Turkey's Earthquake: तुर्कीसारखा भूकंप भारतात झाला तर? 13 राज्यांवर घोंघावतेय संकट; महाराष्ट्राचा हा भाग डेंजर झोनमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2023 06:48 PM2023-02-07T18:48:50+5:302023-02-07T18:57:41+5:30

Earthquake Prone India: महाराष्ट्र चार झोनमध्ये विभागला गेलाय. बहुतांश भाग झोन तीनमध्ये, चौथ्या झोनमध्ये हादरे बसले तर अवघा महाराष्ट्र थरथर कापणार...

तुर्कस्तान आणि सिरीयामध्ये आलेल्या भयानक भूकंपाने जगाला हादरवले आहे. जवळपास पाच हजार लोकांचा मृत्यू झाला असून इमारती पत्त्यासारख्या कोसळताना पाहिल्या गेल्या आहेत. या भूकंपाकडे पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुजरातमधील भूकंपाची आठवण झाली. गेल्या दोन दिवसांत तुर्की दोन-चार नव्हे तर ५५० हून अधिक वेळा हादरला आहे. असाच भूकंप जर भारतात झाला तर काय? विचारही करवणार नाही एवढा विध्वंस होण्याची शक्यता आहे.

भारतात दरवर्षी कमीत कमी १००० भूकंपाचे धक्के जाणवतात. यातही दोनशे ते अडीचशे वेळा जमीन हादरते. अन्य भूकंप हे कमी तीव्रतेचे असतात. जसे की तुर्कीमध्ये जाणवत असतात. धक्कादायक बाब म्हणजे देशाचा ५९ टक्के हिस्सा हा भूकंपाच्या उच्च स्तराच्या धोक्याच्या परिघात येतो. सर्वाधिक धोका हा हिमालयीन भागात आहे. या भागात एवढे तगडे भुकंप आलेत की रिश्टर स्केलमध्ये खुपच उच्च तीव्रतेचे होते.

1897 मध्ये शिलाँग पठारावर 8.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. कांगडा येथे 1905 मध्ये 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप, 1934 मध्ये बिहार-नेपाळ सीमेवर 8.3 रिश्टर स्केलचा भूकंप, 1950 मध्ये अरुणाचल-चीन सीमेवर 8.5 रिश्टर स्केलचा भूकंप आणि त्यानंतर 22 मध्ये नेपाळमध्ये 7.9 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. दोन खंडांच्या टेक्टोनिक प्लेट्स या भागांच्या जवळ आढळतात. यामुळे या भागात मध्यम ते धोकादायक पातळीचे भूकंप होत असतात.

भारतीय टेक्टोनिक प्लेट आणि तिबेटी प्लेट एकमेकांना धडकत असतात. यामुळे दाब निर्माण होतो. त्यामुळे भूकंप होतो. या संपूर्ण 2400 किलोमीटर परिसरात सर्वाधिक धोका आहे. भारतीय मानक ब्युरो (BIS) ने देशाची पाच वेगवेगळ्या भूकंप झोनमध्ये विभागणी केली आहे.

पाचवा झोन हा देशातील सर्वात धोकादायक आणि सक्रिय मानण्यात आला आहे. या झोनमध्ये येणारी राज्ये आणि भागात विनाशाची शक्यता सर्वाधिक आहे. चला पाहुया कोणते कोणते भाग आणि झोन आहेत...

पाचव्या झोनमध्ये संपूर्ण देशाच्या 11% भूभाग आहे. चौथ्या झोनमध्ये 18% आणि तिसऱ्या-दुसऱ्या झोनमध्ये 30% भूभाग आहे. झोन 4 आणि 5 मधील राज्यांना सर्वाधिक धोका आहे. एकाच राज्याचे वेगवेगळे क्षेत्र वेगवेगळ्या झोनमध्ये येतात. यामुळे अर्धे राज्य एका झोनमध्ये, अर्धे दुसऱ्या झोन मध्ये असू शकते.

या झोनमध्ये येणाऱ्या भागांना कोणताही धोका नाही. वरच्या फोटोमध्ये जे भाग पांढरे दाखविण्यात आलेत ते या झोनमध्ये येतात.

राजस्थान, हरियाणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि तामिळनाडूचे काही भाग भूकंप झोन-2 अंतर्गत येतात. हा झोन कमी भूकंपप्रवण आहे.

केरळ, गोवा, लक्षद्वीप समूह, उत्तर प्रदेश आणि हरियाणाचा काही भाग, गुजरात आणि पंजाबचा काही भाग, पश्चिम बंगालचा काही भाग, पश्चिम राजस्थान, मध्य प्रदेश, बिहारचा काही भाग, झारखंडचा उत्तर भाग आणि छत्तीसगडचा काही भाग येतो. महाराष्ट्र, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि कर्नाटकचाही काही भाग या झोनमध्ये आहे.

जम्मू आणि काश्मीरचा काही भाग, लडाख, हिमाचल आणि उत्तराखंडचा काही भाग चौथ्या झोनमध्ये येतो. याशिवाय हरियाणा, पंजाब, दिल्ली, सिक्कीम, उत्तर प्रदेशचा उत्तर भाग, बिहारचा छोटा भाग आणि पश्चिम बंगाल, गुजरात, पश्चिम किनार्‍याजवळील महाराष्ट्राचा काही भाग आणि पश्चिम राजस्थानचा छोटा भाग या झोनमध्ये येतो.

झोन 5 हा सर्वात धोकादायक आहे. या झोनमध्ये, जम्मू आणि काश्मीरचा काही भाग (काश्मीर खोरे), हिमाचलचा पश्चिम भाग, उत्तराखंडचा पूर्व भाग, गुजरातचा कच्छ, उत्तर बिहारचा भाग, भारतातील सर्व ईशान्य राज्ये, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह.