Mirabai chanu : मीराबाईच्या घरी लगेच पोहोचला पिझ्झा, आई-वडिलांसमोर लागली थप्पी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 02:10 PM2021-07-25T14:10:54+5:302021-07-25T14:21:31+5:30

मीराच्या या उत्तराची दखल घेत, डोमिनो पिझ्झाने मीराबाई चानूला लाईफटाईम पिझ्झा मोफत देण्याची घोषणा केली आहे. निधी रजधान यांच्या ट्विटला डोमिनो पिझ्झाने हे उत्तर दिलंय.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची सुरुवात दमदार झाली आहे. पहिल्याच दिवशी भारताच्या महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू हिनं ४९ किलो वजनी गटात भारतासाठी रौप्य पदकाची कमाई करुन दिली.

पदकाची मानकरी होताच मीराबाईनं गेल्या पाच वर्षांपासून बाळगलेलं ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न पूर्ण झाल्याची भावना व्यक्त केली.

तसेच, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पदक जिंकल्यानंतर पहिली गोष्ट काय करणार? असा प्रश्न मीराबाईला विचारण्यात आला होता. त्यावर, तिनेही भन्नाट उत्तर दिलं.

मीराबाईच्या या यशानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत तिचं कौतुक होत आहे. तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मणीपूरचे मुख्यमंत्री ए.बीरेन सिंग यांनी मीराबाईशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत तिचं अभिनंदन व कौतुक केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तिचं ट्विटरवरुन अभिनंदन केलं आहे. मीराबाईवर सध्या बक्षीसांचा वर्षावही होत आहे. त्यातच, मणीपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी तिला 1 कोटी रुपये आणि विशेष सरकारी पोस्ट देण्याचीही घोषणा केली आहे.

विशेष म्हणजे मीराबाईला एका वृत्तवाहिनीने विचारलेल्या प्रश्नावर, पदक जिंकल्यानंतर पहिलं पिझ्झा खायचा आहे, असे भन्नाट उत्तर दिलं होतं.

मीराच्या या उत्तराची दखल घेत, डोमिनो पिझ्झाने मीराबाई चानूला लाईफटाईम पिझ्झा मोफत देण्याची घोषणा केली आहे. निधी रजधान यांच्या ट्विटला डोमिनो पिझ्झाने हे उत्तर दिलंय.

मीराबाईने सांगितलं अन् आम्ही ते ऐकलं. मीराबाईने पिझ्झा खाण्यासाठी अजिबात वाट पाहायची गरज नाही. तर, मीराबाईला आमच्याकडून लाईफटाईम पिझ्झा मोफत देण्यात येईल, असे डोमिनो इंडिया या ट्विटर अकाऊंटवरुन जाहीर करण्यात आलं आहे.

डोमिनो कंपनीने मार्केटींगचा चांगला उपयोग करत, ऑलिंपिक विजेत्या मीराबाईला मोफत पिझ्झा ऑफर केला आहे. आता, मीराबाई यावर काय भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

देशाची हिरो मीराबाई चानूचं आम्ही स्वागत करतो, तसेच तिच्या पिझ्झाच्या आवडीची दखल घेत तिच्या कुटुबीयांना पिझ्झा देण्यात येत आहे. आमची इम्फाळमधील टीम मीराबाईच्या घरी पोहोचली असून पिझ्झा देऊन टीमने तिच्या कुटुंबीयांनी अभिनंदन केलंय.

मीराबाईचं डोमिनो पिझ्झाकडून आम्ही अभिनंदन करतो, असे डोमिनो इंडियाचे प्रतिक पोटा यांनी म्हटलंय.