भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 15:09 IST2025-04-30T15:05:31+5:302025-04-30T15:09:19+5:30

India vs Pakistan war: जगातील काही देश हे भारताच्या बाजुने आहेत, काही दोन्ही दगडांवर पाय ठेवून आहेत, तर काही देश पाकिस्तानची उघडपणे बाजू घेत नाहीयत परंतू पाकिस्तानला मदत करण्याच्या स्थितीत आहेत.

भारताने दहशतवादी हल्ल्याविरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई करण्याबाबत सैन्याला खुली सूट दिली आहे. यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडालेली आहे. येत्या २४ ते ३६ तासांत भारत पाकिस्तानवर लष्करी कारवाई करू शकतो, असे मध्यरात्री उठून पाकिस्तानला सांगावे लागले आहे, यावरून पाकिस्तान किती हादरलेला आहे हे दिसत आहे. जर युद्ध सुरु झालेच तर पाकिस्तानची मदत कोण कोण करणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

जगातील काही देश हे भारताच्या बाजुने आहेत, काही दोन्ही दगडांवर पाय ठेवून आहेत, तर काही देश पाकिस्तानची उघडपणे बाजू घेत नाहीयत परंतू पाकिस्तानला मदत करण्याच्या स्थितीत आहेत. भारताने पहलगाम दहशतवादी हल्ला झाल्यापासून जगभरात संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. बहुतांश देशांनी भारताला पाठिंबा दर्शविलेला आहे. यात रशिया, इस्रायल, अमेरिका, युके असे देश आहेत.

भारतावर मदतीची वेळ आलीच तर सर्वात पहिले देश असतील ते म्हणजे रशिया आणि इस्रायल. हे दोन्ही देश भारताचे खूप पूर्वीपासूनचे पाठीराखे आहेत. बांगलादेश युद्धावेळी तर रशियाने भारतावर चाल करून येणाऱ्या अमेरिकी विमानवाहू युद्धनौकेमागे आपल्या युद्धनौका लावल्या होत्या. कारगिल युद्धावेळी उंच प्रदेशात पाकिस्तानच्या सैन्यावर हल्ला करण्यासाठी इस्रायलने लेझर गायडेड मिसाईल पुरविली होती. अमेरिका मात्र नेहमी पाकिस्तानच्या बाजुने राहिला होता.

आज अमेरिकेने दहशतवादी हल्ल्यामुळे भारताला मदत देण्याचे आश्वासन दिलेले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण दहशतवाद विरोधी कारवाईसाठी लागेल ती मदत करण्यास तयार असल्याचा शब्द मोदींना दिला आहे. परंतू, याच अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात आहेत, जी अमेरिकेने फुकटात पाकिस्तानला दहशतवादाविरोधात लढण्याच्या नावाखाली दिलेली आहेत. ती दहशतवादाविरोधात कधीच नाही परंतू भारताविरोधात वापरली जात आहेत.

पाकिस्तानची मदत करण्याची उघड भूमिका कोणाही घेतलेली नाहीय. परंतू, तुर्कस्तान आणि चीन हे दोन देश पाकिस्तानला काहीही करून मदत करणार आहेत. हल्ल्यानंतर काही दिवसांत तुर्कीची सहा लष्करी मालवाहू विमाने कराची आणि इस्लामाबाद विमानतळावर आली होती. तसेच चीनने देखील लष्करी सामुग्री पाकिस्तानला पाठविली आहे.

या दोन देशांनंतर मालदीव आणि बांग्लादेश हे दोन देश पाकिस्तानच्या मदतीला जाण्याची शक्यता आहे. कारण मालदीवचे नवे सरकार भारतविरोधी आहे, ते लष्करी नाही परंतू आर्थिक मदत नक्कीच करू शकतात. तर बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस हे भारतविरोधी वक्तव्ये करत सुटले आहेत. यामुळे ते देखील पाकिस्तानला मदत करण्याची दाट शक्यता आहे.

यामुळे पाकिस्तानची खरी मदत तुर्की आणि चीनच करणार आहेत. तुर्कीला मुस्लिम राष्ट्रांचा तारणहार बनायचे आहे. तसेच तुर्कीकडे अद्ययावत ड्रोन, शस्त्रे आहेत. ती पाकिस्तानला दिली तर मुस्लिम राष्ट्रांत आपण हिरो होणार, सौदी मागे पडणार अशा तयारीत ते आहेत.

चीन जेवढी शस्त्रे दुसऱ्या देशांना पुरवितो त्यापैकी ८२ टक्के शस्त्रे ही पाकिस्तानला जातात. यामुळे चीन पाकिस्तानला शस्त्रे देणार आहेच शिवाय टेक्निकल सपोर्ट आणि भारताला दुसऱ्या बाजुने नामोहरम करण्यासाठी पाकिस्तानला मदत करू शकतो. सध्या अमेरिकेसोबतच्या ट्रेड वॉरमुळे चीन भारतालाही दुखवू शकत नाही, एवढीच काय ती जमेची बाजू आहे.