1 / 8स्वतःशी लग्न करण्याचा निर्णय घेऊन देशभरात चर्चेत आलेल्या गुजरातच्या क्षमा बिंदूने अखेर बुधवारी स्वतःशी लग्न केले. क्षमाने ११ जून रोजी स्वतःशी लग्न करण्याची घोषणा केली होती, मात्र देशभरातून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर तिने ठरलेल्या तारखेच्या ३ दिवस आधीच लग्न केले.2 / 8कोणीही आपल्या घरी येऊन वाद निर्माण करेल अशी भीती होती. आपला खास दिवस वाया घालवायचा नव्हता. यासाठीच आपण बुधवारी लग्न केल्याचं क्षमानं सांगितलं. या प्रसंगी तिचे जवळचे मित्र उपस्थित होते.3 / 8लग्नादरम्यान मेहंदी आणि हळदी समारंभही पार पडला. क्षमानं अग्नीसमोर सात फेरे घेत लग्न केलं. या लग्नात ना कोणी वर होता, ना मंत्रोपचारासाठी कोणी होतं. यात तिचा मित्रपरिवार सहभागी झाला होता. अशाप्रकारचं हे देशातील पहिलंच लग्न असल्याचंही म्हटलं जातंय.4 / 8तिनं लाल साडी परिधान केली होती आणि हातांवर मेहेंदीही होती. हा विवाह डिजिटल पद्धतनं पूर्ण करण्यात आला. यापूर्वी तिनं मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु विरोधानंतर तिनं घरातच लग्न करणार असल्याचं ठरवलं. तिनं डिजिटली मंत्रोपचारांच्या मदतीनं विवाह केला.5 / 8आपण हनीमूनसाठी गोव्याला जाणार असल्याचंही तिनं सांगिलं. या लग्नामुळे तिचे आईवडिलही खुश आहेत. त्यांनी आपले आशीर्वादही दिल्याचं तिनं म्हटलं. तिच्या लग्नाचे सोलो फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. 6 / 8क्षमाचे इन्स्टाग्रामवर २५ हजारांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. तिला लग्न करायचं नव्हतं. परंतु तिला एक प्रेयसी म्हणून राहण्याची इच्छा होती, म्हणूनच तिनं स्वत:शीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. आपल्यावरच प्रेम करण्याचं उदाहरण देणारी आपण पहिलीच मुलगी आहोत असंही ती म्हणाली.7 / 8क्षमा बिंदू एका खासगी कंपनीत नोकरी करते. ‘स्व-विवाह म्हणजे स्वतःसाठी आणि स्वतःवर बिनशर्त प्रेम करण्याची वचनबद्धता आहे. सामान्यपणे लोक प्रेम असलेल्या व्यक्तीशी लग्न करतात. माझे स्वतःवर प्रेम आहे, म्हणून मी स्वतःशीच लग्न केलंय,’असे क्षमा म्हणाली.8 / 8लग्नापूर्वी तिनं सोलोगमियां नावाच्या एका प्रथेबाबत माहिती मिळवली. त्यानंतर त्याच्या प्रत्येक पैलूंची आणखी माहिती घेतली आणि त्यानंतर तिनं लग्नाचा हा निर्णय घेतला. (सर्व फोटो - क्षमा बिंदू, इन्स्टाग्राम)