'अमोनियम नायट्रेट'चा बॉम्ब; एका स्फोटात असते ५०० ते १००० लोकांना संपवण्याची क्षमता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 15:49 IST
1 / 7राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी झालेल्या शक्तिशाली कार स्फोटाने देशात खळबळ उडवून दिली आहे. या भीषण हल्ल्यात आतापर्यंत १३ निरपराध लोकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. 2 / 7तपास यंत्रणांच्या प्राथमिक अहवालानुसार, या स्फोटात कृषी क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या पण गैरवापर केल्यास अत्यंत घातक ठरू शकणाऱ्या उच्च क्षमतेच्या अमोनियम नायट्रेट स्फोटकाचा वापर करण्यात आला.3 / 7या हल्ल्याची वेळ अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे, कारण जम्मू-काश्मीर पोलिसांनी याच सोमवारी दिल्लीजवळील फरीदाबाद येथून तब्बल २९०० किलो अमोनियम नायट्रेटचा मोठा साठा जप्त केला होता. दिल्ली पोलिसांनी आता या दोन्ही घटनांमध्ये काही संबंध आहे का, याचा कसून तपास सुरू केला आहे. या स्फोटात अमोनियम नायट्रेट, इंधन आणि डेटोनेटरचा वापर झाल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.4 / 7तज्ज्ञांच्या मते, अमोनियम नायट्रेट हा पांढरा पावडर स्वरूपातील पदार्थ आहे. हा खत म्हणून वापरला जात असला तरी, डिटोनेटर आणि इंधन (उदा. डिझेल) मिसळल्यास तो १४० किलो टीएनटी स्फोटकाइतकी प्रचंड ऊर्जा निर्माण करू शकतो. इतका मोठा स्फोट ५०० ते १००० लोकांचा बळी घेण्यास सक्षम असतो.5 / 7दहशतवादी संघटना कमी किंमत आणि सहज उपलब्धतेमुळे याचा वापर स्फोटके बनवण्यासाठी करतात. यापूर्वी २००८ चे दिल्ली साखळी स्फोट, २०१० कॉमनवेल्थ गेम्सच्या पूर्वीचे स्फोट आणि २०११ च्या मुंबईतील बाजारातील स्फोटांमध्येही अमोनियम नायट्रेटचा उल्लेख होता.6 / 7२०२० मध्ये लेबनॉनची राजधानी बेरूत येथे अमोनियम नायट्रेटच्या निष्काळजीपणामुळे मोठा स्फोट झाला होता, ज्यात २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, हे लक्षात घेता दिल्लीतील या स्फोटाचे गांभीर्य अधिक आहे.7 / 7भारतात अमोनियम नायट्रेटच्या विक्री आणि वापरावर १८८४ च्या स्फोटक कायद्यांतर्गत कठोर निर्बंध आहेत. ४५% पेक्षा जास्त अमोनियम नायट्रेटला स्फोटक मानले जाते आणि याच्या उत्पादन व पुरवठ्यासाठी सरकारचा परवाना अनिवार्य आहे. तसेच, गर्दीच्या ठिकाणी त्याची वाहतूक करण्यास किंवा साठवणूक करण्यास सक्त मनाई आहे.