नरेंद्र मोदी अयोध्येत पारिजाताचे झाड लावणार; जाणून घ्या, याचे पौराणिक महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 04:28 PM2020-08-04T16:28:49+5:302020-08-04T17:05:28+5:30

अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्टला होणार आहे. यादरम्यान नरेंद्र मोदी रामजन्मभूमी परिसरात पारिजाताचे झाड लावणार आहेत.

या वनस्पतीचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये काय आहेत? त्यामुळे पारिजात भूमिपूजन सोहळ्याचा भाग बनविण्यात येत आहे. चला, तर मग या झाडाबद्दल जाणून घेऊया...

पारिजात वृक्ष खूप सुंदर आहे. पारिजात फुलाचा उपयोग भगवान हरीचे श्रृंगार आणि पूजामध्ये केला जातो, म्हणूनच या मोहक व सुगंधित फुलांना हरसिंगार असेही म्हणतात. हिंदू धर्मात हे झाड फार महत्वाचे मानले जाते. एखाद्या व्यक्तीला आलेला थकवा केवळ पारिजातला स्पर्श केल्यानंतर जातो, असेही सांगितले जाते.

पारिजाताचे झाड दहा ते पंचवीस फूट उंचीपर्यंत असते. या झाडाची एक खास गोष्ट म्हणजे त्याला मोठ्या प्रमाणात फुले लागतात. एका दिवसात याची कितीही फुले तोडली, तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा मोठ्या प्रमाणात फुले उमलतात. हे झाड विशेषत: मध्य भारत आणि हिमालयातील सखल डोंगरावर वाढते.

हे फूल रात्री फुलते आणि त्याची सर्व फुले सकाळी पडतात. म्हणून त्याला रातराणी देखील म्हटले जाते. तसेच, हरसिंगारचे फूल हे पश्चिम बंगालचे राज्य फूल आहे. जगातील याच्या केवळ पाच प्रजाती आढळतात.

धनाची देवी लक्ष्मीला परिजाताची फुले खूप प्रिय आहेत. पूजेच्या पठणात देवी लक्ष्मीला ही फुले अर्पण केल्यानंतर ती प्रसन्न होते, असेही म्हटले जाते.

खास गोष्ट म्हणजे, पूजा-पाठ करताना परिजाताची फुले वापरली जातात. मात्र, ती झाडावरून गळून पडलेली. पूजेसाठी या झाडाची फुले तोडण्यास पूर्णपणे मनाई आहे. असे मानले जाते की, १४ वर्षांच्या वनवासात माता सीता पारिजाताच्या फुलांनी श्रृंगार करत होत्या.

बाराबंकी जिल्ह्यातील पारिजाताचे झाड महाभारतच्या काळातील असल्याचे मानले जाते. जे सुमारे ४५ फूट उंच आहे. पारिजाताच्या झाडाचा उगम सागर मंथनातून झाला होता, त्याला इंद्राने त्याच्या बागेत लावले होते, असे मानले जाते.

अज्ञातवासादरम्यान, माता कुंतीने पारिजाताच्या फुलांनी भगवान शंकराची पूजा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्जुनाने हे झाड स्वर्गातून आणले आणि ते याठिकाणी लावले. तेव्हापासून या झाडाची पूजा केली जात आहे.

हरिवंश पुराणात पारिजाताला कल्पवृक्ष असेही म्हणतात. असे मानले जाते की, या झाडाला फक्त उर्वशी नावाच्या अप्सरालाच स्वर्गात स्पर्श करण्याचा अधिकार होता. या झाडाच्या स्पर्शाने उर्वशीचा थकवा जात होता. आजही लोकांचा असा विश्वास आहे की, त्याच्या सावलीत बसून सर्व थकवा दूर होतो.

पारिजात हे औषधी गुणांसाठी देखील ओळखले जाते. दररोज या झाडाच्या एक बीचे सेवन केल्यास मूळव्याधाचा आजार बरा होतो. पारिजाताची फुलं हृदयासाठी चांगली मानली जातात. फुलांचा रस घेतल्यास हृदयरोग टाळता येतो.

एवढेच नाही तर पारिजाताची पाने बारीक करून ते मधात मिसळल्यास कोरडा खोकलाही बरा होतो. पारिजाताच्या पानांमुळे त्वचेशी संबंधित आजार बरे होतात.