हिंदी महासागरात भारत आणि चीन यांच्यात वर्चस्वाची लढाई; ड्रॅगनची नवी चाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 03:48 PM2022-05-27T15:48:33+5:302022-05-27T15:52:49+5:30

भारत आणि चीन यांच्यात लडाख येथे मागील २ वर्षापासून तणाव सुरू आहे. याठिकाणी सीमावादावर कुठलाही तोडगा निघण्याची चिन्हे नाहीत. त्यातच आता जमिनीवरून आता हिंदी महासागरातही चीन आणि भारत यांच्यात वर्चस्वाची स्पर्धा सुरू झाली आहे.

चीनने सिंगापूरसोबत व्यापारासाठी बंगालच्या खाडीचा वापर सुरू केला आहे. तर म्यानमारपर्यंत मोठा महामार्ग चीन तयार करत आहे. म्यानमार इथं चीन पाणबुडीसाठी अड्डा बनवत आहे. चीन पाकिस्तानलाही घातक युद्धनौका आणि पाणबुडी पुरवठा करत आहे.

शेजारील ड्रॅगनच्या वाढत्या घुसखोरीनंतर भारतीय नौदलही सतर्क झाले आहे. ते पश्चिम किनारपट्टीवर हिंदी महासागरात असलेल्या कारवार येथे आशियातील सर्वात मोठे नौदल तळ उभारत आहेत. काय आहे हे संपूर्ण प्रकरण समजून घेऊया.

दक्षिण चीन समुद्रात क्षेपणास्त्रांनी सुसज्ज अनेक कृत्रिम बेटे बांधून आपली पकड मजबूत करणाऱ्या चिनी ड्रॅगनने आता आपले डोळे हिंदी महासागराकडे वळवले आहेत. ऑस्ट्रेलियाजवळील सोलोमन बेटे आणि इतर अनेक बेट देशांना आपल्या ताब्यात आणण्याचा चीनचा प्रयत्न आहे.

एवढेच नाही तर चीनच्या नजरा बंगालच्या उपसागरावर आणि अरबी समुद्रावरही खिळल्या आहेत. चीन म्यानमारमार्गे बंगालच्या उपसागरात प्रवेश करत असताना, अरबी समुद्रातील पर्शियन गल्फ आणि एडनच्या आखातावरही वर्चस्व गाजवण्याची त्याची योजना आहे.

चीनला मलाक्का सामुद्रधुनीचा चेक पॉइंट कोणत्याही प्रकारे संपवायचा आहे जिथे भारतीय नौदल आणि अमेरिकेचे मित्र मजबूत स्थितीत आहेत. त्यामुळेच तो पाकिस्तानमध्ये CPEC प्रकल्प राबवत आहे. याअंतर्गत चीनचा शिनजियांग प्रांत आणि पाकिस्तानच्या ग्वादर बंदरादरम्यान थेट रस्ता आणि रेल्वे मार्ग तयार केला जात आहे.

चीन हा जगातील सर्वात मोठा तेल खरेदीदार आहे आणि त्याच्या उर्जेच्या बहुतांश गरजा आखाती देश भागवतात. यामुळेच चीनने आफ्रिकेतील जिबूती येथेही आपलं मोठं नौदल तळ उभारलं आहे. चिनी नौदलाच्या युद्धनौका आता जिबूतीपासून दक्षिण चीन समुद्रापर्यंत गस्त घालत आहेत.

चीनला आता पाकिस्तानचाही समावेश करायचा आहे आणि त्यासाठी तो अत्याधुनिक युद्धनौका आणि पाणबुड्या बनवत आहे. चीनने गेल्या वर्षी पाकिस्तानला टाइप-054 स्टेल्थ युद्धनौका सुपूर्द केली होती. चीनची ही युद्धनौका अत्याधुनिक पृष्ठभाग, उप-पृष्ठभाग आणि वायुरोधक शस्त्रांनी सुसज्ज आहे.

यात इलेक्ट्रॉनिक युद्ध, हवाई आणि जमिनीवर पाळत ठेवण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे आणि सेन्सर्स सज्ज असतील. त्यामुळे पाकिस्तानी नौदलाची लढाऊ क्षमता अनेक पटींनी वाढणार आहे. एवढेच नाही तर ही युद्धनौका आल्यानंतर पाकिस्तानची सागरी सुरक्षा आणि प्रतिबंधही वाढणार आहे.

चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय नौदल हिंदी महासागरात आपलं वर्चस्व वाढवत आहे. त्याचप्रमाणे श्रीलंकेतील हंबनटोटा बंदर, मालदीवमधील माराव बंदर, बांगलादेशातील चितगाव बंदर यांच्या ताब्यात घेण्याच्या योजनांवर काम करत आहे.

अलीकडेच मालदीवमधील राजकीय अस्थिरतेमागे भारत आणि चीन यांच्यातील ही स्पर्धा दिसून आली. हिंदी महासागर हा भारताचा दरवाजा मानला जात होता, परंतु आता जागतिकीकरणाच्या या युगात त्यावर वर्चस्व मिळवण्याचे प्रयत्न तीव्र झाले आहेत.