शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PM Modi-CM Thackeray Meet: PM मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीतील सर्वांत महत्त्वाचे १० मुद्दे; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 2:54 PM

1 / 13
नवी दिल्ली: गेल्या अनेक दिवसांपासून विविध मुद्द्यांवर केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहे. कोरोनाची परिस्थिती, लसीकरण, मराठा आरक्षण हे मुद्दे महाराष्ट्राच्या राजकारणात तापताना दिसत आहेत.
2 / 13
महाराष्ट्रातील अनेक मुद्द्यांसाठी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारकडून केंद्रातील मोदी सरकारला जबाबदार धरले जात होते. अशातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांची दिल्लीत भेट घेतली.
3 / 13
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण (ashok chavan) हेदेखील उपस्थित होते. याशिवाय मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांची व्यक्तिगत भेट झाल्याचेही सांगितले जात आहे.
4 / 13
मराठा आरक्षण (maratha reservation) रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर मराठा समाजात अस्वस्थता आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. पंतप्रधानांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
5 / 13
या नेत्यांनी पंतप्रधान मोदींसोबत विविध मुद्द्यांवर सुमारे १ तास ४५ मिनिटे चर्चा केली. मराठा आरक्षणाच्या मुख्य मुद्यावरून पंतप्रधान मोदींशी चर्चा झाली असून, याबद्दल त्यांना विस्तृत पत्रं दिल्याची माहिती मिळाली आहे.
6 / 13
मराठा आरक्षणासह इतर मागासवर्ग आरक्षणाबाबतचा मुद्दा पंतप्रधान मोदींसमोर मांडण्यात आला. तसेच मागासवर्गीय बढतीमधील आरक्षणावरही पंतप्रधानांशी चर्चा करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
7 / 13
यासह मुंबईकर ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, अशा मुंबई मेट्रोच्या कारशेडसंदर्भातील विषयही पंतप्रधान मोदींसमोर मांडण्यात आला. मुंबईच्या मेट्रोसाठी कांजुरमार्गची जागा देण्याविषयी चर्चा झाली. (mumbai metro carshed)
8 / 13
केंद्राकडून महाराष्ट्राला २४ हजार ३०६ कोटींचा जीएसटीचा परतावा देणे बाकी आहे. याविषयी पंतप्रधान मोदींना विनंती करण्यात आली आहे. तसेच जीएसटी (GST) संदर्भातील अन्य मुद्यांवर पंतप्रधान मोदींशी चर्चा झाली.
9 / 13
शेतकरी बांधवांसाठी पीक कर्जप्रमाणे पीक विम्याच्या अटीशर्तीबाबत चर्चा झाली. याशिवाय महाराष्ट्रात बीड पॅटर्नची माहिती पंतप्रधान मोदींना देण्यात आली.
10 / 13
तसेच गेल्या वर्षभरात दोन चक्रीवादळांनी महाराष्ट्राला तडाखा दिला आहे. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तीमधील मदतीसाठी एनडीआरएफचे कॉस्ट नॉर्म (निकष) बदलणे याविषयी चर्चा करण्यात आली.
11 / 13
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा विषयही पंतप्रधान मोदींसमोर उपस्थित करण्यात आला. तसेच राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या निवड करण्याबाबतही पंतप्रधान मोदींशी चर्चा झाली.
12 / 13
महाराष्ट्रासाठी बल्क ड्रग पार्क लवकरात लवकर मंजूर करावे तसेच १००० कोटी रुपये अर्थसहाय्य यासाठी द्यावे. हा पार्क सुरु झाल्यास औषध निर्मितीस मोठे प्रोत्साहन मिळेल, याविषयी पंतप्रधान मोदींना सांगण्यात आले.
13 / 13
यासह १४ व्या वित्त आयोगातील शहरी, स्थानिक तसेच पंचायतराज संस्थांचा १२०८.७२ कोटी रुपयांचा थकीत निधी मिळणेबाबत वित्त मंत्रालयाला सूचना देण्यात यावी, अशी विनंती पंतप्रधान मोदींना करण्यात आली आहे.
टॅग्स :PoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारAshok Chavanअशोक चव्हाणMaratha Reservationमराठा आरक्षणGSTजीएसटीMetroमेट्रोprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकार