पाकिस्तानकडून एलओसीवर मोठ्या प्रमाणावर रणगाडे, एसएसजी कमांडो तैनात; भारतीय सैन्य सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 04:02 PM2019-11-14T16:02:17+5:302019-11-14T16:12:24+5:30

पाकव्याप्त काश्मीरमध्ये सीमारेषेवर पाकिस्तानने मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे, रणगाडे आणि एसएसजी कमांडोंची तैनाती केली असून भारतीय सैन्य हाय अलर्टवर आहे. पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळ तोफ रेजिमेंटसह एसएसजी कमांडोंचे युनिटही तैनात केले आहे.

इकॉनॉमिक्स टाईम्सनुसार पाकिस्तानने ऑगस्टमध्येच जम्मू आणि काश्मीरचे कलम 370 रद्द केल्यापासून सीमेवर सैन्याची जमवाजमव सुरू केली होती. आताच्या नव्या हालचालींमुळे सीमेवर पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता आहे.

पाकिस्तानी सैन्याकडून वेळोवेळी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जाते. त्यांच्याकडून मध्यम आणि मोठ्या शस्त्रांद्वारे गोळीबार, बॉम्बफेक केली जाते. भारतीय सैन्याने त्यांना अनेकदा जोरदार प्रत्युत्तर देत नामोहरम केले आहे.

पाकिस्तान सध्या तोफांचा मारा करत असून भारतीय जवानांच्या चौक्या आणि रहिवासी भागांना लक्ष्य करत आहे. यामुळे अनेकजण जखमीही झाले आहेत. पाकिस्तानने यंदा सीमेवर 2472 पेक्षा अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. हा आकडा गेल्या दोन वर्षांतील सर्वाधिक आहे.

पाकिस्तानने एलओसीवर त्यांच्या एलिट सैनिकांशिवाय विशेष सेवा समूह (एसएसजी)लाही तैनात केले आहे. या दोन बटालियन असल्याचे समजते. एका बटालियनमध्ये 700 कमांडो आहेत.

हे सैनिक दहशतवादी आणि पाकिस्तानी सैन्यासोबत मिळून भारतीय गस्ती पथके आणि चौक्यांवर हल्ला करतात. तसेच त्यांच्या बॉर्डर अॅक्शन टीम (बॅट) सोबतही हल्ले करतात.

गुरुवारी रात्री त्यांच्या एका गटाने नियंत्रण रेषा पार करून भारतीय सैन्याच्या चौकीवर गोळीबार केला. यामध्ये एक सैनिक शहीद झाला आहे.

पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळ 80 हजार सैनिकांना तैनात केले आहे. यामध्ये 30 हून अधिक बटालियन पायदळाच्या आहेत. यामध्ये जवळपास 30 हजार सैनिक तैनात आहेत. याशिवाय 25 मुजाहिद बटालियन तैनात असून यामध्ये 17हजार सैनिक आहेत. त्यांच्याकडे टँकही आहेत. तर हवाईदलाचे 1400 सैनिक तैनात आहेत.

गिलगिट बाल्टीस्थानमध्ये स्कर्दू हवाई अड्ड्यावर जेएफ-17 ही लढाऊ विमाने तैनात केली आहेत. हा हवाई तळ लडाखच्या जवळच आहे. भारत त्यांच्या हालचालींवरही लक्ष ठेवून आहे.