...तर मुंबईसह ५० शहरं पाण्याखाली जाणार; धडकी भरवणाऱ्या अहवालानं चिंता वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 02:47 PM2021-10-15T14:47:46+5:302021-10-15T14:50:48+5:30

आशिया खंडातील शहरांना मोठा धोका; महत्त्वाची शहरं पाण्याखाली जाणार

वाढतं प्रदूषण आणि त्यामुळे वाढणारं तापमान याचा थेट फटका माणसाला बसू लागला आहे. नैसर्गिक आपत्तींचं प्रमाण वाढत असताना भविष्यात त्यात आणखी भर पडणार आहे. प्रदूषण वाढीचा वेग कायम राहिल्यास मुंबईसह आशियातील ५० शहरं पाण्यााखाली जातील, अशी भीती एका अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांपासून जागतिक तापमानात वाढ होतेय. त्याचा परिणाम समुद्राच्या पाणी पातळीवर दिसून येतोय. कार्बन उत्सर्जनामुळे पाणी पातळीत वाढ होतेय. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास मुंबईसह देशातील प्रमुख शहरं समुद्राच्या पाण्याखाली जातील. याशिवाय चीन, इंडोनेशिया, बांगलादेश आणि व्हिएतनाममधील अनेक शहरंदेखील बुडतील, अशी भीती अहवालातून वर्तवण्यात आली आहे.

चीन, भारत, इंडोनेशिया आणि व्हिएतनामची लोकसंख्या जास्त आहे. या देशांमधील कोळशावर चालणाऱ्या प्रकल्पांची संख्यादेखील अधिक आहे. त्यामुळेच तापमान वाढीचा सर्वाधिक परिणाम याच देशांमध्ये पाहायला मिळेल, असा धोक्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

जागतिक तापमान वाढीमुळे समुद्राच्या पातळीत वाढ होतेय. त्याचा फटका ऑस्ट्रेलिया आणि अंटार्टिका खंडाला बसेल. या खंडांचा १० टक्के भाग पाण्याखाली जाईल. याशिवाय बेटांवर वसलेल्या देशांचं अस्तित्वच संपेल.

समुद्र किनारे लाभलेल्या देशांना तापमान वाढीचा सर्वाधिक फटका बसेल. भरती येत असलेल्या भागांमधील १५ टक्के लोकसंख्येला तापमान वाढीचा फटका बसेल. क्लायमेट कंट्रोल नावाच्या संकेतस्थळावर याबद्दलचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला तापमान वाढीमुळे धोका आहे. जगातील जवळपास १८४ शहरांना तापमान वाढीचा फटका बसेल. या शहरांचा बराचसा भाग पाण्याखाली जाईल. काही शहरं संपूर्णपणे पाण्याखाली जातील.

पुढील २०० ते २००० वर्षांत जगाचा नकाशा पूर्णपणे बदललेला असेल. बरेच भूभाग गायब झालेले असतील. तापमानात दीड ते तीन डिग्री वाढ झाल्यास जगभरातील हिमकडे वितळू लागतील. त्यामुळे समुद्राची पाणी पातळी वाढेल.

तापमान वाढ भारतासाठी दुहेरी संकट घेऊन येईल. एका बाजूला समुद्राची पाणी पातळी वाढून महत्त्वाच्या शहरांना धोका निर्माण होईल. तर दुसऱ्या बाजूला हिमालयातील बर्फ वितळून पुराचं संकट निर्माण होईल. त्याचा फटका अनेक राज्यांना बसेल.

याआधी ऑगस्टमध्ये आयपीसीसीचा एक अहवाल प्रसिद्ध झाला होता. पुढील ७९ वर्षांत, म्हणजेच २१०० मध्ये देशातील १२ शहरं किमान ३ फूट पाण्याखाली जातील, असा धोका त्यातून वर्तवण्यात आला होता. ध्रुवीय परिसरातील बर्फ वितळत असल्यानं ही परिस्थिती निर्माण होईल, अशी माहिती अहवालात होती.

मुंबईसह चेन्नई, कोच्ची, भावनगर पाण्याखाली जातील, असा धोक्याचा इशारा अहवालातून देण्यात आला होता. नासाच्या प्रोजेक्शन टूलच्या मदतीनं आयपीसीसीनं हा अहवाल तयार केला होता.