लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात 60 हून अधिक वयाच्या लोकांना प्राधान्य, सर्वांना लस मोफत मिळणार नाही - रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 10:21 AM2021-02-22T10:21:20+5:302021-02-22T10:45:38+5:30

vaccination : 20 फेब्रुवारीपर्यंत देशात एकूण 1.08 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आली.

नवी दिल्ली : देशातील काही राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. तर महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाची नवीन प्रकरण समोर येत आहे. दरम्यान, 20 फेब्रुवारीपर्यंत देशात एकूण 1.08 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आली.

फ्रंटलाइन वर्कर्संना कोरोनाची लस देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच, पुढच्या महिन्यापासून देशात 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना देखील लस देण्यात येणार आहे.

इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, देशात सुमारे 50 वर्षे किंवा त्याहून अधिक वयोगटातील जवळपास 27 लाख लोक आहेत, ज्यांना दुसर्‍या टप्प्यात कोरोनाची लस दिली जाईल. मात्र, 60 वर्षांवरील लोकांना प्राधान्य दिले जाईल.

याचबरोबर, त्यांचे दोन गट केले जातील. ज्यांना लस विनामूल्य दिली जाईल, त्यांचा एक गट असेल. तर दुसऱ्या गटातील लोकांना लसीसाठी पैसे मोजावे लागणार आहेत.

वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना लसीच्या दुसऱ्या टप्प्यात लोकांनाही त्यांच्या मूळ राज्याव्यतिरिक्त इतर राज्यातही लस दिली जाऊ शकते. येत्या महिन्यापासून सुरू होणाऱ्या दुसर्‍या टप्प्यातील लसीकरणात दोन गट असतील, असे सरकारी सूत्रांनी सांगितले.

कोणत्या गटाच्या लोकांना मोफत लस दिली जाईल हे सरकार सांगेल. लाभार्थ्यांना स्वत:चे रजिस्ट्रेशन करतेवेळी पाहावे लागेल की, त्यांना लस मोफत मिळत आहे की त्यांना यासाठी पैसे द्यावे लागतील.

सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे की, लवकरच असे सांगितले जाईल की, कोणाला कोरोना लस मोफत दिली जाईल आणि कोणाला यासाठी पैसे द्यावे लागतील.

16 जानेवारीपासून सुरु झालेल्या पहिल्या टप्प्यात देशात कोरोनाविरोधात सुरु असलेल्या जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेत आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्संना लस देण्यात आली आहे. आता लसीकरणाचा दुसरा टप्पा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊ शकतो.

दरम्यान, देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून काल (रविवारी) 14264 नवे रुग्ण आढळले व 90 जण मरण पावले. उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढली असून त्यांचे एकूण प्रमाण 1.32 टक्के आहे. मृत्यूदराचे प्रमाण मात्र कमी होऊन तो 1.42 टक्के झाले आहे.

कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमध्ये 74 टक्के रुग्ण महाराष्ट्र, केरळमधील आहेत. मध्य प्रदेश, पंजाब, छत्तीसगढ, जम्मू-काश्मीर येथेही दररोज कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असून ही राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवावे असे केंद्राकडून सांगण्यात आले आहे.

जगभरात 11 कोटी 16 लाख कोरोना रुग्ण आहेत. त्यातील 8 कोटी 68 लाख जण बरे झाले व 24 लाख 72 हजार जणांचा बळी गेला. जगात 2 कोटी 23 लाख कोरोना रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. अमेरिकेत 2 कोटी 86 लाख कोरोना रुग्ण असून त्यातील 1 कोटी 88 लाख जण बरे झाले.