Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंनंतर आता NCPचा करेक्ट कार्यक्रम! निवडणूक आयोग पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 11:34 AM2023-03-22T11:34:19+5:302023-03-22T11:38:42+5:30

Maharashtra News: ठाकरे गटानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोग धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेत अभूतपूर्व बंडखोरी केली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी एक पाऊल आणखी पुढे टाकत थेट शिवसेना पक्षावर दावा सांगितला. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या पारड्यात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाचे दान टाकले. यामुळे उद्धव ठाकरे गटाला प्रचंड मोठा धक्का बसला.

यानंतर आता देशातील दिग्गज नेते असलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोग दणका देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह काढून घेण्यात आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही घटना ताजी असतानाच आता निवडणूक आयोग राष्ट्रवादीला धक्का देऊ शकते, असे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोग लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय दर्जाबाबत आढावा घेणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा धोक्यात आल्याचे सांगितले जात आहे. केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर मायावतीच्या बसपा आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या राष्ट्रीय दर्जाचीही समीक्षा केली जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठीच्या अटी आणि शर्तींचे पालन केले नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच निवडणूक आयोग ही समीक्षा करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर २०१४च्या लोकसभा निवडणुकीपासूनच राष्ट्रीय दर्जा जाण्याची टांगती तलवार आहे.

मात्र, त्यावेळी निवडणूक आयोगाने नरमाईचे धोरण घेतले होते. आता मात्र, दोन निवडणुकांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय पक्षाच्या स्थितीचा आढावा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून घेतला जाणार आहे. राष्ट्रवादीशिवाय बसपा आणि सीपीआयचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला जाण्याची शक्यता आहे.

एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला की, पक्षाच्या निवडणूक चिन्हाला संपूर्ण देशात मान्यता मिळते. राजधानी दिल्लीत पार्टी ऑफिससाठी जागा मिळते. तसेच निवडणुकीच्या काळात पब्लिक ब्रॉडकास्टर्सद्वारे ऑन एअर येण्याची संधी मिळते. त्यामुळे पक्षाला आपले म्हणणे संपूर्ण देशातील जनतेपर्यंत पोहोचवणे शक्य होते.

एखाद्या पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतल्यास त्या पक्षाला एकाच चिन्हावर संपूर्ण देशात निवडणुका लढता येत नही. प्रत्येक राज्यात निवडणूक लढताना त्यांना वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढावी लागते.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोग प्रत्येक दहा वर्षानंतर राजकीय पक्षांची समीक्षा करत असतो. राष्ट्रीय पक्ष म्हणवून घेण्यास एखादा पक्ष योग्य आहे की नाही, हे पाहण्यासाठी ही समीक्षा केली जाते. याधी दर पाच वर्षाने ही समीक्षा केली जायची. पण, नियमांमध्ये दुरुस्ती करण्यात आल्यानंतर आता हा कालावधी दहा वर्षाचा करण्यात आला आहे.

अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँड निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत ७ जागांवर विजय प्राप्त केला होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारला पाठिंबा देत सरकारमध्ये सहभागी होत असल्याचे जाहीर केले. मात्र, उद्धव ठाकरे गटाला जोरदार दणका दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केंद्रीय निवडणूक आयोग काय भूमिका घेते, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.