दीड लाखांहून अधिक ट्रॅक्टर, ९ मार्ग, दोन दिवस; अशी असेल दिल्लीतील शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली

By बाळकृष्ण परब | Published: January 25, 2021 10:16 PM2021-01-25T22:16:38+5:302021-01-25T22:22:31+5:30

Farmer Tractor March News : प्रजासत्ताक दिनी शेतकरी दिल्लीमध्ये भव्य ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. अतिभव्य अशा स्वरूपात होणाऱ्या या ट्रॅक्टर रॅलीच्या वैशिष्ट्यांचा घेतलेला हा आढावा.

केंद्र सरकारने पारीत केलेल्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर अधिकच तीव्र झाले आहे. दरम्यान, प्रजासत्ताक दिनी शेतकरी दिल्लीमध्ये भव्य ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. अतिभव्य अशा स्वरूपात होणाऱ्या या ट्रॅक्टर रॅलीच्या वैशिष्ट्यांचा घेतलेला हा आढावा.

दिल्लीमध्ये होणाऱ्या या ट्रॅक्टर रॅलीमध्ये सुमारे दीड लाखांहून अधिक ट्रॅक्टर सहभागी होणार आहेत. ही ट्रॅक्टर रॅली दिल्लीतील विविध नऊ मार्गांवर एकाच वेळी सुरू होईल. तसेच ही रॅली सुमारे दोन दिवस चालण्याची शक्यता आहे.

प्रजासत्ताक दिनी सकाळी आठ वाजता शेतकरी नेते मंचावर येतील. त्यानंतर विविध ठिकाणांहून सकाळी दहा वाजता रॅलीला सुरुवात होईल. जोपर्यंत शेवटचा ट्रॅक्टर माघारी येत नाही तोपर्यंत ही रॅली सुरू राहील.

ही रॅली सिंघू बॉर्डर, टिकरी बॉर्डर, गाझीपूर बॉर्डर, चिल्ला बॉर्डर, ढांसा बॉर्डर, शाहजहांपूर, मसानी बराज, पलवल ते बदरपूर, नूंह येथील सुणैना बॉर्डर येथून सुरू होईल. या रॅलीमध्ये २० ते २५ राज्यांचे देखावे असतील, अशी माहिती योगेंद्र यादव यांनी दिली.

एवढ्या भव्य प्रमाणात होणाऱ्या ट्रॅक्टर रॅलीचे व्यवस्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ कामाला लावण्यात आले आहे. यासाठी सहा ते सात समित्या बनवण्यात आल्या आहेत. तसेच प्रसारमाध्यमांसाठीही नऊ समित्या बनवण्यात आल्या आहेत. सर्व ठिकाणी एक एक व्यक्ती याचे नेतृत्व करणार आहेत.

ट्रॅक्टर रॅलीमध्ये सर्व ठिकाणी समोर नेते चालतील. तसेच मध्ये मध्येही नेते आणि घोणषा करणाऱ्या गाड्या चालवल्या जातील.

ट्रॅक्टर रॅलीत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जागोजागी पॉईंट्स बनवण्यात आले आहेत. तसेच शेतकऱ्यांकडून सुमारे १०० अॅम्बुलन्सचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

ट्रॅक्टर रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर सहभागी होणार असल्याने वाटेत ट्रॅक्टर बिघडल्यास रॅलीचा खोळंबा होऊ नये यासाठी ट्रॅक्टर दुरुस्तीची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ट्रॅक्टरसाठी डिझेल पुरवठ्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.