Coronavirus: फेब्रुवारी २०२१ पर्यंत देशातील निम्म्या लोकसंख्येला कोरोनाची लागण?; सरकारी तज्ज्ञ म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 08:23 AM2020-10-20T08:23:09+5:302020-10-20T08:26:02+5:30

चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसनं जगभरात कहर केला आहे. गेल्या ८ महिन्यापासून कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जगातील बहुसंख्य देशात लॉकडाऊन ते अनलॉक प्रक्रिया झाली आहे.

या संकटकाळात अनेक नागरिकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. भारतातील किमान निम्म्या लोकसंख्येला म्हणजे ६५ कोटीच्या आसपास लोकांना कोरोनाची लागण होण्याची भीती तज्ज्ञांनी वर्तवली आहे. फ्रेब्रुवारी २०२१ पर्यंत निम्म्या लोकांना कोरोना होण्याची शक्यता आहे असा अंदाज केंद्र सरकारकडून बनवलेल्या तज्ज्ञांच्या समितीकडून देण्यात आला आहे.

इतकचं नव्हे तर एवढ्या मोठ्या संख्येने संक्रमण झाल्याने कोरोना प्रार्दुभाव वेग मंदावण्यास मदत होईल असंही त्यांनी सांगितले आहे. आतापर्यंत भारतात ७५ लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या अमेरिकाच भारताच्या पुढे आहे.

सप्टेंबरच्या मध्यापासून देशात कोरोना रुग्णांमध्ये घट दिसून येईल. गेल्या १ महिन्यापासून दररोज ६१, ३९० रुग्णांची नोंद होत आहे. पॅनेलचे सदस्य आणि आयआयटी कानुपरचे प्राध्यापक मणिंद्र अग्रवाल यांनी न्यूज रॉयटर्सला सांगितले की, आमच्या गणितीय मॉडेलच्या अंदाजानुसार आतापर्यंत देशातील जवळपास ३० टक्के लोकसंख्येला लागण झाली आहे आणि फेब्रुवारीपर्यंत ही संख्या ५० टक्क्यांपर्यंत पोहोचेल.

सीईआरओच्या सर्वेक्षणानुसार सप्टेंबरपर्यंत भारतातील जवळपास १४ टक्के लोकांना कोरोनाची लागण झाली होती, परंतु पॅनेलच्या म्हणण्यानुसार ही आकडेवारी ३० टक्के आहे. आम्ही एक नवीन मॉडेल तयार केले आहे ज्यात नोंद न झालेल्या रुग्णांनाही ओळखते, जेणेकरुन संक्रमित लोकांना दोन भागात विभागले जाऊ शकते असं प्राध्यापक मणिंद्र अग्रवाल म्हणाले.

जर सामाजिक अंतर, मास्क घालण्याची खबरदारी घेतली गेली नाही तर संसर्गाचे प्रमाण वाढू शकते. दुर्गापूजा, दिवाळी, छठ या सणासुदीच्या काळात कोरोना संक्रमण आणखी वाढू शकतात असा इशाराही तज्ज्ञांच्या समितीने दिला आहे.

सेरो सर्वेक्षण विपरीत, विषाणूशास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि इतर तज्ञांच्या या समितीने गणिताच्या मॉडेलवर विश्वास ठेवला आहे. रविवारी समितीचा अहवाल सार्वजनिक करण्यात आला.

दुसरीकडे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने जगभरातील अनेक शास्त्रज्ञांच्या मदतीने भविष्यातील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येचे आकलन करणारे मॉडेल तयार केले आहे. शास्त्रज्ञांनी तंत्रज्ञानाच्या आधारे केलेल्या संशोधनामधून जी माहिती समोर आली आहे. त्यानुसार पुढच्या तीन-ते चार महिन्यांमध्ये देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होणार आहे. तसेच फेब्रुवारी २०२१ मध्ये देशात कोरोनाचे केवळ ४० हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण उरतील, असा दावा हर्षवर्धन यांनी केला.

कोरोनाविरोधातील लसीकरण, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि इतर महत्त्वपूर्ण गोष्टींबाबत राज्य सरकारसोबत योग्य वेळी चर्चा केली जाईल. देशात आता कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू द्यायची नाही आहे. तसेच आम्ही कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होतानाही बघत आहोत असंही हर्षवर्धन यांनी सांगितले आहे.

सोमवारी कोरोनाचे ५५ हजार नवे रुग्ण आढळले असून, रुग्णांची एकूण संख्या ७५,५०,२७८ झाली. एकूण बरे झालेल्यांची संख्या ६६,६३,६०८ आहे. बरे झालेल्यांचे प्रमाण एकूण संख्येच्या तुलनेत ८८.२६ टक्के आहे. देशात ७,७२,०५५ कोरोना रुग्ण उपचार घेत असून सलग चौथ्या दिवशीही हा आकडा ८ लाखांहून कमी होता. उपचार घेत असलेल्यांचे प्रमाण एकूण रुग्णसंख्येच्या १०.२३ टक्के आहे.