CoronaVirus: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना वाचवायचे असेल तर...; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला

Published: May 13, 2021 11:18 AM2021-05-13T11:18:17+5:302021-05-13T11:26:14+5:30

How to save Children's From Corona Virus Third Wave: दुसऱ्या लाटेत कोरोना आपले हातपाय तरुणांपर्यंत पसरविले आहेत. काही प्रमाणात लहान मुलेही संक्रमित झाली आहेत. मात्र, तिसऱ्या लाटेत या लहान मुलांनाही धोका उद्भवण्याचा इशारा तज्ज्ञ देऊ लागले आहेत. दुसरीकडे लसीकरणही ठप्प झाले आहे.

देशात कोरोनाची दुसरी लाट रौद्र झाली आहे. या लाटेने देशातील आरोग्य यंत्रणेची लक्तरे टांगली आहेत. ना पुरेसे बेड, ना पुरेसा ऑक्सिजन नाही पुरेसे मनुष्यबळ, असे असले तरीदेखील कोरोना योद्धे लढा देत आहेत. पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिक, आजारी लोकच कोरोनाचे बळी ठरत होते. (Corona virus in Childrens)

मात्र, दुसऱ्या लाटेत कोरोना आपले हातपाय तरुणांपर्यंत पसरविले आहेत. काही प्रमाणात लहान मुलेही संक्रमित झाली आहेत. मात्र, तिसऱ्या लाटेत या लहान मुलांनाही धोका उद्भवण्याचा इशारा तज्ज्ञ देऊ लागले आहेत.

देशात लसीकरण सुरु झाले आहे. 18 ते 44 वयोगटाला लस मिळत नाहीय. त्यावरील वयोगटाला दुसऱ्या टप्प्यातील लस उपलब्ध होत नाहीय. अशावेळी कोरोनाची तिसरी लाट आली तर ती कशी थोपवायची असा प्रश्न पडला आहे.

देशात 12 वर्षांपेक्षाही कमी वयोगटाची मोठी लोकसंख्या आहे. प्रत्येक घरात लहान मुले आहेत, त्यांना कोरोनाच्या लाटेपासून संरक्षण देणे गरजेचे आहे. पेशाने कार्डियाक सर्जन असलेल्या डॉ. देवी शेट्टी यांनी यावर पालकांना सावध केले आहे.

भारतात 12 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांची संख्या ही 16.5 कोटी आहे. जर तिसऱ्या लाटेत त्यांच्यापैकी 20 टक्के जरी कोरोनाबाधित झाले तर त्यापैकी 5 टक्के मुलांना क्रिटिकल केअर म्हणजेच आयसीयूची गरज लागणार आहे.

असे झाल्यास तो आरोग्य व्य़वस्थेवरील प्रचंड ताण असणार आहे. कारण 1.65 लाख पीडियाट्रिक आईसीयू बेड्स लागणार आहेत. आजच्या परिस्थितीत देशभरात आपण मोठ्यांसाठी 90 हजार आयसीयू बेड आणि लहान मुलांसाठी 2000 आयसीयू बेडवर संघर्ष करत आहोत.

लहान मुलांना आयसीयूमध्ये त्यांची आई किंवा वडिलांशिवाय ठेवता येणार नाही. वयस्कांना आयसीयूमध्ये नर्स, डॉक्टर सांभाळतात. मात्र, लहान मुले त्यांच्याकडे राहू शकत नाहीत.

आईचे दूध पिणारे मुल असेल तर त्याला आई लागणार आहे. तसेच ते लहान मुल ऑक्सिजन मास्क काढण्याची शक्यता असते, यासाठी डोळ्यात तेल टाकून लक्ष ठेवण्याची जबाबदारी वाढणार आहे.

कोरोना आयसीयूमध्ये लहान मुलांना सीडेटदेखील करता येत नाही, कारण त्यांना ऑक्सिजन पातळी सांभाळण्यासाठी योग्य श्वास घेण्याची गरज असते.

याचा अर्थ असा होतो, की लहान मुलांची लस येणे अद्याप दूर आहे, परंतू त्यांच्या पालकांनी लवकरात लवकर लस घेणे गरजेचे आहे. पुढील काही महिन्यांत जवळपास 30 कोटी तरुण पालकांना लस टोचावी लागणार आहे, असे त्या म्हणाल्या.

सरकारी लस मिळत नसेल तर खासगी हॉस्पिटलमध्ये पैसे देऊन लस घ्यावी लागणार आहे. पहिला डोस 800 ते 1500 रुपये एवढा आहे. दोन्ही पालकांना दोन डोसचा खर्च हा 3200 ते 6000 रुपयांमध्ये होणार आहे. हा खर्च तुटपुंजी नोकरी करणाऱ्या किंवा कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी जास्त आहे.

यासाठी केंद्र सरकारने जागतिक लस उत्पादकांकडून कमी दराने लस घ्यावी आणि जेव्हा ही लस येईल तेव्हा ती आरोग्य मंत्रालयाला 70 आणि खासगी, सरकारी हॉस्पिटलना 30 टक्के एवढी द्यावी. या कंपन्यांकडून 30 कोटी डोस घ्यावेत. जेणेकरून काही महिन्यांत 30 कोटी लोकांना लस देता येईल.

जर सरकारने 500 रुपये दराने हॉस्पिटलना लस दिली तर इंजेक्शन देण्याचे 100 किंवा 150 रुपये आकारण्यास ही हॉस्पिटल तयार होतील. सध्याचे संकट पाहता पुढील खर्च आणि धोका टाळण्यासाठी 650 रुपये देण्यास पालक हात आखडता घेणार नाहीत, असे शेट्टी म्हणाले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!