प्रेरणादायी! आईने दागिने गहाण ठेवून शिकवलं; लेकीने कष्टाचं सोनं केलं, झाली SDM

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 04:06 PM2023-07-25T16:06:25+5:302023-07-25T16:11:14+5:30

राधा यांची मुलगी निकिता मंडलोई SDM झाल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे. निकितामुळे अनेकांना प्रेरणा मिळत आहे.

पतीच्या आकस्मिक निधनानंतर विखुरलेल्या कुटुंबाला एकत्र आणणे सोपे नाही. मध्य प्रदेशातील एका गावात राहणाऱ्या राधा मंगलोई यांनी आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी आपले दागिने गहाण ठेवले होते. मुलांनीही आईच्या त्यागाचा आदर केला.

आज राधा यांचा मुलगा आणि मुलगी दोघेही सरकारी नोकरीत आहेत. राधा यांची मुलगी निकिता मंडलोई SDM झाल्याची कौतुकास्पद घटना समोर आली आहे. निकितामुळे अनेकांना प्रेरणा मिळत आहे.

निकिता मंडलोई ही मध्य प्रदेशातील खरगोन जिल्हा मुख्यालयापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या सुखपुरी गावची रहिवासी आहे. 2012 मध्ये तिचे वडील मंगल सिंह यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. तेव्हा निकिता बारावीत होती.

निकिताचे दोन मोठे भाऊ महाविद्यालयात शिकत होते. अशा परिस्थितीत घराची आणि तीन मुलांची जबाबदारी आई राधा मंडलोई यांच्यावर येऊन पडली. मात्र त्यांनी मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ दिला नाही. दागिने गहाण ठेवून निकिताला शिकवलं.

निकिताने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, तिचे वडील तिला कलेक्टर बनवू इच्छित होते. ती अभ्यासात खूप हुशार होती. तिने जीएसआयटीएम इंदूर येथून बायो मेकॅनिकलमध्ये इंजिनीअरिंग केले आहे. तिला कॅम्पस प्लेसमेंटमध्ये परदेशी कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफरही आल्या.

निकिताचं सरकारी नोकरी हे एकच ध्येय होतं. म्हणूनच तिने कॉर्पोरेट नोकरीची ऑफर न स्वीकारून पीसीएस परीक्षेची तयारी सुरू केली. हिंदी मीडियमच्या निकिता मंडलोईला कॉलेजमध्ये शिकताना खूप त्रास सहन करावा लागला.

महाविद्यालयात इंग्रजी भाषेतून शिक्षण दिले जात होते. त्यामुळे अभ्यासक्रम समजून घेण्यात खूप अडचण येत असे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, निकिता पहिल्या सेमिस्टरमध्ये 5 पैकी 3 विषयात नापास झाली होती. त्यानंतर दुप्पट मेहनत घेऊन अभ्यास सुरू केला.

निकिता मंडलोई वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी एसडीएम झाल्या. 2018 मध्ये झालेल्या मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ती एसटी श्रेणीत अव्वल आली होती. हे निकिताचं एक मोठे यश होतं.

सरकारी नोकरी परीक्षेची तयारी करण्यासाठी निकिताने संपूर्ण लक्ष अभ्यासक्रम समजून घेणे आणि जुने पेपर सोडवणे यावर केंद्रित केलं. तिने फारसा अभ्यास केला नाही, पण तिने जो काही अभ्यास केला तो मन लावून केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.