१८ वर्षांवरील सर्वांचं आजपासून मोफत कोरोना लसीकरण; नेमकं काय करायचं आणि कसं? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 08:54 AM2021-06-21T08:54:16+5:302021-06-21T09:03:11+5:30

देशात आजपासून म्हणजेच २१ जूनपासून कोरोनाविरोधातील लसीकरण मोहिमेच्या महत्वाच्या टप्प्याला सुरुवात होत आहे. देशात आजपासून १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण केंद्र सरकारकडून मोफत केलं जाणार आहे. पण यासाठी नेमकं काय करायचं? जाणून घेऊयात...

योग दिनाचं औचित्य साधून केंद्र सरकारनं आजपासून देशातील १८ वर्षांवरील सर्वांचं मोफत कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात केली आहे. यात लसीकरणासाठी कोविन अॅपवर रजिस्ट्रेशनची देखील गरज पडणार नाहीय. जेणेकरुन वॉन इन लसीकरणाची संख्या वाढेल अशी आशा सरकारला आहे.

दिवसाला ५० लाख लोकांचं लसीकरण करण्याचं लक्ष्य केंद्र सरकारनं ठेवलं आहे. सध्या दैनंदिन पातळीवर ४० लाखाहून कमी लसीकरण होत आहे.

सरकारनं खासगी रुग्णालयांसाठी २५ टक्के लस खरेदीचा वाटा ठेवून त्यांनाही या लसीकरण मोहिमेत सहभागी करुन घेण्याचं ठरवलं आहे. खासगी रुग्णालयात पैसे देऊन लसीकरण केलं जाणार असलं तरी त्यावर रुग्णालयांकडून घेण्यात येणाऱ्या सेवा शुल्काचंही बंधन केंद्रानं घालून दिलेलं आहे.

केंद्र सरकारनं आता देशातील लसीकरणाची जबाबदारी स्वीकारलेली असल्यानं मोफत लसीकरणासाठी नागरिकांना नेमकं काय करावं लागणार आहे? लसीकरणासाठी कुठे जावं लागणार आहे? हे जाणून घेऊयात...

कोरोना लसीकरणासाठी कोविन अॅपवरील अपॉइंटमेंट शेड्युल करणं आता गरजेचं नसलं तरी या अॅपवर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असणं गरजेचं आहे. त्यामुळे कोविन अॅपवर तुमचं नाव आणि आधार कार्ड क्रमांक अपडेट करुन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता

सरकारी रुग्णालयात मोफत लसीकरण केलं जात आहे. जवळच्या सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोना लसीकरणासाठी तुम्ही संपर्क साधू शकता. यासाठी कोविन अॅपवर रजिस्ट्रेशन असणं अनिवार्य नाही. थेट रुग्णालयात जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता.

खासगी रुग्णालयांमध्येही कोविन अॅपवर रजिस्ट्रेशनची आवश्यकता आता भासणार नाही. पण खासगी रुग्णालायांमध्ये कोरोना लसीकरणासाठी तुम्हाला पैसे मोजावे लागणार आहेत.

खासगी रुग्णालयात कोव्हॅक्सीन लसीसाठी १,४१० रुपये, कोव्हीशिल्डसाठी ७९० रुपये आणि स्पुतनिक-V साठी १,१४५ रुपयांपेक्षा अधिक रुपये आकारले जाऊ शकतात. पण केंद्र सरकारकडून खासगी रुग्णालयांकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्काचा मर्यादा निश्चित केलेली आहे. त्यापेक्षी अधिक शुल्क आता रुग्णालयांना आकारता येणार नाहीय.

लसीकरणाचं प्रमाणपत्र कसं मिळवाल? लसीकरण घोटाळ्याचीही प्रकरणं पुढे येत असल्यानं लसीकरण झाल्यानंतर तुम्ही लसीकरणाचं प्रमाणपत्र मिळवणं देखील अत्यंत महत्वाचं झालं आहे. यासाठी verify.cowin.gov.in या संकेतस्थळावर गेल्यानंतर स्कॅन क्यूआरकोड पर्यायवर क्लिक करा.

मोबाइलच्या कॅमेराचा उपयोग करुन तुम्ही क्यूआरकोड स्कॅन करू शकता. त्यानंतर तुम्हाला देण्यात आलेलं किंवा उपलब्ध झालेलं प्रमाणपत्र खरं आहे की खोटं याची पडताळणी तुम्ही करू शकता.

क्यूआर कोड स्कॅन झाल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव, वय, लिंग, प्रमाणपत्राचा आयडी, लस घेतल्याची तारीख आणि कुठे लस घेतली याची सर्व माहिती उपलब्ध होईल

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!