Coronavirus: आता यापुढे कोरोनापासून कशी घ्यावी काळजी, सर्जिकल मास्क वापरावा की कापडी मास्क?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 10:59 AM2021-09-17T10:59:11+5:302021-09-17T11:05:31+5:30

Coronavirus: तिसऱ्या लाटेतून वाचण्यासाठी काळजी कशी घ्यावी, कोणता मास्क जास्त प्रभावी? जाणून घ्या...

कोरोनाची दुसरी लाट अद्यापही ओसरलेली नाही. मात्र, तिसऱ्या लाटेचा इशारा कायम आहे. काही जाणकारांच्या मते ऑक्टोबर महिन्यात देशात कोरोनाची तिसरी लाट धडकू शकते.

केरळमध्ये अद्याप कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंताजनक स्थिती कायम आहे. महाराष्ट्रातही रुग्णसंख्येने अद्याप तळ गाठलेला नाही. त्यामुळे संकट घोंगावत आहे. तिसऱ्या लाटेची भीती कायम आहे.

सणासुदीत हे संकट आणखी वेगाने समोर येऊ शकते, असाही इशारा देण्यात आला आहे. या लाटेतून वाचण्यासाठी काळजी कशी घ्यावी... कोणता मास्क जास्त प्रभावी... जाणून घ्या नवे संशोधन काय सांगते.

या संशोधनात बांगलादेशच्या एकूण ६०० गावांमधील ३.५ लाख लोकांना सहभागी करून घेतले होते. पुनर्वापरात आणले जाणारे सर्जिकल व कापडी मास्कवरही यात संशोधन करण्यात आले.

घरोघरी जाऊन मास्कचे मोफत वितरण करण्यात आले. नागरिकांना माहितीपुस्तके तसेच व्हिडीओच्या माध्यमातून मास्क वापरण्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्यास नागरिकांना आग्रह करण्यात आला.

कोरोनाविरोधात मास्क किती सुरक्षित आहे हे जाणून घेण्यासाठी बांगलादेशमध्ये नुकतेच एक संशोधन करण्यात आले. या संशोधनाचा अहवाल इनोव्हेशन फॉर पॉवर्टी ॲक्शनमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.

सर्जिकल मास्कमुळे संसर्गाचे प्रमाण आधीपेक्षा ९.३ टक्क्यांनी घटले. सर्जिकल मास्कने नागरिकांना ११ टक्के अधिक सुरक्षा दिल्याचे दिसून आले. त्रिस्तरीय पॉलीप्रोपाईलीनमुळे सर्जिकल मास्कची हवा गाळण्याची क्षमता (फिल्ट्रेशन एफिशियंसी) ९५ टक्के असल्याचे आढळून आले.

६० वर्षांपेक्षा अधिक वय अससेल्यांमध्ये या मास्कमुळे ३५ टक्के संसर्ग रोखण्यात यश मिळाले. सर्जिकल मास्क वापरण्यासाठी अधिक आरामदायक असतात. उष्ण तसेच दमट वातावरणात राहणाऱ्या नागरिकांसाठी हे अधिक आरामदायी असल्याचे दिसून आले. हे मास्क बनवण्यासाठी कापडी मास्कच्या तुलनेत एक चतुर्थांश खर्च येतो, असे यात म्हटले आहे.

दरम्यान, कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम क्वारंटाईल, आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेण्यात येत आहे.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल २२ कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या २२७,४०६,२११ वर पोहोचली आहे. तर ४,६७६,४५२ लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. तर २०४,११७,७१६ जणांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. वेगाने पसरणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग तब्बल १८० देशांमध्ये झाला आहे.

WHO ने दिलासादायक माहिती दिली आहे. गेल्या आठवड्यात जगभरात नोंदवण्यात आलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मागील दोन महिन्यांच्या काळात पहिल्यांदा झालेली ही मोठी घट आहे. जगातील सर्वच भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे. तसेच बळींच्या संख्येतही घट झाली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या ही दक्षिण-पूर्व आशिया भागात झाली आहे. तर आफ्रिकेमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यू दरात सात टक्क्यांची वाढ झाली आहे. अमेरिका, ब्रिटन, भारत, इराण आणि तुर्कीमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली.