शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 12:09 IST

1 / 15
स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यंदाचे पंतप्रधान मोदी यांचे स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेले १२ वे भाषण होते. दरवर्षीचे त्यांचे भाषण एका अनोख्या शैलीत असते. त्याचप्रमाणे त्यांचा पोशाख दरवर्षी चर्चेचा विषय ठरतो.
2 / 15
यावर्षी पंतप्रधान मोदी यांनी पांढरा कुर्ता आणि त्यावर जॅकेट परिधान केले होते. त्याचसोबत डोक्यावर भगवा फेटा आणि गळ्यात तिरंग्याचे उपर्णे होते. दरवर्षी स्वातंत्र्यदिनी परिधान केलेल्या पोशाखातून मोदी राष्ट्रीय एकता, सांस्कृतिक वारसा आणि देशभक्तीचा संदेश देतात. दरवर्षी स्वातंत्र्यदिनाची एक थीम ठरवली जाते. यंदाची थीम 'नया भारत' अशी होती.
3 / 15
२०४७ पर्यंत विकसित भारत साकार करण्याच्या सरकारच्या उद्दिष्टाचे हे प्रतीक आहे. दरवर्षी स्वातंत्र्यदिनी मोदींच्या पगडीची विशेष चर्चा असते. त्यांच्या पगडीचा रंग, त्याचा कापड आणि ती बांधण्याची पद्धती, याकडे सर्वांचे लक्ष वेधले जाते. यंदाचा त्यांचा फेटा विशेष चर्चेत आला आहे.
4 / 15
२०१७ मध्ये पंतप्रधान मोदींनी आतापर्यंत फक्त एकदाच एका तासापेक्षा कमी वेळ राष्ट्राला संबोधित केले. ते पंतप्रधानांचे भाषण फक्त ५६ मिनिटे होते. हे त्यांचे आतापर्यंतचे सर्वांत लहान भाषण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये प्रथमच लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला संबोधित केले, तेव्हा त्यांचे भाषण ६५ मिनिटांचे होते. त्यानंतर २०१५ मध्ये त्यांनी ८६ मिनिटांचे भाषण करत माजी पंतप्रधान दिवंगत जवाहरलाल नेहरूंचा १९४७ मधील ७२ मिनिटांचा विक्रम मोडला.
5 / 15
सर्वांत जास्तवेळ पंतप्रधान मोदी यांचे भाषण २०१६ मध्ये झाले, जेव्हा देशाच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे पूर्ण झाली. ते भाषण ९४ मिनिटांचं होते. २०१७ मध्ये ५७ मिनिटे, २०१८ मध्ये ८२ मिनिटे, २०१९ मध्ये ९२ मिनिटे, २०२० मध्ये ८६ मिनिटे, २०२१ मध्ये ८८ मिनिटे, २०२२ मध्ये ८३ मिनिटे आणि २०२३ मध्ये ९० मिनिटांचे भाषण पंतप्रधान मोदींनी केले.
6 / 15
गेल्या वर्षी २०२४ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी ९८ मिनिटांचे भाषण केले. तर यंदा २०२५ मध्ये सर्व विक्रम मोडून १०३ मिनिटे देशाला संबोधित केले. या दिवाळीत एक मोठी भेट मिळणार आहे. आम्ही सलग ८ वर्षे जीएसटी कमी करण्यासाठी काम केले आहे. आम्ही पुढच्या पिढीच्या जीएसटीवर काम करत आहोत. या दिवाळीत आपण खरेदी केलेल्या आणि दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तू खूप स्वस्त होतील. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.
7 / 15
पंतप्रधान मोदींनी तरुणांसाठी मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेअंतर्गत देशातील तरुणांसाठी १ लाख कोटी रुपयांच्या योजना राबवत आहोत. खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्यांना १५ रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी आणणाऱ्या कंपनीला प्रोत्साहन मिळेल. याचा फायदा ३.५ कोटी तरुणांना होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
8 / 15
आम्ही सुधारणा योग्यरित्या अंमलात आणण्यासाठी एक टास्क फोर्स तयार केला आहे. २०४७ पर्यंत भारताला विकसित देश बनवण्यासाठी ही स्थापन करण्यात आली आहे. देशाला विकसित करण्यासाठी सुधारणा नव्याने अंमलात आणण्यास मदत करेल. आपण जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत. एक वेळ येईल जेव्हा लाल किल्ल्यावरून तुम्हाला हा संदेश दिला जाईल, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
9 / 15
जगभर तंत्रज्ञानाबद्दल चर्चा आणि विकास होत आहे. कोणावरही टीका करणार नाही. पण चार-पाच दशकांपूर्वी आपल्या देशात सेमीकंडक्टरबद्दल चर्चा होत होती, पण कोणीही लक्ष दिले नाही. ती कल्पना रद्द करण्यात आली. आम्ही आता ६ युनिट्स उभारत आहोत. वर्षाच्या अखेरीस मेड इन इंडिया सेमी कंडक्टर चिप्स आणू, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली.
