UP: दारुची दुकानं उघडल्यानंतर काय झालं तुम्हीच पाहा...लांबच लांब रांगा अन् लुटालूट!

Published: May 11, 2021 04:18 PM2021-05-11T16:18:40+5:302021-05-11T16:30:07+5:30

उत्तर प्रदेशात कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस भयानक होतेय आणि दररोज मृत्यूचे नवनवे आकडे समोर येतायत. पण दारुच्या दुकानांच्या बाहेरची गर्दी काही कमी होताना दिसत नाहीय (Liquor Shops In Uttar Pradesh Open Amid Covid19 Pandemic Long Queues Seen In Ghaziabad Varansi And Kanpur)

उत्तर प्रदेशात आता दारुची दुकानं उघडी करण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. आज दुकानं सुरू झाल्यानंतर दुकानांच्या बाहेर तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. गाझियाबादमध्ये प्रशासनानं दारुची दुकानं सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

कोरोनामुळे राज्यात भयंकर परिस्थिती असताना नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचं गांभीर्य राहिलेलं नसल्याचं दिसून येत आहे. ना सोशल डिस्टन्सिंग ना मास्क ना कोणत्याही नियमांची भीती असं चित्र पाहायला मिळालं.

उत्तर प्रदेशातील दारुची दुकानं बंद ठेवण्यात आल्यानं दिवसाला १०० कोटींचं नुकसान होत असल्याचं प्रशासनानं सांगितलं. राज्याचं अर्थचक्र सुरळीत सुरू ठेवण्याच्या उद्देशातून अटीशर्थीचं पालन करुनच दारुची दुकानं सुरू करण्यास प्रशासनानं परवानगी दिली.

दारुची दुकानं आज सुरू होणार असल्याची माहिती मिळताच मद्य खरदीसाठी नागरिकांनी सकाळी सात वाजल्यापासूनच रांगा लावल्याचं पाहायला मिळालं. वाराणसी शहरातील सर्व दुकानांबाहेर तुफान गर्दी पाहायला मिळाली.

दारू विक्रीला सुरुवात झाल्यानंतर एक खरेदीदार किमान डजनभर बाटल्या खरेदी करत होता. यात काही ठिकाणी धक्काबुक्की आणि लुटालूट झाल्याची घटनाही समोर आली आहे.

दारुच्या दुकानांवर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व पोलीस ठाण्यांना प्रशासनाकडून अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. पण नागरिकांनी केलेली तुफान गर्दी पाहून पोलिसांना गर्दीला सावरणं खूप कठीण जात असल्याचं पहिल्या दिवशी पाहायला मिळालं.

धक्कादायक बाब अशी की राज्यात कोरोनानं भयंकर रुप धारण केलं आहे. हॉस्पीटलमध्ये जागा मिळत नसल्यानं अनेक रुग्णांचे जीव जात आहेत. इतकंच नव्हे, तर यमुना अन् गंगा नदीच्या पात्रातही मृतदेह टाकण्यात येत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

उत्तर प्रदेशांमधील गावांमध्ये अंत्यसंस्कारासाठी सरपण नसल्यामुळे अनेक मृतदेह नदीत सोडून दिले जात आहेत आणि अशा परिस्थितीतही दारुच्या दुकानांबाहेर लागणाऱ्या रांगा म्हणजे नागरिकांमध्ये कशाचीच भीती उरलेली नाही हे दाखवून देणारं ठरत आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!