Wasim Rizvi: इस्लाम सोडून हिंदू धर्माची दीक्षा घेणारे वसीम रिझवी कोण आहेत? ‘हे’ आहे नवे नाव; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 01:29 PM2021-12-06T13:29:54+5:302021-12-06T13:34:19+5:30

वसीम रिझवी यांनी हिंदू सनातन धर्म स्वीकारल्यानंतर होम-हवन आणि शुद्धीकरण प्रक्रिया करण्यात येत आहे.

शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी (Wasim Rizvi) इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारला. गाझियाबादमधील डासना येथील देवीच्या मंदिरात नरसिंहानंद सरस्वती यांनी त्यांचा हिंदू धर्मात समावेश केला.

जुना आखाड्याचे महामंडलेश्वर नरसिंहानंद सरस्वती यांनी त्यांना सनातन धर्माची दीक्षा दिली आणि त्यानंतर रिझवी यांचे नाव बदलले. यावेळी नरसिंहानंद सरस्वती म्हणाले की, आम्ही वसीम रिझवी यांच्यासोबत आहोत. हिंदू धर्माची दीक्षा दिल्यानंतर त्यांचे नवीन नाव जितेंद्र नारायण सिंह त्यागी झाले आहे.

मला आमच्याच लोकांनी इस्लाममधून बहिष्कृत केले, त्यानंतर मी कोणता धर्म स्वीकारावा हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. मी सनातन धर्म निवडला कारण तो जगातील सर्वात जुना धर्म आहे, अशी प्रतिक्रिया वसीम रिझवी यांनी यावेळी दिली.

वसीम रिझवी यांनी सनातन धर्म स्वीकारल्यानंतर त्यांचे शुद्धीकरण करण्यात येत आहे. तसेच हवन-यज्ञही होणार आहे. महामंडलेश्वर नरसिंहानंद गिरी यांच्या देखरेखीखाली सर्व विधी पार पडणार आहेत.

वसीम रिझवी हे उत्तर प्रदेशातल्या शिया वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन आहेत. वसीम रिझवी यांनी कुराणातील २६ आयतींवर आक्षेप घेत हटवण्याची मागणी केली होती. यानंतर ते खरे चर्चेत आले. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका नंतर फेटाळली.

वसीम रिझवी यापूर्वी सन २००० मध्ये लखनौच्या काश्मिरी मोहल्ल्यातून समाजवादी पार्टीच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यानंतर २००८ मध्ये ते शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे सदस्य झाले. मात्र, सन २०१२ मध्ये मौलवी कल्बे जावेद यांच्याशी झालेल्या वादामुळे रिझवी यांची समाजवादी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.

वसीम रिझवी यांनी फंड घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. फंड घोटाळ्याचे प्रकरण न्यायालयातही गेले होते. मात्र, रिझवी या प्रकरणातून निर्दोष सुटले होते. वसीम रिझवी यांनी घेतलेल्या काही भूमिकांमुळे ते कट्टरतावाद्यांच्या रडारवर आहेत.

वसीम रिझवी यांच्या भूमिकेवर शिया आणि सुन्नी दोन्हींचे मौलवी तुटून पडले. जो कुणी वसीम रिझवी यांचे डोके छाटेल, त्याला १० लाख आणि हजची मोफत ट्रिप दिली जाईल, असे बक्षिस बरेलीची संघटना ऑल इंडिया फैजन ए मदिना कॉन्सिलने जाहीर केले होते.

सन २०१८ मध्ये वसीम रिझवी यांनी मदरशांमध्ये समलैंगिक संबंध वाढतात, असा मोठा आरोपही केला होता. इतकेच नाही, तर उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्र लिहून त्यांनी मदरशांवर बंदी घालण्याची मागणी केली. या मदरशांमध्ये दहशतवादाला खतपाणी घातले जात असल्याचा आरोप केला होता.

तसेच अलीकडेच वसीम रिझवी यांनी मृत्यूपत्र जारी केले आहे. यात, मृत्यूनंतर आपले दफन करण्यात येऊ नये, तर हिंदू परंपरेप्रमाणेच आपल्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत. एवढेच नाही, तर यती नरसिंहानंद यांनी आपल्या चितेवर अग्नीसंस्कार करावेत, असेही रिझवी यांनी म्हटले होते.

मला ठार मारण्याचा आणि शिरच्छेद करण्याचा कट रचला जात आहे. मुस्लिमांची मला मारण्याची इच्छा आहे. तसेच, त्यांनी मला कुठल्याही कब्रस्तानात जागा देणार नाही, असेही जाहीर केले आहे. यामुळे मी मेल्यानंतर माझ्यावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत, असे वसीम रिझवी यांनी म्हटले होते.

वसीम रिझवी यांचा इस्लाम आणि शिया समाजाशी काहीही संबंध नसल्याचे मुस्लीम संघटनांचे म्हणणे असून, रिझवी हे मुस्लीमविरोधी संघटनांचे एजंट आहेत, असा आरोपही काही संघटनांकडून करण्यात आला आहे.