10 / 15
एखाद्या देशासाठी स्वाभिमान सर्वांत महत्त्वाचा असतो. हा स्वाभिमान देश किती आत्मनिर्भर आहे यावर ठरतो. आजच्या काळात, विकसित होणाऱ्या कोणत्याही देशासाठी आत्मनिर्भरता हाच विकासाचा पाया आहे. जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशांवर जास्त अवलंबून असतो, तेव्हा त्याचे स्वातंत्र्य धोक्यात येते. याचाच अर्थ दुसऱ्यांवर अवलंबून राहणे ही एक वाईट सवय आहे. ही सवय राष्ट्रासाठी खूप धोकादायक ठरू शकते.
11 / 15
प्रत्येक क्षणी आपण जागरूक राहणे आवश्यक आहे. आत्मनिर्भरतेचा संबंध केवळ आयात आणि निर्यात, रुपये, पैसे, पाउंड, डॉलर यांच्याशी नाही. तर याचा संबंध आपल्या देशाच्या सामर्थ्याशी जोडलेला आहे. आपले सामर्थ्य टिकवून ठेवण्यासाठी, वाढवण्यासाठी आणि जपण्यासाठी आत्मनिर्भर असणे खूप महत्त्वाचे आहे.
12 / 15
याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर’. या ऑपरेशनमध्ये, भारताने आपल्याच देशात बनवलेल्या (मेड इन इंडिया) शस्त्रांचा वापर केला. शत्रूला हे कळलेच नाही की त्यांच्यावर कशाने हल्ला होत आहे. आपण आत्मनिर्भर नसतो, तर आपल्याला युद्धसामग्रीसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावे लागले असते. गेल्या १० वर्षांपासून भारत सरकार संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे आणि आता त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
13 / 15
आपल्याला लाल किल्ल्यावरून ऑपरेशन सिंदूरच्या शूर सैनिकांना सलाम करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या शूर सैनिकांनी शत्रूंना त्यांच्या कल्पनेपलीकडे शिक्षा दिली आहे. अण्वस्त्रांच्या धमक्यांना आम्ही आता भीक घालत नाही. सिंधू पाणीवाटप करार अन्यायकारक होता, हे देशाला समजले आहे. यामुळे देशातील शेती आणि शेतकरी यांचे अतोनात नुकसान झाले, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.
14 / 15
भारताला समृद्ध करण्यासाठी देशाच्या वस्तू खरेदी केल्या, तर देश पुढे जाईल. शेतकरी आणि मच्छिमार यांच्या हिताशी तडजोड नाही. भारतीयांनी 'व्होकल फॉर लोकल'हा नवा मंत्र बनवावा. भारतीयांनी स्वदेशी वस्तुंच्या खरेदीचा आग्रह धरावा. मेड-इन-इंडिया फायटर जेट भारतात बनू शकत नाही का? भारताचे वैभव, धन भारतातच राहावे, परदेशात का जावे? भारतीय कंपन्यांनी भारतातच खत बनवावे, आयाती खत नको, आत्मनिर्भरता आणू, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले.
15 / 15
१०० वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जन्माला आला, ज्याने राष्ट्र उभारणीसाठी सतत काम केले. स्वतःला देशासाठी समर्पित केले आहे. एका प्रकारे, ही जगातील सर्वांत मोठी स्वयंसेवी संस्था आहे, जी देशासाठी सतत काम करत आहे, मी तिला सलाम करतो. पंतप्रधान मोदींनी देशाच्या सुरक्षेबाबत सुदर्शन चक्र मिशनची घोषणा केली. ही एक शक्तिशाली शस्त्र प्रणाली असेल, ती केवळ शत्रूच्या हल्ल्याला निष्प्रभ करेलच, असे नाही तर अनेक पटींनी प्रत्युत्तर देईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकारOperation Sindoorऑपरेशन सिंदूरGSTजीएसटीMake In Indiaमेक इन इंडिया