मस्तच...आता 10 रुपयांच्या प्लॅटफॉर्म तिकिटावरही रेल्वेतून प्रवास करता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 12:55 PM2019-08-01T12:55:24+5:302019-08-01T13:04:02+5:30

रेल्वेने कुठेही जाताना आगाऊ आरक्षण नसेल तर रेल्वे सुटण्याच्या आधी स्टेशनवर रांगा लावाव्या लागतात. अशावेळी रांगेत असतानाच रेल्वे प्लॅटफॉर्मवर आल्याची घोषणा होते किंवा रेल्वेच्या वेळेतच आपण स्टेशनवर पोहोचतो. पण तिकीट काढण्याचा वेळ नसल्याने विना तिकीट जाण्याचे धाडस करतो किंवा रेल्वे सोडतो. पुढे जर टीसीने पकडले तर दंड, तुरुंगवारी हे आलेच.

हा प्रसंग टाळण्यासाठी रेल्वेने एक सुविधा आणली आहे. नातलगांना सोडण्यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवेश देण्यात येतो. यासाठी 10 रुपयांचे प्लॅटफॉर्म तिकिट देण्यात येते. या तिकिटावरही रेल्वे प्रवास करता येणार आहे.

प्लॅटफॉर्म तिकीट म्हणजे प्लॅटफॉर्मवर प्रवेश मिळण्यासाठी रेल्वे तिकीट देते. हे तिकीट केवळ 2 तासांच्या मुदतीचे असते. याचाच अर्थ तुम्ही या तिकीटावर प्रवास करू शकत नाही. पण रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर जाऊ शकता. 10 रुपयांचे एक तिकीट एकाच व्यक्तीसाठी असते. हे तिकीट युटीएस अॅपवरही काढता येते.

एखाद्यावर असा प्रसंग उद्भवला तर रेल्वेने मदतीचा हात दिला आहे. या प्रवाशाचे कारण खरेच योग्य असेल तर तो प्लॅटफॉर्म तिकिटावर रेल्वेने प्रवास करू शकणार आहे.

प्लॅटफॉर्म तिकिटावर प्रवास करण्यासाठी एक काम करावे लागणार आहे. रेल्वेत गेल्यानंतर रेल्वेने अधिकार दिलेल्या गार्ड, टीसी किंवा अन्य अधिकाऱ्याकडून या तिकिटावर रेल्वे प्रवासाची परवानगी घ्यावी लागणार आहे. यासाठी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना त्याची अडचण पटवून द्यावी लागणार आहे. यानंतर या प्रवाशाला या प्लॅटफॉर्म तिकीटावर प्रवास करण्यासाठी अधिकृत तिकीट देण्यात येणार आहे.

रेल्वेमध्ये जनरल तिकीट असेल आणि स्लीपरमध्ये किंवा अन्य आरक्षित डब्यांमध्ये सीट रिकाम्या असतील तर त्या जनरल तिकीटावर दंड न आकारता रेल्वेच्या आरक्षित तिकीटाएवढा दर आकारला जातो आणि ती सीट त्या प्रवाशाला दिली जाते. अशीच काहीशी ही सुविधा असणार आहे.

रेल्वेच्या गार्डच्या परवानगी पत्राद्वारे रेल्वेतील टीसी या प्रवाशाला तिकीटाएवढा दर आणि 250 रुपयांचा दंड आकारत प्रवासाचे नियमित तिकीट देणार आहे. मात्र, त्या प्रवाशाला आरक्षित जागा मिळेल याची शाश्वती नसणार आहे.

प्लॅटफॉर्म तिकीटावर रेल्वेत चढल्यानंतर सर्वात आधी रेल्वेचा टीसी गाठावा लागणार आहे. त्याच्याशी बोलून गार्डकडून परवानगी पत्र घ्यावे लागेल.

अन्यथा टीसीनेच तुम्हाला पकडल्यावर प्लॅटफॉर्म तिकीट अवैध होणार आहे. विना तिकीट प्रवासासाठी 1260 रुपयांचा दंड सोबत तुरुंगवारी भोगावी लागण्याची शक्यता आहे.