भारतीय रेल्वेचा अनोखा नियम! 'या' सीटवरील प्रवाशी कधीही झोपू शकत नाहीत, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 14:34 IST2025-02-21T14:12:05+5:302025-02-21T14:34:28+5:30

जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक वाहतुकीपैकी एक भारतीय रेल्वे, जिथं दरदिवशी लाखो प्रवासी प्रवास करत असतात. संपूर्ण भारतात १० हजाराहून अधिक रेल्वे गाड्या धावतात. ज्यात हजारो स्लीपर ट्रेनचाही समावेश आहे.
ज्या प्रवाशांना लांबचा पल्ला गाठायचा आहे ते बहुतांश प्रवासी स्लीपर ट्रेनला प्राधान्य देतात. लांबपल्ल्याच्या ट्रेनचे मुख्यत: ५ ते ६ प्रकार आहेत. त्यात जनरल कॅटेगिरी, स्लीपर, थर्ड एसी, थर्ड एसी इकोनॉमी, सेकंड एसी आणि फर्स्ट एसी. यातील स्लीपर, थर्ड एसी, थर्ड एसी इकोनॉमीमध्ये मिडिल बर्थची सुविधा प्रवाशांना दिली जाते.
अशावेळी ज्या प्रवाशांना मिडिल बर्थ दिली जाते, त्यांना भारतीय रेल्वेचे काही आवश्यक नियम पाळावे लागतात. ज्यात ते कुठल्याही वेळी झोपू शकत नाही. मधली सीट मिळालेल्या प्रवाशाला झोपण्याची वेळ ठरवून दिली आहे. हा नियम कोणता हे जाणून घेऊया.
जे प्रवासी मिडिल बर्थ घेतात त्यांना रेल्वेच्या या नियमांची माहिती हवी. स्लीपर आणि थर्ड एसीत प्रवास करणाऱ्यांना नेहमी मिडिल बर्थमुळे अनोख्या स्थितीचा सामना करावा लागतो. परंतु त्या जागेवरील प्रवाशांसाठी रेल्वेने काही नियम ठरवून दिलेत. ते त्यांच्या मर्जीप्रमाणे कधीही झोपू शकत नाही.
जर तुम्हाला स्लीपर ट्रेनमध्ये मधली जागा मिळाली तर रात्री १० ते सकाळी ६ या वेळेतच तुम्ही सीट झोपण्यासाठी वर करू शकता. या वेळे व्यतिरिक्त कधीही तुम्ही तुमची सीट उघडू शकत नाही. जर तुम्ही तसं केले तर खालच्या जागेवरील प्रवासी तुम्हाला रोखू शकतो. ज्याचा तुम्ही विरोध केला नाही तरच चांगले अन्यथा तुम्हाला दंड लागू शकतो.
जर तुमची मिडिल बर्थची जागा आहे आणि तुमचा सहप्रवासी खालच्या जागेवर रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत बसूनच प्रवास करत असेल तर त्याला तुम्ही झोपण्यास सांगून तुमची सीट वर करू शकता. या काळात तुम्हाला त्याला बोलण्याचा अधिकार आहे. परंतु सकाळी ६ वाजता तुम्हाला सीट खाली करावी लागेल हे लक्षात ठेवावे.
कधी कधी मधल्या सीटवरील काही लोक हट्टी असतात. ते विविध कारणांचा हवाला देत मिडिल बर्थ उघडायला सांगतात. त्यामुळे खालच्या जागेवरील प्रवाशाला त्रास सहन करावा लागतो. त्या प्रवाशांना रेल्वेच्या नियमांची माहिती हवीच.
भारतीय रेल्वे नियमानुसार, मिडिल बर्थचे प्रवासी विनाकारण कधीही त्यांची सीट वर करू शकत नाहीत. जर काही त्रास असेल तर खाली बसलेल्या प्रवाशाची परवानगी घेऊन आपापसात तडजोड करत सहमतीने मिडिल बर्थ उघडू शकतो.
भारतीय रेल्वेने ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना विनंती केली आहे की, ज्या प्रवाशांची मिडिल सीट आहे आणि ते दिव्यांग, गर्भवती अथवा वृद्ध असतील त्यांना अधिक वेळ झोपायचे असेल तर त्यांना सहकार्य करा.
भारतीय रेल्वेचा रात्री १० नंतरचा नियम - रात्री १० वाजल्यानंतर किरकोळ प्रकाश वगळता सर्व लाईट बंद कराव्या लागतात. ग्रुपमध्ये प्रवास करणारे प्रवासी रात्री १० नंतर मोठमोठ्याने आवाज करू शकत नाहीत. जर मिडिल बर्थचा प्रवासी रात्री १० नंतर त्याची सीट उघडत असेल तर त्याला खालील प्रवाशी अडवू शकत नाही.