CoronaVirus News: 'ती' एक चूक भोवली अन् देशात कोरोनाची दुसरी लाट आली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 04:26 PM2021-05-05T16:26:54+5:302021-05-05T16:29:53+5:30

CoronaVirus News: भारत आणि ब्राझीलमधील सरकारांनी केलेली एक चूक सर्वसामाान्यांच्या जीवावर बेततेय

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. चारच दिवसांपूर्वी देशात पहिल्यांदाच एका दिवसात चार लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. एप्रिलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढली.

देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं अनेक राज्यांमधील आरोग्य व्यवस्थेवर खूप मोठा ताण आहे. अनेक राज्यांमध्ये रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे उपचारांअभावी रुग्ण प्राण सोडत आहेत.

भारत आणि ब्राझीलमध्ये कोरोमाची दुसरी लाट येणार असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला होता. मात्र दोन्ही देशांमधील सरकारांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. याचे परिणाम आता दोन्ही देशांमध्ये पाहायला मिळत आहेत.

दोन्ही देशांमधील सरकारांनी शास्त्रज्ञांचा सल्ला गांभीर्यानं घेतला असता, तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. पण ख्यातनाम सायन्स जर्नल नेचरच्या वृत्तानुसार भारत आणि ब्राझील सरकारनं शास्त्रज्ञांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं.

भारत आणि ब्राझीलकडे कोरोनाची दुसरी लाट रोखण्याची चांगली संधी होती. यासाठी शास्त्रज्ञांनी वेळोवेळी सतर्कतेचे इशारेदेखील दिले होते. मात्र दोन्ही सरकारांनी याकडे गांभीर्यानं पाहिलं नाही.

नेचर जर्नलच्या वृत्तानुसार भारत आणि ब्राझील एकमेकांपासून १५ हजार किलोमीटर दूर आहेत. मात्र दोन्हीकडे असलेली समस्या सारखीच आहे. दोन्ही देशांच्या नेत्यांनी शास्त्रज्ञांच्या सल्ल्याकडे आधी दुर्लक्ष केलं. त्यानंतर ज्यावेळी सल्ल्यांची अंमलबजावणी केली गेली, तेव्हा बराच उशीर झाला होता.

ब्राझीलचे अध्यक्ष जायर बोल्सोनारो यांनी कोरोना म्हणजे साथा फ्लू असल्याचं म्हटलं. मास्क, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्याच्या बाबतीतही ब्राझीलमध्ये आनंदीआनंदच होता.

भारतात शास्त्रज्ञांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचं 'नेचर'नं म्हटलं आहे. देशात आयोजित धार्मिक कार्यक्रमांमध्ये हजारो जणांनी सहभाग घेतला. निवडणूक प्रचारसभांमध्ये हजारोंची गर्दी जमली. याचमुळे भारतात कोरोनाची दुसरी लाट आली.

गेल्या सप्टेंबरमध्ये देशात कोरोनाच्या पहिल्या लाटेनं टोक गाठलं. त्यावेळी कोरोना रुग्णांची संख्या ९६ हजार इतकी होती. नव्या वर्षात कोरोनाचा वेग मंदावला. मार्चच्या सुरुवातीला नव्या रुग्णांचा आकडा १२ हजारांवर आला. त्यामुळे सरकार निर्धास्त झालं. इथून परिस्थिती हाताबाहेर गेल्याचं नेचरनं म्हटलं आहे.

पहिली लाट ओसरल्यानंतर सरकारपासून सर्वसामान्य बेजबाबदारपणे वागू लागले. मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवले जाऊ लागले. निवडणूक प्रचारसभा, धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन होऊ लागलं. फेब्रुवारी, मार्चमध्ये दाखवलेल्या या ढिलाईमुळे एप्रिलमध्ये कोरोनानं थैमान घातलं.

Read in English