरएबद्दलचाही किस्सा सांगितला. नाईक म्हणाले, 'सोमण नावाचे अधिकारी माझ्याकडे आले. उद्घाटन करण्यासंदर्भात. सात एसआरए बघितले. त्याच रात्री मी देवेंद्र फडणवीसांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की, असे असेल तर मी राजकारणातून बाहेर जातो. देवेंद्रजींनी रात्री दहा वाजता वल्सा नायरांना कॉल केला आणि सांगितलं की, नवी मुंबई एसआरएच्या बाहेर ठेवा.' 6 / 7सिडको ही व्यावसायिक संस्था नाहीये. समाजाची सेवा करण्याकरिता आहे. पण, सिडकोच्या काही अधिकाऱ्यांनी तिला व्यापारी संस्था बनवले आहे. पंतप्रधानांची घरांची योजना आणि फ्लॅट ७२ लाखांना, अरे लाज वाटली पाहिजे', अशी टीका गणेश नाईकांनी शिंदेंवर केली. 7 / 7महापालिकेच्या ठेवींवरून गणेश नाईकांनी शिंदेंवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. ते म्हणाले, 'तीन हजार कोटींचा डल्ला मारला. आठशे कोटी परत... शून्य करण्यापर्यंत त्यांचा इरादा होता. ज्यावेळी मी आक्रमक झालो, त्यावेळी ते थांबले. खैरात वाटल्यासारखे एफएसआय वाटले. तुम्हाला याच कालखंडात पैसे कमावायचे आहे का?', असा सवाल नाईकांनी शिंदेंना केला.