आकाशातून पडला 'चमत्कारी' दगड; युवकानं एक छोटा तुकडा पॅन्टच्या खिशात ठेवताच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 17:39 IST2025-01-07T17:21:49+5:302025-01-07T17:39:59+5:30

बिहारच्या कटिहार जिल्ह्यात आकाशातून एक दगड पडल्याची रहस्यमय घटना घडली आहे. सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू आहे. आकाशातून पडलेल्या दगडाच्या तुकड्यांना स्थानिक लोक उल्कापिंड असल्याचं सांगत आहेत. रविवारी रात्री १० च्या सुमारास एका घराच्या अंगणात दगडाचे तुकडे पडले आहेत.

या घटनेचा व्हिडिओ परिसरात व्हायरल झाला आहे. ज्यात एक सोनेरी रंगाचा दगड आकाशातून पडला जो हातात ठेवल्यानंतर त्याला आग लागली. ही घटना वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि लोकांनी ते पाहण्यासाठी गर्दी केली. या दगडाबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. बासुदेव सिंह नावाच्या व्यक्तीच्या घराच्या अंगणात हा दगड पडला.

दगड खाली पडल्यानंतर त्यातून धूर येऊ लागला. त्यामुळे घरातील सगळे सदस्य बाहेर आले तेव्हा अंगणात सोनेरी रंगाचा अजब दगडाचे तुकडे विखुरलेले त्यांनी पाहिले. अनेकजण त्याला उल्कापिंड म्हणत आहेत परंतु अद्याप त्याचे ठोस प्रमाण नाही. या घटनेमुळे परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.

या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शी बासुदेव यांचा मुलगा राजेश म्हणाला की, रविवारी रात्री १० च्या सुमारास आम्हाला काहीतरी खाली कोसळल्याचा आवाज आला. आम्ही अंगणात जाऊन पाहिले तेव्हा सोनेरी रंगाचे दगडाचे तुकडे पडले होते त्यातून धूर येत होता. ही घटना समजताच गावकऱ्यांनी गर्दी केली.

त्यानंतर बासुदेव सिंह यांच्या कुटुंबातील लोकांनी हे तुकडे उचलून पाण्याच्या भांड्यात ठेवले. त्यानंतर आणखी धूर येऊ लागला. उल्कापिंडाच्या अवशेषाचा हा भाग असेल असं अनेकजण म्हणू लागले. रविवारी रात्री घडलेली ही घटना सोमवारी जिल्ह्यात सगळीकडे पसरली. लोकांसाठी हे अनोखे दगडाचे तुकडे चर्चेचा विषय बनले.

त्यातच बासुदेव सिंह यांचा छोटा मुलगा गुल्लू याने पाण्याच्या भांड्यात ठेवलेला दगडाचा एक तुकडा उचलून त्याच्या मित्रांना दाखवण्यासाठी घेऊन जात होता. हा तुकडा त्याने पॅन्टच्या खिशात ठेवताच काही क्षणातच त्याच्या पॅन्टमध्ये आग लागली. गोंधळात त्याने पॅन्ट काढून खिशातून तुकडा बाहेर काढला.

त्यानंतर हा तुकडा जमिनीवर जळत होता. हा तुकडा पुन्हा एकदा पाण्याच्या भांड्यात टाकला तेव्हा तो लाल रंगाचा झाला. तुकडा पाण्याबाहेर काढल्यानंतर त्याला आग लागत होती. या मुलाच्या पॅन्टमध्ये आग लागल्यामुळे त्याच्या हाताला, मांडीला आणि पोटाला काही प्रमाणात भाजले आहे.

या रहस्यमय घटनेने गावात दहशत पसरली आहे. काही लोक याला अशुभ संकेत असल्याचं मानत आहेत तर काही हा दैवी चमत्कार असल्याचा दावा करत आहेत. माझ्या आयुष्यात अशी घटना मी पहिल्यांदाच पाहिली असं घटनास्थळी भेटीला आलेल्या नगरसेविका बंटी सिन्हा यांनी म्हटलं आहे.

तर मनिहारी येथील आमदार मनोहर प्रसाद सिंह यांनी ही घटना दुर्मिळ असून असामान्य आहे. प्रशासनाने या तुकड्याची चाचणी करायला हवी. त्याशिवाय लोकांनी कुठल्याही अज्ञात वस्तूला हात लावू नका, त्याची माहिती प्रशासनाला द्या असं आवाहन केले आहे.

दरम्यान, ही घटना उल्कापिंडाशी निगडीत असू शकते. पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करतेवेळी जास्त घर्षण झाल्यामुळे ते जळते. जमिनीवर पडल्यानंतर अनेक तुकड्यात ते विखुरले जाते. हे तुकडे उष्ण आणि रिएक्टिव्ह होऊ शकतात असं उल्कापिंड विषयातील तज्ज्ञ प्रद्युमन ओझा यांनी सांगितले आहे.

टॅग्स :बिहारBihar