शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

काही सेकंदात होतात जळून खाक, खाजगी बसला आग लागल्यावर प्रवाशांचं वाचणं का होतं कठीण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 17:50 IST

1 / 7
आज पहाटे आंध्र प्रदेशमधील कुरनूल येथे हैदराबादहून बंगळूरूला जाणाऱ्या बसला दुचाकीची धडक बसल्यानंतर लागलेल्या भीषण आगीत २० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या आगीत काही मृतदेह एवढे जळून गेले होते की त्यांना ओळखणंही कठीण झालं होतं. काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील जैसलमेर येथेही अशीच दुर्घटना घडली होती. त्यामुळे खाजगी प्रवासी बसनां आग लागून एवढे अपघात कसे होतात आणि बसला आग लागल्यावर त्यात अडकलेल्या प्रवाशांना वाचवणं कसं कठीण होतं? याचा घेतलेला हा आढावा.
2 / 7
आग लागल्यानंतर शॉर्ट सर्किटमुळे या बसचा दरवाजा बंद झाला. त्यामुळे खूप प्रयत्न करूनही आत अकडलेले लोक बाहेर पडू शकले नाहीत, असे आंध्र प्रदेशमधील कुरनूल येथे झालेल्या अपघाताबाबत माहिती देताना कुरनूल रेंजचे डीआयजी कोया प्रवीण यांनी सांगितले.
3 / 7
दरम्यान, अशा बसला होणाऱ्या अपघातांमध्ये आग लागल्यानंतर बसचा दरवाजा जाम होतो. त्यामुळे बसचा आतील भाग गॅस चेंबरमध्ये परिवर्तीत होतो. त्यामुळे काही सेकंदांमध्येच उष्ण हवा आणि आगीमुळे आत बसलेले लोक होरपळून जातात. त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो किंवा ते आगीत होरपळून गंभीर जखमी होतात.
4 / 7
अशा खाजगी बसला आग लागल्याच त्यांचा दरवाजा बंद होण्याचं मुख्य कारण हे अशा बसचं इंटिरियर, वायरिंग आणि रचना हे आहे. अशा बसचं इंटिरियर हे विशिष्ट्य पद्धतीने बनवलेलं असतं. त्याच्या सीट आणि सिलिंग फोम आणि चटकन आग पकडणाऱ्या रेक्सिनपासून बनवलेले असते. त्यांच्यामध्ये विविध वायरचं जाळं असतं. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा इलेक्ट्रिक बिघाड झाल्यास किंवा शॉर्ट सर्किट झाल्यास एखादी ठिणगी उडून मोठ्या आगीचा भडका उडतो.
5 / 7
अशा प्रकारच्या बसमध्ये अधिकाधिक प्रवाशांना बसता यावे यासाठी क्षमतेपेक्षा अधिक सीट लावल्या जातात. त्यामुळे बसमधून ये जा करण्यासाठी फारशी जागा उरत नाही. आगीसारख्या घटनेवेळी ही जागा प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी खूप अरुंद ठरते. त्यामुळे गडबळ आणि गोंधळाची स्थिती निर्माण होते. एवढंच नाही तर बसमध्ये पसरलेल्या वायरच्या जाळ्यामुळे शॉर्ट सर्किट झाल्यावर बसचे दरवाजे बंद पडतात.
6 / 7
याबाबत अधिक माहिती देताना एका अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की, केवळ ३० सेकंदांपेक्षा कमी वेळात एक छोटीशी ठिणगी ही आगीचा मोठा भडका उडवू शकते. तसेच पाच मिनिटांमध्ये ही जागा एवढी गरम होते की ज्यामुळे तिथे असलेली प्रत्येक वस्तू एकाच वेळी पेट घेते.
7 / 7
या अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, जेव्हा बसमध्ये आग लागते, तेव्हा तेथील तापमान हे काही सेकंदांमध्येच १०० डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचते. तसेच डोळ्यांच्या पातळीवर हे तापमान ६०० डिग्री सेल्सियसपेक्षा अधिक होते. अशा परिस्थितीत बसमध्ये अत्यंत गरम हवा तयार होते. तसेच जेव्हा दरवाजा लॉक होतो, तेव्हा बसचा आतील भाग हा गॅस चेंबरचं रूप घेतो. त्यामध्ये गरम धूर आणि गॅस भरतो त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊन प्रवासी गुदमरतात.
टॅग्स :Accidentअपघातfireआगroad safetyरस्ते सुरक्षा